डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २१ (इंद्राग्नि सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २१ (इंद्राग्नि सूक्त )
ऋषी – मेधातिथि काण्व : देवता – इंद्र, अग्नि
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकविसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्रदेवतेला आणि अग्निदेवतेला आवाहने केलेली आहेत. त्यामुळे हे सूक्त इंद्राग्नि सूक्त म्हणून ज्ञात आहे.
मराठी भावानुवाद
☆
इ॒हेन्द्रा॒ग्नी उप॑ ह्वये॒ तयो॒रित्स्तोम॑मुश्मसि । ता सोमं॑ सोम॒पात॑मा ॥ १ ॥
देवेंद्राला गार्ह्यपत्या अमुचे आवाहन
आर्त होउनी उभयतांचे त्या करितो स्तवन
त्या दोघांना सोमरसाची मनापासुनी रुची
सोमपान करुनिया करावी तृप्ती इच्छेची ||१||
☆
ता य॒ज्ञेषु॒ प्र शं॑सतेन्द्रा॒ग्नी शु॑म्भता नरः । ता गा॑य॒त्रेषु॑ गायत ॥ २ ॥
इंद्राचे अन् अग्नीचे या यज्ञी स्तवन करा
हे मनुजांनो अलंकार स्तुति त्यांना अर्पण करा
स्तोत्रे गाउनिया दोघांची प्रसन्न त्यांना करा
आशिष घेउनी उभयतांचे यज्ञा सिद्ध करा ||२||
☆
ता मि॒त्रस्य॒ प्रश॑स्तय इंद्रा॒ग्नी ता ह॑वामहे । सो॒म॒पा सोम॑पीतये ॥ ३ ॥
इन्द्राग्नी यज्ञासी यावे करितो आवाहन
सोमरसाचे प्राशन करिण्या करितो पाचारण
सन्मानास्तव मित्राचा तुम्हासी आमंत्रण
सोमपात्र भरलेले करितो तुम्हासी अर्पण ||३||
☆
उ॒ग्रा सन्ता॑ हवामह॒ उपे॒दं सव॑नं सु॒तम् । इ॒न्द्रा॒ग्नी एह ग॑च्छताम् ॥ ४ ॥
सिद्ध करुनिया हवी ठेवला या वेदीवरती
अर्पण करण्या इंद्राग्निंना आतुर अमुची मती
उग्र असुनिही उदार इन्द्र आणि अग्नी देवता
स्वीकाराया हविर्भाग हा यज्ञी यावे आता ||४||
☆
ता म॒हान्ता॒ सद॒स्पती॒ इंद्रा॑ग्नी॒ रक्ष॑ उब्जतम् । अप्र॑जाः सन्त्व॒त्रिणः॑ ॥ ५ ॥
समस्त जनतेचे रक्षक तुम्ही चंड बलवान
अग्निदेवते सवे घेउनी करता संरक्षण
दुष्ट असुरांना निर्दाळुनी तुम्ही करा शासन
शौर्याने तुमच्या कुटिलांचे होवो निःसंतान ||५||
☆
तेन॑ स॒त्येन॑ जागृत॒मधि॑ प्रचे॒तुने॑ प॒दे । इंद्रा॑ग्नी॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ६ ॥
चैतन्याच्या तेजाने उज्ज्वल तुमचे स्थान
कृपा करुनिया आम्हावरती व्हावे विराजमान
सत्यमार्गी ही तुमची कीर्ति दिगंत विश्वातून
जागुनिया तुमच्या महिमेला करी सौख्य दान ||६||
☆
(हे सूक्त व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. त्यामुळे आपल्याला गीत ऋग्वेदातील नवनवीन गीते आणि इतरही कथा, कविता व गीते प्रसारित केल्या केल्या समजू शकतील. चॅनलला सबस्क्राईब करणे निःशुल्क आहे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 21
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈