श्रीमती उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ 8 मार्च, जागतिक महिला दिवस… लेखक – श्री राजेश खवले ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून ८ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. ८ मार्च हा जागतिक महिला दिवस कसा ठरला? त्याचा मागोवा घेणे खरोखरच गरजेचे ठरते.
युरोप, अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती झाली. मोठ्या प्रमाणावर कारखाने उभे राहिले. या कारखान्यांमध्ये महिला काम करू लागल्या. काम करणाऱ्या महिलांमध्ये कृष्णवर्णीय महिला, स्थलांतरित महिला यांचेही प्रमाण फार मोठे होते. महिलांना सार्वत्रिक मताधिकार असावा, लिंग, वर्ण , वंश अशा कोणत्याही कारणावरून भेदभाव न करता महिलांना सार्वत्रिक मताधिकार मिळावा याकरिताचा विचार जोर धरू लागला होता. या अनुषंगाने १८९० साली अमेरिकेत स्थापन झालेली द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशनचा उल्लेख करावा लागेल. महिलांना सार्वत्रिक मताधिकार मागणारी ही पहिली चळवळ. तथापि, ही चळवळ काहीशी वर्णद्वेषी होती. हिला फक्त गो-या महिलांना सार्वत्रिक मताधिकार अपेक्षित होता. दक्षिणेतील कृष्णवर्णीय महिला आणि उत्तर पूर्वेतील स्थलांतरित नागरिक यांना सार्वत्रिक मताधिकार मिळवून देण्याच्या विरुद्ध ही संघटना होती. त्यामुळे या संघटनेच्या कामाला कृष्णवर्णीय कामगार महिला आणि स्थलांतरित महिलांनी विरोध केला. १९०० च्या सुमारास अमेरिकेमध्ये सार्वत्रिक मताधिकाराची चळवळ जोर धरू लागली. या चळवळीवर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव होता. याच चळवळीच्या माध्यमातून १९०७ साली स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद पार पडली. स्टुटगार्ट हे जर्मनीमधील एक महत्त्वाचे शहर. जर्मनीच्या बेडन उटंबर्ग या राज्याची राजधानी आहे. मर्सिडिज-बेंझ चे मुख्यालय येथेच आहे. विल्हेमा हे युरोपातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि युरोपातील सर्वात मोठ्या बॉटनिकल गार्डनसाठी स्टुटगार्ड प्रसिद्ध आहे. स्टुटगार्ड येथील त्या परिषदेमध्ये क्लारा झेटकिन या कार्यकर्तीने सार्वत्रिक ‘मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे’ अशी घोषणा दिली. (क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट विचारसरणीच्या जर्मन विचारवंत आणि कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म १८५७सालचा.या वेळी त्यांचे वय जवळजवळ सुमारे ५० वर्ष होते. अनुभवाची भक्कम अशी शिदोरी त्यांच्या गाठीशी होती.आज जर्मनीच्या प्रत्येक शहरात क्लारा झेटकिन यांच्या नावाने एक तरी रस्ता सापडतोच.)
त्याकाळी महिलांच्या कामाचे तास निश्चित नव्हते. कामाच्या जागी महिलांना सुरक्षितता नव्हती. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, पाळणाघराची सोय या सुविधा तर सोडाच, कामाच्या जागी महिलांना चक्क भेदभावाची वागणूक मिळत असे. समान कामाकरिता समान वेतन हे तत्त्व देखील नव्हते. महिलांना समान हक्क मिळावे यासाठीची चळवळ अधिकच गतिमान होत गेली. त्यातूनच महिलांची निदर्शने होऊ लागली.
आठ मार्च १९१८ रोजी न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योग उद्योगात काम करणाऱ्या महिलांनी रूटगर्स चौकात हजारोच्या संख्येने निदर्शने केली. दहा तासांचा कामाचा दिवस असावा. कामाच्या जागी सुरक्षितता असावी आणि सर्व प्रौढ महिलांना कोणताही भेदभाव न करता सार्वत्रिक मताधिकार मिळावा या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. महिला हक्क आणि महिलांना सार्वत्रिक मताधिकार मिळावा म्हणून अशी चळवळ अधिक गतिमान होत गेली. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला.
१९१० साली कोपनहेगन येथे दुसरी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी आहे. रूटगर्स चौकात १९०८ साली महिलांनी हजारोच्या संख्येने केलेल्या निदर्शनांच्या स्मृतीला या परिषदेत उजाळा देण्यात आला. रूटगर्स चौकात महिलांनी केलेल्या निदर्शनाची स्मृती म्हणून ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्याचा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला. हा ठराव पारित झाला आणि तेव्हापासून ८ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. यानंतर युरोप अमेरिकेत सार्वत्रिक मताधिकाराच्या चळवळींना जोर चढला. १९१८ साली इंग्लंडमध्ये आणि १९१९ साली अमेरिकेमध्ये महिलांना सार्वत्रिक मताधिकार मिळाला.
भारताचा विचार करता भारतामध्ये मद्रास प्रांतात १९२१ साली स्त्री-पुरुषांना सार्वत्रिक मताधिकार मिळाला. परंतू त्याकरिता संपत्तीची अट होती. खऱ्या अर्थाने २६जानेवारी १९५०रोजी भारतीय संविधान लागू झाल्यानंतर भारतातील सर्व महिलांना सार्वत्रिक मताधिकार प्राप्त झाला.
महिलांच्या संघर्षाला सलाम !!! जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!
लेखक – श्री राजेश खवले
संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈