इंद्रधनुष्य
☆ “- १० मार्च — सावित्रीआई फुले यांची पुण्यतिथी -” – लेखक : श्री राजेश खवले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆
१० मार्च ! सावित्रीआई फुले यांची पुण्यतिथी! नुकतीच कोरोनाची लाट येऊन गेली. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अनेक डॉक्टर, नर्सेस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले प्राण पणाला लावून कर्तव्य बजावले. अनेकांनी तर आपले प्राणही गमावले ! त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम! त्यांचे हे काम सावित्रीआई फुले यांनी 1896-97 साली पुण्यात प्लेगच्या साथीत केलेल्या कामाची आठवण करून देणारे आहे. आज सावित्रीआई यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे या क्षेत्रातील कार्य जाणून घेणे औचित्यपूर्ण आहे.
१८९६ मध्ये भारतात आलेला प्लेग हा Bubonic प्लेग होता. चीनच्या पश्चिम यूनान या प्रांतात 1850 साली या प्लेगचा रुग्ण पहिल्यांदा आढळला. चीन ते हॉंगकॉंग आणि तेथून भारत असा या रोगाचा प्रसार झाला. येर्सिनिया पेस्टीस या जिवाणूमुळे हा रोग होत असे. उंदीर किंवा तत्सम प्राण्यांच्या अंगावर वावरणारे पिसू हे या जीवाणूचे वाहक होते. १८९६ साली या प्लेगची भारतात सुरुवात झाली. पहिला रुग्ण मुंबईमध्ये आढळून आला. लवकरच बंगाल, पंजाब, द युनायटेड प्रोविन्स आणि नंतर ब्रह्म देशातही या प्लेगने धुमाकूळ घातला. केवळ एका महिन्यात पुण्याची 0.६ टक्के जनता प्लेगने बळी गेली होती. पुण्यातील जवळजवळ अर्ध्या लोकांनी गाव सोडले होते. दिवसाला तीनशे ते चारशे लोक प्लेगने मरत असत. काही वर्षातच लाखो लोक या प्लेगच्या आजाराला बळी पडले. सरकारने या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ‘ The Epidemic Diseases Act 1897 ‘ पारित केला.
प्रा. ना. ग. पवार सांगतात- १८९७ सालच्या सुरुवातीपासून पुणे व पुण्याच्या ग्रामीण भागात प्लेगने थैमान घातले होते. यशवंत फुले यावेळी अहमदनगरला होते. त्यांना सावित्रीबाईने बोलावून घेतले. वानवडी व घोरपडी यांच्यामध्ये असलेल्या ग्यानोबा ससाने यांच्या माळरानावर आपल्या नोकरीतून सुट्टी काढून आलेल्या डॉक्टर यशवंतने खाजगी इस्पितळाची सेवा उपलब्ध करून दिली.
ग्यानोबा कृष्णाजी ससाणे सांगतात, तात्यासाहेब (म्हणजे महात्मा फुले) सन १८९० साली वारले. तात्या नंतर यशवंतराव डॉक्टरकीची परीक्षा पास झाले व फौजेत नोकर राहिले. यशवंतरावाने १८९३ साली डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले होते. डॉ. यशवंत यांना डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचे मार्गदर्शन लाभले होते. विश्राम रामजी घोले हे १८९३ साली व्हाईसरायचे असिस्टंट जनरल सर्जन होते. महात्मा फुले यांना अर्धांगवायूचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार डॉक्टर घोले यांनीच केले होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर यशवंत यांनी सैन्यात नोकरी पत्करली होती.दक्षिण आफ्रिकेतून सुट्टी घेऊन ते आले होते.
प्रा. ना.ग. पवार सांगतात, सावित्रीबाईंजवळ पैशाची कमतरता असूनही त्यांनी इतरांच्या आर्थिक मदतीने रुग्णांची यथाशक्ती सेवा केली. प्लेगचा उद्भव झाला आहे किंवा होणार आहे असा संशयाने सुद्धा गोरे सोल्जर्स घराघरात घुसून रुग्णांना बाहेर काढत व धाक दाखवीत. ते सावित्रीबाईंना पाहवले नाही.
मुंढवे या खेडेगावात मागासवर्गीयांची वस्ती होती. झोपडीवजा घरात अस्वच्छता ही भरपूर! तेथे या प्लेगचा अधिक जोर होता. या सर्व भागात सावित्रीबाई जातीने फिरू लागल्या. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंना बरीच साथ दिली. सत्यशोधक समाजाचे एक पुढारी नारायण मेघाजी लोखंडे यांची सावित्रीआईंना विशेष साथ लाभली होती.
प्रा. हरी नरके सांगतात, इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर रुग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गेला पण त्या रडत बसल्या नाहीत. उठल्या नी पुन्हा कामाला लागल्या. यावेळी पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जिवाच्या भीतीने गावोगावी पांगले होते. प्रा. पवार सांगतात, तीन-चार महिने प्लेगचा फारच जोर होता. माणसे पटापट मरू लागली. औषधोपचार नीट होणे कठीण व शासकीय सेवाही तुटपुंजी अशा अवस्थेत सावित्रीबाईंनी स्वतःचे प्राण पणास लावून प्लेगच्या साथीत दिवस-रात्र एक करून मदत कार्य केले.
प्रा. हरी नरके सांगतात, सावित्रीबाई स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत. त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुढंवा गावच्या गावकुसाबाहेर पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. मुलाला पाठीवर घेऊन धावत पळत त्या दवाखान्यात पोहोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली, आणि दहा मार्च १८९७ रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे प्लेगमुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी दिन बंधने शोकाकुल होऊन दिली.
खरे पाहिले तर यावेळी सावित्रीबाईंचे वय हे जवळजवळ ६७ वर्ष होते. म्हणजे त्या सदुसष्ट वर्षाच्या आजीबाई झाल्या होत्या. परंतु समाजकार्य करण्याची उर्मी त्यांच्या अंगामध्ये अगदी ठासून भरलेली होती. मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा हे अंतर सुमारे आज सात ते आठ किलोमीटर होते. यावेळी तो पांडुरंग नावाचा मुलगा सुमारे दहा- अकरा वर्षाचा होता. सावित्रीआईंनी त्याला चादरी मध्ये गुंडाळून आपल्या पाठीवर घेतले आणि हा सात ते आठ किलोमीटरचा प्रवास चालत पूर्ण केला. मुलाला
दवाखान्यामध्ये पोहोचविले. डॉक्टर यशवंत यांनी त्या मुलावर उपचार केले आणि तो मुलगा वाचला सुद्धा!
सावित्रीआईंच्या मृत्युनंतर यशवंतराव पुन्हा सैन्यात गेले. १८९८-९९ मध्ये ते अफगाणिस्तानात क्वेटा येथे लढाईवर गेले होते. अफगाणिस्तानात दोन वर्ष होते. १९०१ साली ते चीनमध्ये लढाईवर गेले होते. ते नंबर १२८ पायनर पलटणीवर डॉक्टर होते. १९०५ साली अहमदनगर मध्ये पुन्हा प्लेगची साथ आली. यशवंतराव प्लेगच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहमदनगरला गेले. रुग्णांवर उपचार करताना त्यांनादेखील प्लेग झाला. १३ ऑक्टोंबर १९०५ रोजी त्यांचा प्लेगने मृत्यू झाला.
दहा मार्च ! आजच्याच दिवशी रुग्णांची सेवा करताना सावित्रीआईंनी त्यांचे प्राण गमावले. रुग्णांच्या सेवेकरिता आपले प्राण पणाला लावणाऱ्या सावित्रीआई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त्याने त्यांना विनम्र अभिवादन.
लेखक : श्री राजेश खवले
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈