इंद्रधनुष्य
☆ एक मनस्वी कार्यकर्ती : प्रतिभा स्वामी – लेखिका – सुश्री बागेश्री पोंक्षे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆
आज २०२३ साली अत्यंत वेगाने चालणार्या या जगात विचार-भावना-कल्पना यांचं येणं, आपल्यावर त्यांचं अक्षरश: कोसळणं आणि कालचा विचार किंवा कालची गोष्ट याला आज बदलतं स्वरूप मिळणं हे किती सहज झालंय. आजची तरुण पिढीदेखील बदलत्या काळाप्रमाणे खूप वेगाने वेगवेगळ्या गोष्टी शिकतेय. नवनवीन तंत्रज्ञान, त्याचा वापर करून वेगाने आपली कामं पूर्ण करणं आणि रोज नवीन काहीतरी शिकणं हे ही पिढी अगदी सहजपणाने करतेय ! अशा अनेक मनस्विनी मला माझ्या कामामुळे भेटल्या.
— त्यातलं प्रतिभाचं जे भेटणं झालं, ते कायमचं लक्षात राहायला कारणही तसंच होतं. सांगोल्यात मराठी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तिच्या कॉम्प्युटर अॅप्लिकेशनच्या मास्टर्स डिग्रीसाठी तिने कोल्हापूर युनिव्हर्सिटी निवडली.
पदवी पूर्ण केल्यानंतर पाठोपाठच्या दोन भावंडांच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी प्रतिभाने शिक्षणातून दोन वर्षांचा विश्राम घेतला होता. त्या काळात आपल्या वडिलांच्या मिळवत्या हातांना तिने स्वत:च्या हाताची साथ दिली! सांगोला डेपोला मेकॅनिक म्हणून काम करीत असलेल्या वडिलांना थोडा आधार झाला. दोन वर्षांनंतर कोल्हापूर युनिव्हर्सिटीची मास्टर्ससाठीची प्रवेश परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे प्रतिभाला तिचं पुढचं शिक्षण अल्प पैशामध्ये करता येणार होतं. त्यासाठी हा सांगोल्यातून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास!
कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समधून मास्टर्स केल्यानंतर तिने दोन वर्षं छोटी-मोठी कामं केली आणि नंतर पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीत ती रुजू झाली. पगार चांगला होता, पण तिचं मन काही त्यात लागत नव्हतं. मनाला कामाचं समाधान मिळत नव्हतं. घड्याळ्याच्या काट्यांबरोबर फिरत राहून शहरांत काम करताना कामात समाधान नाही.. असं झालं होतं. हे काम काही खरं नाही असं वाटायचं. कंपनीत कामाला जाताना बस स्टेशन, बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी छोटी-छोटी मुलं भिक्षा मागताना तिला दिसायची आणि या मुलांचं भविष्य काय? या विचाराने अस्वस्थपणाचं एक बीज तिच्या काळजात रुजलं. आपण सॉफ्टवेअरच्या कामातून पैसे मिळवतो आहोत, पण उद्याची जी देशाची संपत्ती आहे, अशी ही लहान-लहान मुलं भिक्षा मागत फिरत आहेत. त्यांच्या उभ्या आयुष्याचं ती काय करतील? या प्रश्नांनी ती अस्वस्थ झाली.
अभ्यास केल्यावर तिच्या असं लक्षात आलं की ही सगळी मुलं ग्रामीण भागातून शहरी वस्त्यांमध्ये राहायला आली आहेत. आपण एक-दोघा मुलांसाठी काहीतरी करू शकू; पण अशी खूप मोठ्या संख्येत मुलं आहेत आणि त्यांचा प्रश्न मूळ ठिकाणी जाऊन बघितला, तर तो ‘जगायला’ पुढे काही नाही अशा ग्रामीण भागातल्या मुलांचा प्रश्न आहे, हे तिने जाणलं! यासाठी ग्रामीण भागात काही करून पाहण्याची तिची इच्छा दृढ होत गेली.
‘आज सॉफ्टवेअर क्षेत्रात मी आहे. अनेक जण आहेत. मी माझी कंपनी सोडून दुसरं काम सुरू केलं, तर कंपनीला दुसरं कोणीतरी या कामासाठी नक्की मिळेल. पण या मुलांचा विचार करणारे किती जण असतील? कदाचित त्यांची संख्या कमी असेल. मग मला त्यासाठी गेलं पाहिजे.’ … मनाचा कौल झाला आणि अस्वस्थता संपली.
प्रतिभाचे मामा म्हणजे आदरणीय विजयजी स्वामी. प्रतिभा कायमच तिच्या मनातलं त्यांच्याशी बोले, चर्चा करी. विजयजींशी बोलून निर्णयाचा पक्केपणा तपासायचं प्रतिभाने ठरवलं आणि विजयजींनी तिला ज्ञान प्रबोधिनीत पोंक्षे सरांकडे पाठवलं. तिची सगळी गोष्ट ऐकल्यानंतर ग्रामीण भागातल्या महिलांकरता प्राधान्याने काम करणार्या सुवर्णाताई गोखले यांच्याकडे सरांनी तिला पाठवलं. प्रतिभाचा निर्णय पक्का होता. आज तिच्या वयाच्या पस्तिशीतच तिने ग्रामीण भागात राहून आठ वर्षं पूर्णवेळ काम केलंय. ज्या वयात सर्वसाधारणपणे स्वत:च्या नोकरीचं, व्यवसायाचं, लग्नाचं ठरवायचं, त्या वयात प्रतिभाने ग्रामीण भागात राहू काम करायला सुरुवात केली.
सुवर्णा गोखलेंसारख्या हाडाच्या मेंटोरकडे (अधिमित्राकडे) प्रतिभा आली, म्हणून आज तिचे स्वत:चे जे विचार आहेत, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारं वस्तुनिष्ठ असं कृतीवर भर देऊन प्रयोग करत शिकण्यासाठीचं व्यासपीठ तिला मिळालं.
पुण्यापासून 50 कि.मी. अंतरावरील वेल्हे तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी राहून प्रतिभा काम करते आहे. तिने सुरुवात केली ती वेल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या मुलींकरता चालवल्या जाणार्या सहनिवासात (होस्टेलमध्ये) राहून, या शिक्षणाची आस असलेल्या मुलींची ताई बनून. अशी ताई जी अभ्यासातले अडलेलं सांगेल, संगणक शिकवेल, एखादे काम कसं करायचं, कामाचं नियोजन कसं करायचं हे तर शिकवेलच, तसाच कामामागचा विचार उलगडून सांगेल. आज अशा 60पेक्षा जास्त युवतींना शिक्षणासाठी योग्य बनवण्याचं आणि वेगवेगळ्या कामात पुढाकार घेण्याचं शिक्षण तिने दिलंय!
पण ती मुळात इथे आली होती ते आणखीही एका कामासाठी. ते काम तिला ग्रामीण भागात राहायला येऊन तीन वर्षं झाल्यावर दिसलं……. समाजाच्या एकूण उतरंडीत सगळ्यात शेवटच्या पायरीवर सुटून राहिलेला कातकरी समाज. आज ग्रामीण भागात तयार केलेल्या युवा मैत्रिणींच्या मदतीने ती वेल्हे तालुक्यातील 15 कातकरी वस्त्यांवर काम करते आहे. शाळेचं नाव काढताच पळून जाणारी कातकरी मुलं आज शाळेची गोडी लागून नियमित शाळेत जायला लागली आहेत, तर काही मुली चक्क वसतिगृहात (सहनिवासात) येऊन राहिल्या आहेत. स्वत:ची आणि वस्तीची स्वच्छता यापासून तिने कामाला सुरुवात केली आहे.
स्वत:चं अस्तित्वच नसलेल्या कातकरी समाजाला इंचभरही मालकीची जागा नाही, पॅन कार्ड-आधार कार्डाच्या रूपात कागदावर त्यांचं अस्तित्व नाही! यासाठी त्यांना पॅन कार्ड, आधार कार्ड मिळवून देण्याच्या कामापासून प्रतिभाने सुरुवात केली आहे. सामाजिक जाणिवेचा आणि अन्यायाने अस्वस्थ होणार्या काळजाचा वसा सहनिवासातल्या आणि युवती विभागातल्या प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचावा, म्हणून मावळातल्या मुलींनीच कातकरी मुलांसाठी काम केलं पाहिजे अशी गाठ तिने मारून ठेवली आहे. यातूनच पुढील ज्योत लागणार आहे, लागली आहे.
यातूनच कदाचित शहरातील बस स्टँडवर, बाजारात लोकांसमोर पसरलेले चिमुकले तळवे मनगटाला धरून उलटे करण्याचं आणि त्याची मूठ होईल अशी आशा करण्याचं स्वप्न तिने पाहिलं आहे. तिचं अस्वस्थ मन आता थोडं थोडं शांत होत आहे. ‘मी माझ्यापुरतं माझ्या मनात आलेल्या अस्वस्थतेला कृतीने उत्तर दिलं’ असं जणू ती म्हणते आहे. देशाची उद्याची आशा असलेल्या तरुण मुलामुलींना चांगल्या गोष्टींच्या नादाला लावण्याचा नाद तिने घेतलाय.
वेल्हेे तालुक्यातल्या ६०-७० युवती, त्यांच्यासमोर ठेवलेलं शिक्षणाचं संघटनेचं उदाहरण, १५ कातकरी वस्त्यांमधील कातकरी समाजातले ७०० बहीण-भाऊ, वेल्हे तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील २०० युवती, मावळ भागामधील गावांमधील ‘स्वाधार’ नावाच्या प्रकल्पातील २०० गावकरी असं आपलं वर्तुळ वाढवत वाढवत प्रतिभाने आपलं कुटुंब मोठं केलं आहे. या सात-आठ वर्षांत तिने केलेलं काम पाहूनच प्रतिभाचं भेटणं हे माझ्या कायम लक्षात राहिलेलं आहे, असं मी म्हटलं !
https://www.evivek.com/Encyc/2023/3/4/social-worker-Pratibha-Swami.html
लेखिका : सुश्री बागेश्री पोंक्षे
संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈