श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ माझा कात्र्यांचा संग्रह !… श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
सर्वसाधारण माणसांच्या घरात हमखास आढळणारी एक साधी पण उपयुक्त वस्तू म्हणजे कात्री ! लहानपणी वापरायला बंदी असलेली आणि ” काका काकूवर कातावले. कारण काकूने काकांचे कामाचे काही कागद कात्रीने कराकरा कापून काढले ” अशा अनुप्रासातून मनात जाऊन बसलेली कात्री. सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया ( इजिप्त ) येथे एकाच धातूच्या पट्टीच्या दोन्ही टोकांना धारदार पाती असलेली कात्री अस्तित्वात होती. १६६३ मध्ये चीनमध्ये आणि १७६० मध्ये इंग्लंडमध्ये कात्र्यांचे उत्पादन होऊ लागले. आत्ताच्या स्वरूपातील कात्री रॉबर्ट हिंक्लीफ याने १७६१ मध्ये वापरात आणली. फिनलँडमधील कात्र्यांच्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या फिस्कर या गावाच्याच नावाने, म्हणजे FISKAR या ट्रेड मार्कखाली १८३० मध्ये कात्र्यांचे मोठे उत्पादन व्हायला सुरुवात झाली.
माझ्याकडे अशा अनेक कात्र्यांचा एक छोटेखानी संग्रह आहे.
कात्री ही दोन पात्यांची बनलेली असल्याने इंग्रजीत कात्रीला pair of Scissors किंवा नुसतेच Scissors (मूळ फ्रेंच शब्द Cisoires) असे अनेकवचनी नाव वापरले जाते. संस्कृतमध्ये कात्रीला शरारी मुखी म्हणजे ” शर (↑ = बाण ) + आरी (l = छोटी करवत ) मुखी ” असे एक संयुक्तिक नाव आहे. कात्रीचे ‘ कापणे ‘ हे एकच काम असले तरी ती अत्यंत बहुगुणी, सर्वगामी, बहुरूपी आहे. महागाईमुळे खिशाला लागणारी, चित्रपटाला आणि नाटकाला सेन्सॉरची लागणारी, बजेटमध्ये खर्चाला लागणारी अशा अनेक अदृश्य कात्र्या आहेतच !
कात्रीने व्यापलेली क्षेत्रे, तिचे उपयोग आणि तिची भन्नाट रूपे पाहिली की आपण चक्रावून जातो.
कापडाशी संबंधित — कापणे, भरतकाम,नक्षीकाम, काज करणे ( बटन होल ), काही खास आकार कापणे या सर्वांसाठी वेगवेगळ्या कात्र्या
कागद —————— कापणे, किरीगामी, नक्षीकाम यासाठी वेगवेगळ्या कात्र्या
धातू —————— पत्रे, तारा कापणे.
झाडे ——————- छोट्या फांद्या छाटणे, मोठ्या फांद्या तोडणे, गवत कापणे, फुले तोडणे, बोन्साय वृक्ष निर्मिती या सर्वांसाठी खास कात्र्या
सौंदर्य साधना ——— केस, नखे, मिशी, भुवया कापणे / कोरणे. अगदी नाकातील व पानावरील केस कापण्यासाठी सुद्धा अत्यंत वेगळ्या कात्र्या उपलब्ध आहेत.
वैद्यकीय शास्त्र ——– अत्यंत उच्च दर्जाच्या पोलादापासून बनविलेल्या कात्र्या – विविध अवयवांच्या शस्त्रक्रिया, बँडेज बांधणे – काढणे
प्राणी ——————– शेळ्या मेंढ्यांच्या अंगावरील लोकर कापणे
स्वयंपाकघर ———— विविध भाज्या कापण्यासाठी, तुकडे करण्यासाठी.
गालिचे —————— गालिच्याच्या विणकामातून वर येणारे जाड धागे कापण्यासाठी.
दिव्यांच्या वातींसाठी — दिव्याची वात जळत असतांना त्यावरील काजळी काढून टाकणे, वात कापणे यासाठी अत्यंत कलात्मक कात्र्या वापरल्या जात असत. त्यांना वातेऱ्या म्हटले जाते.
काही खूप वेगळ्या प्रकारच्या कात्र्या — जर अर्धाच चिरूट ओढायचा असेल तर त्यासाठी चंद्रकोरीसारखी पाती असलेली कात्री उपलब्ध होती. याच आकाराची पण खूप मोठी कात्री बर्फाच्या मोठमोठ्या लाद्या ओढून नेण्यासाठी वापरतात. पानवाले विड्याची पाने कापण्यासाठी हलकी व मोठ्या मुठींची कात्री वापरतात. आपल्याकडे विविध उदघाटनांसाठी सुंदर आकाराच्या, चांदीच्या, सोन्याचे पाणी दिलेल्या कात्र्या वापरण्याची पद्धत आहे. पाश्चिमात्य देशात अगदी ३ ते ४ फुटांच्या, सोन्याचे पाणी दिलेल्या आणि हजारो रुपये किंमत असलेल्या कात्र्या वापरल्या जातात.
डावखुऱ्यांसाठी खास कात्र्या — कात्रीच्या टोकेरी पाते असलेल्या बाजूला अंगठा अडकविला जातो व अंगठा हा पात्याच्या अधिक जवळ असतो. खालच्या बाजूचे पाते हे रुंद असून त्याची मूठ ३ किंवा ४ बोटे राहतील इतकी मोठी असते. अशी रचना उजव्या हाताने कापणाऱ्यांसाठी आहे. डावखुऱ्या माणसासाठी असलेल्या कात्रीमध्ये ही रचना बरोबर उलट म्हणजे आरशातील प्रतिमेप्रमाणे असते. पण याचा खप फारसा नसल्याने ती आता खूपच दुर्मिळ झाली आहे. त्याचप्रमाणे पायाने चालविता येईल अशी कात्रीही निर्माण केली गेली होती.
कात्री आणि अंधश्रद्धा ?
आता अंधश्रद्धा म्हटल्यावर त्या हिंदूंच्याच असतात का ? आपल्याकडे कात्री ही कुणाच्याही हातात देऊ नये, ती उघडलेल्या स्थितीत ठेऊ नये आणि त्याचा कचकच असा आवाज करू नये असे म्हणतात. पण याच्या मागे फक्त सुरक्षिततेचाच विचार आहे. कात्री दुसऱ्याच्या हातात न देता ती खाली ठेवावी व त्यांनी ती उचलून घ्यावी. देताना जर ती हातातून सुटली तर खाली पायावर उभी पडून मोठी इजा होऊ शकते. कात्री उघडी ठेवल्यामुळे आणि कचकच वाजवतांना होणारी हालचाल यामुळे इजा होऊ शकते. त्यामुळे या अंधश्रद्धा मुळीच नाहीत. पाकिस्तानात अशी कात्री ठेवणे किंवा वाजविणे अशुभ मानले आहे. ( म्हणजे एकूण तेच ). युरोपमध्ये लहान मुलाला वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून बाळाच्या पाळण्यावर नुसतीच छोटी कात्री किंवा क्रॉसप्रमाणे उघडून ठेवण्याची पद्धत होती. न्यू ऑर्लिन्स मध्ये तर रात्री उशीखाली उघडी कात्री ठेवल्यास दुष्ट शक्तींपासून रक्षण होते असे मानले जात असे. तर काही ठिकाणी कात्री उघडून ठेवल्यास एकमेकात भांडणे होतात असे मानत असत. आफ्रिकेतील काही भागांमध्ये नवरदेवाला अपशकुन करण्यासाठी, वाईट शक्तींकडून विघ्न यावे यासाठी उघडलेल्या कात्रीचा वापर केला जात असे.
इतकी बहुगुणी आणि बहुपयोगी कात्री आपल्या समजुतींमुळे उगाच बदनाम होते. पण तिची मात्र काहीच कचकच नाही !
सोबतच्या विविध कात्र्यांची चित्रे जरूर पाहा !
(काही संदर्भ सौजन्य – विकिपीडिया)
(हा लेख व फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत)
लेखक : श्री मकरंद करंदीकर
संग्राहक : श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈