सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातील पहिली महिला वैमानिक –  सुश्री सरला ठकराल ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

वयाच्या १६ व्या वर्षी तिचं लग्न झालं. लग्नानंतर तिला एक मुलगीही झाली तरी ती वयाच्या २१ व्या वर्षी भारतातील पहिली महिला वैमानिक झाली. वयाच्या २४ व्या वर्षी ती विधवा झाली तरी खचली नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात तिने आपल्या कर्तुत्वाचा ठसा शेवटपर्यंत उमटवलाचं. कोण होती ही महिला ?

” लग्नानंतर माझ्या करिअरचं काय होणार ? ” असा प्रश्न पडलेल्या फेसबुकवरील हजारो महिलांना आज हा लेख सादर समर्पण.

१९३० चा तो काळ होता. मुलगी १६ वर्षाची झाली म्हणजे ती थोराड झाली असा सार्वत्रिक समज होता. साहजिकच सरलाच्या आई वडिलांनीही तिचं लग्न वयाच्या १६ व्या वर्षीच लावून दिलं आणि ती सरला शर्मा झाली. अखंड भारतातील लाहोरमध्ये ती राहत होती. तिचा नवरा पायलट होता. शिवाय घराण्यातील एकूण ९ माणसे पायलट झाली होती. त्यामुळेच असेल कदाचित तिने एक भव्य स्वप्न पाहिलं- आपणही एक दिवस पायलट व्हायचं. ज्या काळात स्त्रिया कारही चालवत नव्हत्या त्या काळात विमान चालवायचं स्वप्न पाहणं म्हणजे अशक्य कोटीतली गोष्टच होती. त्यात ती एका मुलीची आई झाली होती. आता तिचं ते स्वप्न पूर्ण होणं केवळ अशक्यच होतं. परंतु ज्यांच्याकडे भव्य स्वप्न असतात ते लोक कुठल्याही अडचणींनी कधीच खचून जात नाहीत. उलट त्यांच्यातील इर्ष्या त्यांना अधिक प्रेरित करत राहते. सरला शर्मासुद्धा आपल्या निश्चित ध्येयापासून मुळीच ढळली नाही. नवऱ्याचं प्रोत्साहन होतंच पण त्याहीपेक्षा तिच्या सासऱ्यांनी दिलेलं प्रोत्साहन तिला लाख मोलाचं वाटलं.

जेव्हा ती वयाच्या २१ व्या वर्षी देशातील पहिली महिला वैमानिक झाली तेव्हा तिची मुलगी ४ वर्षाची होती आणि त्यावेळी तिने साडी नेसून विमान चालवलं होतं. त्यामुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तब्बल एक हजार तासाचा विमान उड्डाणाचा अनुभव तिच्या पाठीशी होता. त्यामुळे साहजिकच तिला ग्रुप ‘ए’ परवाना मिळाला. प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळवण्यासाठी ग्रुप ‘बी’ परवाना मिळवणं आवश्यक होतं. तिने त्याचीही तयारी सुरु केली. दुर्दैवाने त्याचवेळी तिच्यावर आभाळच कोसळलं. एका अपघातामध्ये तिच्या पतिचं निधन झालं. तरीही ती आपल्या ध्येयापासून ढळली नाही. आपण कमर्शिअल पायलट व्हायचच हे तिचं स्वप्न होतं. पण त्याच वेळी दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला आणि तिचं स्वप्न त्या वणव्यात जळून खाक झालं. युद्धामुळे ट्रेनिंग देणारी ती संस्थाच बंद पडली. दोन मुलींना घेऊन ती लाहोरहून दिल्लीला आली आणि तिने दुसरं लग्न केलं. सरला शर्माची सरला ठकराल झाली.

स्वप्न भंग झालं तरी नाउमेद न होता ती पेंटिंग शिकली. फाईन आर्ट मध्ये तिने डिप्लोमा मिळवला. ती ज्वेलरी डिजाईन आणि कपडे डिजाईनचा व्यवसाय करू लागली. त्यातही तिने नेत्रदीपक यश मिळवलं.ज्या काळात महिलांना शिक्षण घेणंही कठीण होतं त्या काळात सरला आपल्या करिअरचा विचार करायची. वयाच्या अखेरच्या घटकेपर्यंत त्या आपल्या व्यवसायात मग्न राहिल्या. वयाच्या ९५ व्या वर्षी २००९ मध्ये त्यांचं निधन झालं. वयाच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत राहिल्या.

सरला ठकरालनी देशातील लाखो महिलांना एक नवी वाट दाखवली. त्या काळात फक्त चूल आणि मुल म्हणजेच संसार समजणाऱ्या देशातील महिलांनी आज वैमानिक क्षेत्रात देशाचा झेंडा अटकेपार नेऊन फडकावालय. गेल्या ५ वर्षात परवाना मिळालेल्या ४२६७ वैमानिकांपैकी तब्बल ६२८ महिला वैमानिक आहेत. महिलांची जागतिक टक्केवारी केवळ ३ टक्के असताना भारतीय महिलांनी १४.७ टक्केची मजल गाठून सरला ठकराल यांच्या कर्तुत्वाला एक प्रकारे सलामच केल्याचे म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या सौदामिनी देशमुख या देशातील तिस-या महिला वैमानिक ठरल्या. त्यांनी बोईंग ७३७ आणि एअर बस ३२० चालवून देशातील महिलांची मान गर्वाने ताठ केली.

मित्रानो, आज हा लेख आपल्या घरातील महिलांना आवर्जून वाचायला द्या. कदाचित तुमच्या घराण्याचं नाव काढणारी उद्याची सरला ठकराल किंवा सौदामिनी देशमुख तुमच्या घरातही असू शकेल.

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments