सुश्री शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ चांगदेव पासष्ठी – भाग-2… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆
(संत श्री ज्ञानदेव महाराजांनी योगीराज चांगदेवांच्या कोर्या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव पासष्टी. संत ज्ञानदेवांच्या काळचं प्राकृत म्हणजेच मराठी आजच्या संदर्भात, सर्वसामान्य लोकांना कळायला अवघड आहे. म्हणून सुश्री शोभना आगाशे यांनी सध्या प्रचलित असलेल्या मराठीत या चांगदेव पासष्टीचं केलेलं रूपांतर प्रस्तुत करीत आहोत.)
जगती जे अणुरेणू
तसेच हो परमाणू
पृथ्वीचे परि पृथ्वीपण
नच झाकिती ते कण कण
विश्वाचा अविष्कार
झाकत ना त्या निराकार॥६॥
क्षयवृद्धीच्या कळा
चंद्रास ग्रासती सोळा
चंद्र परि नच हरपे
दीपरूपे वन्ही तपे॥७॥
तसाच विश्वी तोच असे
दृश्य तोच द्रष्टा असे॥८॥
लुगडे केवळ रूप असे
अंतरी सारे सूत असे
जसे मृद् भांडे रूप मात्र
मृत्तिका केवळ तेच पात्र॥९॥
द्रष्टा दृश्य यांचे परे
परमात्मतत्व असे खरे
अविद्ये कारणे मात्र असे
द्रष्टा दृश्य रूपे भासे॥१०॥
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈