डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ – ऋचा १ ते ६ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ (अप्सूक्त)– सूक्त २२ ऋचा १ ते ६
ऋषी – मेधातिथि कण्व
देवता – १ वायु; २-३ इंद्रवायु; ४-६ मित्रावरुण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तेविसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेली असली तरी हे मुख्यतः जलदेवतेला उद्देशून असल्याने हे अप्सूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा वायूचे, दोन आणि तीन या ऋचा इंद्र-वायूचे, चार आणि सहा या ऋचा मित्रावरुणचे आवाहन करतात.
मराठी भावानुवाद ::
☆
ती॒व्राः सोमा॑स॒ आ ग॑ह्या॒शीर्व॑न्तः सु॒ता इ॒मे । वायो तान्प्रस्थि॑तान्पिब ॥ १ ॥
वायूदेवा मधुर मधुरशा सोमा सिद्ध केले
त्याच्यामध्ये दधि मिसळुनी त्यासी तीव्र केले
तुम्हासाठी पिळूनी दर्भा हवी भक्तिभावे
पवना घ्यावे प्राशन करुनी तृप्त होवोनी जावे ||१||
☆
उ॒भा दे॒वा दि॑वि॒स्पृशे॑न्द्रवा॒यू ह॑वामहे । अ॒स्य सोम॑स्य पी॒तये॑ ॥ २ ॥
इंद्र-वायू दोघे सहजी द्युलोकाप्रत जाती
अपुल्या सामर्थ्याला साऱ्या विश्वाला दाविती
आवाहन त्या उभय देवता या यज्ञासाठी
सज्ज ठेविल्या सोमरसाला प्राशन करण्यासाठी ||२||
☆
इ॒न्द्र॒वा॒यू म॑नो॒जुवा॒ विप्रा॑ हवन्त ऊ॒तये॑ । स॒ह॒स्रा॒क्षा धि॒यस्पती॑ ॥ ३ ॥
मनाहुनीही शीघ्र वेग वायूचा इंद्राचा
सहस्राक्ष देवेंद्र अधिपती अगाध बुद्धीचा
वायू-इंद्र चंडप्रतापी समर्थ बलवान
रक्षण करण्या विद्वानांनी केले पाचारण ||३||
☆
मि॒त्रं व॒यं ह॑वामहे॒ वरु॑णं॒ सोम॑पीतये । ज॒ज्ञा॒ना पू॒तद॑क्षसा ॥ ४ ॥
मित्रवरुणा करितो सोमपाना आवाहन
बल उदंड आहे तयांसी सवे सर्वज्ञान
पवित्र कार्यास्तव दाविती अचाट सामर्थ्य
त्यांच्या योगे याग अमुचा सहजी होई सार्थ ||४||
☆
ऋ॒तेन॒ यावृ॑ता॒वृधा॑वृ॒तस्य॒ ज्योति॑ष॒स्पती॑ । ता मि॒त्रावरु॑णा हुवे ॥ ५ ॥
नीतीमार्गा अवसरुनीया अपुल्या आचरणे
सन्मानाने नीतीनियमा उच्च नेती स्थाने
मित्रवरुण दोघे तेजाचे दिव्य अधिष्ठाते
स्वीकारावे अर्पण करितो हवीस तुम्हाते ||५||
☆
वरु॑णः प्रावि॒ता भु॑वन्मि॒त्रो विश्वा॑भिरू॒तिभिः॑ । कर॑तां नः सु॒राध॑सः ॥ ६ ॥
रक्षण करि सर्वांगिण मित्रा संकटात अमुचे
तुम्हीच आम्हा जीवनात या सावरुनी घ्यायचे
वरूण देवताही करोत आमुचे संरक्षण
परमसुखाचे उभय देवतांनो द्यावे दान ||६||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 1 – 6
Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 1 – 6
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈