श्री संभाजी बबन गायके

अल्प परिचय 

अभिनव विद्यालय हायस्कूल,मराठी माध्यम, कर्वे रस्ता,पुणे या शाळेत मराठी,इंग्रजी हे विषय शिकवतो. पूर्ण वेळ शाळा आणि उर्वरित वेळेत थोडेसे सामाजिक काम आणि लेखन असा दिनक्रम असतो.

? इंद्रधनुष्य ?

☆ “ती चक्रधर आयुष्याच्या रथाची….!” ☆ श्री संभाजी बबन गायके 

आयुष्य संपवण्याचा निश्चय केलेला तो.. तरूण शेतकरी गडी.. आणि त्याचे आयुष्य वाचवण्यासाठी कंबर कसून लढायला उभी असलेली ती!

त्याच्या शरीरात विष पसरत जाण्याचा वेग त्याच्या दवाखान्यात आणल्या जाण्याच्या वेगापेक्षा जास्त होता. त्याच्या खेड्यातल्या घरातून, खाच खळगे असलेल्या वाटेवरून या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला आणायला झालेला उशीर त्याच्या जीवावर बेतू पाहतो आहे. अशाच एका खेड्यातून जिद्दीने शिकून, वैद्यकीय अभ्यासाचं शिवधनुष्य पेलून डॉक्टर झालेली ती…  दुपार ते रात्र अशा सेकंड शिफ्ट ड्युटीवर तैनात आहे. आणि हो, पाच महिन्यांची गर्भार सुद्धा ! खूप काळजी घ्यावी लागते पोटातल्या जीवाची. मानसिक ताण नको, जोराच्या हालचाली नको आणि धक्के बसतील असा प्रवास तर नकोच नको !

विष प्राशन करण्याचे भलते पाऊल उचलणाऱ्या त्या तरुणाचा देह आता तिच्या टेबलवर आहे. त्याची पत्नी आलीये त्याला घेऊन कशीबशी. तिने बहुदा आशा तशी सोडलीच आहे आणि त्याला तरी कुठे जगायचे होते?

नाशिकच्या ग्रामीण भागात असलेल्या म्हाळसाकोरे या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सोयी त्याचा जीव वाचविण्याच्या कामात तशा अपुऱ्या पडतील, हे ड्यूटीवर असलेल्या तिला उमगले लगेच. त्याला प्राथमिक उपचार आणि त्याच्या बायकोला धीर देऊन तिने त्वरित निर्णय घेतला!

रुग्ण वेगाने आधुनिक सुविधा असलेल्या निफाडच्या रुग्णालयात पोहोचवता आला तर जीव वाचण्याची शक्यता अधिक! रुग्णवाहिका होती दारात, पण चालक रजेवर असल्याने उपलब्ध नव्हता आणि दुसरा चालक किंवा वाहन मिळवण्यात वेळ लागला असता. रात्रीचे आठ-साडे आठ वाजलेत. रुग्णालय पंधरा किलोमीटर्सच्या अंतरावर. इतर वाहनाने रुग्ण हलवणे जिकिरीचे आणि धोक्याचे होतेच.

तिला चार चाकी स्वयंचलित वाहन हाकता येत होतं, परवानाही होताच. पण रुग्णवाहिका कधीच नव्हती चालवलेली. हो, रूग्णालयाच्या मोकळ्या आवारात काहीवेळा रुग्णवाहिका चालवून थोडा हात साफ करून घेतला होता. तो साफ हात आता उपयोगात आणण्याची वेळ आली होती.

तिने पटकन सूचना दिल्या… आरोग्यसेवकाला सोबत घेतले. रूग्ण वाहनात घेतला आणि ती चक्रधर बनली ! पोटातलं बाळ सुध्दा जीव मुठीत धरून बसलं असावं. तिने स्टार्टर मारला… सायरनचा कान पिळताच त्याने आवाज घुमवायला आरंभ केला.

चार चाकं तिच्या हातातल्या चाकाच्या इशाऱ्यावर डावी उजवी, हळू, वेगात अशा खेळात रमली. सुदैवाने रस्ता उत्तम स्थितीत होता. जे असतील ते खड्डे आज तिला पाहून काहीसे उथळही झाले असावेत…. डॉक्टर रुग्णवाहिका चालवताहेत…. हे त्या खड्ड्यांनी, गतिरोधकांनी, रस्त्यावरच्या मैलांच्या दगडांनी, रात्रीच्या अंधारात चकाकणाऱ्या रिफ्लेक्टर्सनी आज बहुदा पहिल्यांदाच पाहिले असावे…..आज नागमोडी वळणं शहाण्यासारखी वागली… कुणीही मध्ये नाही आलं!….. हा एक प्रकाराचा ग्रीन कॉरीडॉरच.

सुमारे सत्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने तिने गाडी हाकली. सफाईदारपणे रूग्णालयाच्या आवारात आणली… रुग्णाला व्हीलचेअरवरून वेगाने इमर्जन्सी रूममध्ये आणलं.. रुग्णाच्या श्र्वासांची मालिका समाप्त होण्याआधी त्याचे श्वास तज्ज्ञ डॉक्टर आणि यंत्रांच्या हवाली झाले होते…. रुग्ण वेळेपूर्वी रुग्णालयात पोहोचला होता ! त्याचा जीव बचावला होता…

डॉक्टर प्रियांका पवार यांनी गर्भारावस्थेत, धोका पत्करून, रुग्णाच्या जीवासाठी आपला आणि पोटातल्या तान्हुल्याचा जीव पणाला लावला होता.

प्रभु रामचंद्रांचे पितामह राज दशरथ यांच्या रथाची धुरा ऐन युद्धात तुटली…. राजा दशरथ देव-दानवांच्या युद्धात देवांच्या साहाय्यासाठी लढत होते… राणी कैकेयी सोबत होत्या… त्यांनी आपला हात रथाच्या धुरेत घातला आणि रथाचे चाक निखळू दिले नाही….. युद्ध संपेपर्यंत. अगदी या प्रसंगाची आठवण यावी असा डॉक्टर प्रियांका पवारांचा पराक्रम. कैकेयीने प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवले होते… या डॉक्टररूपी शूर स्त्रीने रूग्णाला मृत्यूच्या वनवासातून माघारी आणले !

डॉक्टर साहेबा पुन्हा तीच रूग्णवाहिका घेऊन ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णालयातल्या आपल्या ड्यूटीसाठी परतही आल्या. एका कोपऱ्यात शांत, क्लांत उभी असलेली आणि आजवर शेकडो रूग्णांना इकडून तिकडे घेऊन जाण्याचा अनुभव असलेली ती रुग्णवाहिका या आपल्या नव्या चालकाकडे पाहून बहुदा गालातल्या गालत हसत असावी आणि डॉक्टर प्रियांका पवारांचं बाळ, आईनं किती छान राईड मारून आणली म्हणून भलतंच खुशही झालं असावं ! आपल्या आईने कर्तव्यपूर्तीसाठी किती मोठा धोका पत्करला होता हे त्या पिलाला कळलं नसावं… पण ते जेंव्हा जन्माला येऊन मोठं होईल ना तेंव्हा त्याला आपल्या आईचा अभिमान निश्चितच वाटेल… नाही का?

 © श्री संभाजी बबन गायके

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments