श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एकशे दहा वर्षे चाललेली पावलं!… ☆ श्री संभाजी बबन गायके 

अर्थात वाळवंटातील वाटाड्या शूर वीर रणछोडदास राबरी !

“साब ! म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टरमध्ये बिनधास्तपणे बसलेल्या त्या वृद्धाने म्हणल्याबरोबर त्यांच्यासोबतच्या लष्करी अधिका-यांनी हेलिकॉप्टर ताबडतोब माघारी फिरवलं आणि विमानतळावर उतरवलं ! सुरकतलेलं पण अजूनही काटक शरीर, पीळदार आणि अगदी दाट मिशा, आणि मुख्य म्हणजे दगडासारखे मजबूत पाय असलेल्या त्या आजोबांचे वय होतं १०७ वर्षे फक्त….होय….  अवघे एकशे सात वर्षे !

हे आजोबा हेलिकॉप्टरमध्ये लष्करी अधिका-यांसमवेत कसे?—  

आजोबांना महान सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांनी खास आणि तेही तातडीनं बोलावणं धाडलं होतं. तामिळनाडूमधील वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले माणेकशासाहेब कधी शुद्धीत तर कधी अर्धवट बेशुद्धीमध्ये सतत ‘पगी…पगी’ असा काहीतरी उच्चार करताना तेथील डॉक्टरांनी ऐकलं होते! “कोण पगी?” असं विचारलं गेल्यावर साहेबांनी ‘पगी’ ची कहाणी अगदी इत्यंभूत सांगितली….आणि त्या ‘पगी’ची भेट व्हावी,अशी इच्छा व्यक्त केली…नव्हे तसा आदेशच दिला ! 

लष्कराने ‘पगी’चा शोध घेतला आणि राजस्थानमधील पाकिस्तानी सीमेवर असलेल्या बनासकांथा येथील ‘निंबाला गावातून या आजोबांना सोबत घेतलं..त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्थाही करण्यात आली होती. माणेकशा साहेबांचं नाव घेताच आजोबांच्या डोळ्यांत निराळीच चमक आली. त्यांनी घरातील महिलांना काहीतरी सांगितलं. त्या महिलांनीही लगबग करून पंधरा-वीस मिनिटांत एक कापडी थैली आजोबांच्या हाती दिली. जवळच्या लष्करी तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं आणि तेवढ्यात आजोबा म्हणाले,”साब  म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टर उतरवलं गेलं, थैली शोधली गेली. सुरक्षिततेच्या कारणांसाठी त्या थैलीत काय आहे? याची तपासणी केली…थैलीत दोन कांदे, दोन बाजरीच्या भाकरी आणि पिठलं एवढंच होतं ! “ सॅम साब को बहोत पसंद है! कभी कभी हमरा खाना चखा करते थे बॉर्डर पर ” –आजोबांनी सांगितलं…हेलिकॉप्टरने पुन्हा भरारी घेतली !

रूग्णशय्येवर असलेले सेनापती माणेकशासाहेब या ‘पगी’ला पाहून उठून बसले.

“आओ, पगी…रणछोडदास…..!” साहेब आपल्या खणखणीत आवाजात उदगारले!  ‘पगी’ने त्यांना ताठ उभे राहून आणि थरथरत्या हातांनी सल्यूट बजावला. साहेबांनी त्यांना जवळ बसवून घेतलं….त्यांच्या हातातील पिशवी घेतली ! त्या दिवशी एक सैनिक आणि एक सेनापती एकत्र बसून जेवले ! कृष्ण-सुदामाची भेट आणि पोहे हीच कथा जणू पुन्हा घडत होती…सुदाम्याच्या शिदोरीत पोहे होते…  या सुदाम्याच्या शिदोरीत कांदा-भाकरी आणि पिठलं !

पग म्हणजे पाय हे समजण्यासारखं आहेच. परंतू ‘ पगी म्हणजे पायांच्या ठशांचा माग काढणारा किंवा वाळवंटातून वाट दाखवणारा !’  क्षितिजापर्यंत वाळूच वाळू, त्यात अंधार….नक्की कोणत्या दिशेला जायचं याबद्द्ल नवख्यांचा गोंधळ होणारच. पण राजस्थानातल्या याच वाळूत जन्मलेली, वाढलेली,गुरे-उंट हाकलेली आणि शेवटी याच वाळूत मिसळून गेलेली राजस्थानी माणसं वाळूचा कण न कण ओळखू शकतात…अंधार असला तरी !

१९०१ मध्ये या वाळूत, पशुपालक कुटुंबात आपल्या या कथानायकाचा जन्म झाला. नाव ठेवले गेले ‘रणछोडदास’! भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या जरासंधाशी झालेल्या युद्धात हे नाव जरासंधाकडूनच प्राप्त झाले…असे म्हणतात. युद्धात जनतेची हानी होऊ नये म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी, युद्ध योजनेचा एक भाग म्हणून, रणांगणातून तात्पुरते पलायन केले म्हणून ते रण सोडून जाणारे….रणछोड ! पुढे जरासंधाचा नि:पात झाला !

पण हे कलियुगातील आणि मानवी अवतारातील रणछोडदास १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात भारतीय सेनेच्या अग्रभागी राहिले होते ! आयुष्यभर वाळवंट तुडवलेले रणछोडदास उंटांच्या वाळूत उमटलेल्या पावलांच्या ठशांवरून, माणसांच्या पायांच्या खुणांवरून, एक ना अनेक गोष्टींचा अचूक अंदाज बांधायचे. किती उंट असतील? त्यावर किती माणसे बसलेली असतील? त्यांच्यासोबत चालणारे प्रवासी किती असतील? त्यात स्त्रिया किती आणि पुरूष किती असतील? त्यांची वजने आणि उंची किती असेल?….रणछोडदास यांचा अंदाज चुकायचा नाही..दिवस असो वा रात्र !

१९६५ मध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधी पाकिस्तान्यांनी कितीतरी वेळा भारतीय हद्दीमध्ये, कच्छच्या रणात घुसखोरी केलेली होतीच. युद्धाच्या आरंभी त्यांनी कच्छ भागातील विधकोट ठाणे काबीज केले होते. त्यात जवळजवळ १०० भारतीय सैनिक धारातीर्थी पडले होते. भारतीय सैन्याचे एक मोठे दल त्या भागाकडे पाठवले गेले. अंतर जास्त होते आणि रस्ते अनोळखी. तिथून जवळच असलेल्या छारकोटपर्यंत आपले सैन्य वेगाने पोहोचणे गरजेचे होते. पाकिस्तान्याचे १२०० सैनिक सीमेवरील एका गावाजवळच्या जंगलात लपून बसले होते. रणछोडदास यांनी त्यांचा अचूक माग काढला. आपल्या सेनेला अवघड वाटेवरून अचूकपणे आणि अत्यंत त्वरेने म्हणजे अपेक्षित वेळेपेक्षा बारा तास आधीच शत्रूपर्यंत पोहोचवले. इतक्या लवकर भारतीय सैन्य आपल्याला शोधून काढेल याची पाकिस्तान्यांना शक्यताच वाटली नव्हती. भारतीय जवानांनी पाकिस्तान्यांना धूळ चारली ! रणछोडदास या सामान्य ‘पगी’चा, वाटाड्याचा या विजयात मोठाच हातभार लागला ! बी.एस.एफ.अर्थात बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (अर्थात सीमा सुरक्षा दल आणि अर्थातच सीमा सुरक्षा बल) यांनी बनासकांथा येथील एका सैन्यचौकीला ‘रणछोडदास’ यांचे नाव देऊन त्यांच्या कर्तबगारीचा अनोखा गौरव केला आहे.

फिल्ड मार्शल माणेकशासाहेबांनी रणछोडदास यांची अनोखी क्षमता ओळखून त्यांच्यासाठी लष्करात ‘पगी’ (गाईड,वाटाड्या,पथ-मार्गदर्शक) हे विशेष पद निर्माण केले. या दूरदृष्टीच्या निर्णयाचा १९७१ च्या लढाईतही खूप फायदा झाला. पालीनगर ही पोस्ट जिंकून घेण्याच्या यशस्वी मोहिमेत पथ-मार्गदर्शन करणा-या रणछोडदास यांचाही मोठा वाटा होता. हे काम करताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. याबद्द्ल माणेकशासाहेबांनी त्यांना स्वत:च्या खिशातून तीनशे रुपयांचे रोख पारितोषिकही दिले होते आणि त्यांना भोजनासाठीही आमंत्रित केले होते ! संग्राम मेडल, पोलिस मेडल आणि समर सेवा स्टार असे पुरस्कारही भारतीय लष्कराने रणछोडदास यांना प्रदान केले ! शौर्याची कदर करावी ती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांसारख्या जिंदादिल सेनानींनीच आणि भारतीय लष्करानेच !

माणेकशासाहेबांना आपल्या या गुणी, देशप्रेमी, धाडसी सैनिकाची आठवण न आली तरच नवल ! आपल्या अंतिम दिवसांत तर ही आठवण अधिकच तीव्र होत गेली….आणि त्यांनी ‘पगी’ रणछोडदास राबरी (राबडी) यांना अत्यंत सन्मानाने बोलावून घेतले.

२७ जून, २००८ रोजी  माणेकशासाहेब निवर्तले. ‘पगी’ रणछोडदास यांनी लगेचच म्हणजे २००९ मध्ये, त्यांच्या वयाच्या तब्बल १०८ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली….मानवी आयुष्याची १०० वर्षांची मर्यादा ओलांडलेले शरीर काम तरी किती दिवस करणार? वयाच्या ११२ व्या वर्षी अर्थात २०१३ मध्ये हा पगी स्वर्गाची वाट चालण्यासाठी कायमचा निघून गेला ! त्यांच्या पावलांचे ठसे राजस्थानातल्या वाळवंटाच्या मनात अजूनही ताजे असतील. जय हिंद !

आपल्यापैकी अनेकांनी ही माहिती पहिल्यांदाच वाचली असेल….मी ही नुकतीच वाचली. काही सैनिकी ज्येष्ठ अधिका-यांनी ही माहिती इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे. ब-याच वृत्तपत्रांनीही रणछोडदास साहेबांविषयी भरभरून लिहिले आहे. मराठीत असे काही (माझ्यातरी) वाचनात आले नाही. मी जे वाचले त्याचाच हा स्वैर अनुवाद आहे. तपशीलात अर्थातच काही कमीजास्त असेल..दिलगीर आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या एका हिंदी युद्धपटात रणछोडदास यांची व्यक्तिरेखा दाखवली गेली, असे म्हणतात. संजय दत्तने ‘पगी’ कसा रंगवला असेल,देव जाणे ! हिंदी सिनेमावाले काय काय आणि कसे कसे दाखवतील याचा नेम नाही. असो. गुजराती लोकगीतांमध्ये रणछोडदास यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख होतो…यापेक्षा अधिक काय नाव मिळवावे एका सामान्य माणसाने? मन:पूर्वक सल्युट …. 

लेखक : संभाजी बबन गायके.

9881298260.

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments