श्री विनय माधव गोखले
इंद्रधनुष्य
☆ मरावे परी — एक सत्यकथा ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, “बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आजपर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल.”
त्याची मुलगी सारा म्हणाली, “बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही काहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवडू द्या.”
थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला.
तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली..
मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, ” तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ…..?
यावर सारा म्हणाली, “मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत.”
मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, ” ओहो, तू टॉम स्मिथची मुलगी आहेस? “
— पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, ” हा स्मिथ नावाचा मनुष्य तोच आहे बरं का, ज्याने ‘ Institute of Administrators ‘ या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती, आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं…”
इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, ” मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा…”
— सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हरसहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं.
नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली.
एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारल्या गेलं तेव्हा अश्रूभरल्या नेत्रांनी ती उत्तरली, ” माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिकदृष्ट्या जरी ते गरीब होते, तरी सचोटी, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते.
“आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?” — मुलाखतकाराच्या या प्रश्नावर त्या उत्तरल्या, ” माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून उठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही.”
मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला.
“मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल का?”—- यावर त्या म्हणाल्या, ” मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दिवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे काही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते.”
आपणही टॉम स्मिथसारखेच आहोत का..? —-
कीर्ती रूपाने शिल्लक राहता येऊ शकते. कीर्ती पसरायला आणि कीर्तीरूपाने जिवंत रहाण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो..सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणीव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे..आपल्या मुलाबाळांसाठी हा वारसा ठेवावा..
—आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू या आणि ही सत्यकथा आपल्या माणसांत अधिकाधिक शेअर करू या.
संग्राहक : श्री विनय माधव गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈