डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : १ ते ५ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ (अनेक देवतासूक्त)
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : ऋचा १ – ५ : देवता १ प्रजापति; २ अग्नि; ३-५ सवितृ
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चोविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले असल्याने हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा प्रजापतीला, दुसरी ऋचा अग्नीला, तीन ते पाच या ऋचा सवितृ देवतेला आणि सहा ते पंधरा या ऋचा वरुण देवतेला आवाहन करतात.
या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी प्रजापती, अग्नी आणि सवितृ या देवतांना उद्देशून रचलेल्या पहिल्या पाच ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद :
☆
कस्य॑ नू॒नं क॑त॒मस्या॒मृता॑नां॒ मना॑महे॒ चारु॑ दे॒वस्य॒ नाम॑ ।
को नो॑ म॒ह्या अदि॑तये॒ पुन॑र्दात्पि॒तरं॑ च दृ॒शेयं॑ मा॒तरं॑ च ॥ १ ॥
तेजोमयी या अमर देवता नामे मोहक त्यांची
कुणा कुणाचे स्तवन करावे भक्ती तर सर्वांची
भेटण्यास पितरांना माझ्या मनी आर्त जाहलो
कोणी न्यावे अदितीकडे आतुर मी जाहलो ||१||
☆
अ॒ग्नेर्व॒यं प्र॑थ॒मस्या॒मृता॑नां॒ मना॑महे॒ चारु॑ दे॒वस्य॒ नाम॑ ।
स नो॑ म॒ह्या अदि॑तये॒ पुन॑र्दात्पि॒तरं॑ च दृ॒शेयं॑ मा॒तरं॑ च ॥ २ ॥
अनलदेव हा थोर शिरोमणि अमरदेवतांचा
ध्यान करीतो आम्ही त्याच्या चारूनामाचा
तोच समर्थ आम्हास न्याया अदितीदेवतेपाशी
वंद्य आमुच्या पितरांचे आम्हा दर्शन द्यायाशी ||२||
☆
अ॒भि त्वा॑ देव सवित॒रीशा॑नं॒ वार्या॑णाम् । सदा॑वन्भा॒गमी॑महे ॥ ३ ॥
सदैव अमुचे रक्षण करीशी सवितृ देवते तू
स्पृहणिय जे जे विश्वामाजी त्यांचा स्वामी तू
आम्हा देउन संपत्तीचा भाग कृतार्थ करी
आम्हाप्रती रे सदा असावी प्रीति तुझ्या अंतरी ||३||
☆
यश्चि॒द्धि त॑ इ॒त्था भगः॑ शशमा॒नः पु॒रा नि॒दः । अ॒द्वे॒षो हस्त॑योर्द॒धे ॥ ४ ॥
भाग्य आम्हाला ऐसे लाभे तुझिया दिव्य कृपेने
समर्थ नाही कोणी त्याच्या निंदेला करणे
दुष्ट दुर्जनांपासून नाही तयासि काही बाधा
सारे काही तुझ्याच हाती हिरण्यगर्भादेवा ||४||
☆
भग॑भक्तस्य ते व॒यमुद॑शेम॒ तवाव॑सा । मू॒र्धानं॑ रा॒य आ॒रभे॑ ॥ ५ ॥
मनुजांना त्यांच्या भाग्याचा तूच देशी भार
भाग्य आमुचे आम्हा द्याया यावे हो सत्वर
लक्ष्मीप्राप्ती तुझ्या कृपेने आम्ही लक्ष्मीधर
धनसंपत्ती राशीवरती आम्ही असू सुस्थिर ||५||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
https://youtu.be/rOLw7X5u1cM
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 1 – 5
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈