सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
इंद्रधनुष्य
☆ आनंदमूर्ती स्वामी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
मला दिनांक 31 मार्च२३ रोजी ब्रह्मनाळला व्याख्यानाला जाण्याचा योग आला. त्यानिमित्ताने आनंदमूर्ति स्वामींची माहिती मिळाली .ती येथे देत आहे
आनंदमूर्ती स्वामींचे मूळ नाव अनंतभट होते. रघुनाथ स्वामी हे त्यांचे गुरु. रघुनाथ स्वामी एकदा परगावी गेले.आनंदमूर्तींना त्यांचा शोध घेण्यासाठी तीन वर्षे लागली. तीन वर्षानंतर ते भेटले तेव्हा दोघांना खूप आनंद झाला. स्वामी म्हणाले, अनंता, तीन वर्षे बायको मुले एकटी सोडून माझे स्वतःसाठी तू वणवण फिरलास ही एक तुझी तपसाधना झाली. माझ्यावरची तुझी निष्ठा पाहून मला खूप आनंद झाला तू माझ्या अंतर्यामीच्या आनंदाची मूर्ती आहे. आज पासून आम्ही तुला आनंदभट न म्हणता आनंदमूर्ती असेच नाव ठेवत आहोत. आम्ही तीन वर्षे जी साधना केली त्याचे पुण्यफल तुझे पुढील सात पिढ्यांचे योगक्षेम सुव्यवस्थित चालावेत म्हणून आशीर्वाद पूर्वक तुला अर्पण करीत आहे. यापुढे तुझ्या तोंडून जे शब्द निघतील ते सत्य होतील. आणि तसेच झाले. चिकोडीत सौ. कुलकर्णी बाई त्यांच्या दर्शनास आल्या. स्वामींनी आशीर्वाद दिला .”पुत्रवती भव”. बाई म्हणाल्या स्वामी माझे वय 60 आहे. स्वामी म्हणाले मी आशीर्वाद दिला तो सहजस्फूर्त होता.
अंतर्यामीच्या आत्म्याचे बोल आहेत. हे सत्य होणारच. दुसरे असे की एखाद्याने शाप दिला तर त्याला उ:शापाचा उतारा देऊन मुक्त करता येते. परंतु दिलेला शुभाशीर्वाद परत घेता येत नाही .तुम्हाला एक वर्षाचे आत मुलगा होऊन वंश वाढेल हे निश्चित. त्याप्रमाणे त्या बाईंना मुलगा झाला. त्यांचा वंश पुढे वाढत गेला.
रघुनाथ स्वामी आणि आनंदमूर्ती तीन वर्षांनी वसगडे येथे परत आले. अनेक भक्त स्वामींना गाई भेट देत. संध्याकाळचे स्नान संध्या करण्यासाठी स्वामी नदीवर जात. येताना दान मिळालेल्या गाई ,दुपारी रानात चरायला सोडलेल्या गाई स्वामी परत आणून गोठ्यात बांधीत.गाईंचे गोठ्याजवळ एक मोठी चतुष्कोनी शिळा होती. त्यावर बसून स्वामी ध्यानधारणा करत. पुढे त्या शिळेवर मारुतीची मूर्ती स्पष्ट दिसू लागली. स्वामींचे समाधीनंतर त्या स्वयंभू मारुतीची शिळा ग्रामस्थानी आजच्या श्री लक्ष्मी मंदिरात स्थापन केली. त्या शिळेला श्री रघुनाथ स्वामी असे संबोधतात. त्या मूर्तीची नित्य पूजाअर्चा करतात.रघुनाथ स्वामी आनंदमूर्तीना घेऊन संगमावर आले. स्वामी म्हणाले हे संगमस्थान पवित्रांमध्ये पवित्र आहे. देह त्यागास हे स्थळ उत्तम आहे.
स्वामी म्हणाले एका व्यक्तीने कितीही कार्य केले तरी ते अपुरेच असते .पुढच्या लोकांनी ते कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे. जगदोध्दाराचे जे कार्य अपुरे राहिले ते तू पुढे चालू ठेव. जनता जनार्दनाला जप ,तप, भक्ती मार्गाचा उपदेश करून आत्मोद्धाराचा मार्ग दाखव. स्वराष्ट्र आणि स्वधर्म याची जाणीव देऊन त्याच्या रक्षणाची त्यांच्या मनात प्रेरणा उत्पन्न कर. आनंदमूर्तीना उपदेश करून स्वामींनी देहत्याग केला. त्यांच्या इच्छेप्रमाणे देह दहनाकरता संगमावर आणला. पण ब्रह्मनाळचे ग्रामस्थांनी परगावचे प्रेत म्हणून आपल्या गावी दहन करण्यास नकार दिला. मग आनंदमूर्तिनी संगमाकाठी ४० हात लांब रुंद जागा पंधरा होन देऊन विकत घेतली. त्या ठिकाणी स्वामींच्या पार्थिव देहाचे यथाविधी दहन केले. दहनस्थानी उत्तर कार्य करून स्वामींच्या पादुका स्थापन केल्या. पादुकांवर आच्छादन म्हणून त्यावर वृंदावन बांधले. बांधकाम वरच्या थरापर्यंत येताच वृंदावन थरारले आणि वृंदावनाचा थर पूर्णपणे पडला. असे चार वेळा झाले. आनंदमूर्ती पादुकांसमोर एक दिवस एक रात्र निर्जली उपोषण करीत बसले. स्वामी, वृंदावन बांधण्याची आमची मनोमनीची इच्छा आहे. कृपावंता, कृपा करून बांधकाम पूर्ण होऊ द्या. लाडक्याची इच्छा जाणून स्वामींनी पहाटे स्वप्नात दृष्टांत दिला. यापुढे बांधकामात व्यक्त येणार नाही. वृंदावनाचे बांधकाम सुरू झाले. रंग दिला. एका बाजूस शिवपंचायतन आणि दुसऱ्या बाजूस रामपंचायतनाची चित्रे रेखाटली. वास्तु्पूजा केली. आरती झाली. कीर्तन सुरू झाले आणि वृंदावन डोलले. फुलांचे हार हालले. वृंदावनाचा हा पहिला डोल.रघुनाथ स्वामींनी आनंदमूर्तींना निर्याणापूर्वी संगमस्थानी आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या जागृत अस्तित्वाची जाणीव दिली. श्री समर्थ रामदास स्वामींना हे कळले. ते ब्रह्मनाळला आले. पादुकांची पूजा केली आणि वृंदावनाचा डोल झाला. स्वामींना खूप आनंद झाला. ते म्हणाले
जळघी गिरिशिळांनी सेतु बांधी तयाचे |
नवल नच शिवाही ध्यान ते योगियाचे ||
अभिनव जगी तुझी कीर्ती आनंदमूर्ती |
अचळ दगड प्रेमे डोलती थोर ख्याती ||
रघुनाथ स्वामींच्या पहिल्या वर्षाची पुण्यतिथी होती. त्यादिवशी चाफळहून रामदास स्वामी, वडगाहून जयराम स्वामी, निगडीहून रंगनाथ स्वामी, कराडचे निरंजन स्वामी, अनेक अन्य साधुसंत, स्वामी ,वैदिक ब्राह्मण ,कथा- कीर्तनकार, भक्त मंडळी आली. सर्वांनी शिधा आणला होता. तो एकत्र करून भात व वरण फळे करून तो दिवस “फळ पाडवा” म्हणून साजरा केला .भाद्रपद शुद्ध द्वितीयेचा पुण्यतिथीचा दिवस उत्साहात संपन्न झाला. तिसरे दिवशी रामदास स्वामींच्या सांगण्यावरून गोपाळकाला केला. त्या दिवशी स्वतः रामदासांनी कीर्तन करून पहिला पुण्यतिथी उत्सव पूर्ण केला.
आनंदमूर्तींनी कांही आरत्या रचल्या. त्यातून बरीच माहिती मिळते. सध्या तिथे पाडवा ते दशमी उत्सव असतो. रहायला खोल्या बांधल्या आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी येऊन रहातात. सेवा करतात. दहा दिवस सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. राम जन्माचे कीर्तन झाले की तिथे डोल होत असे. दगड चुन्यात बांधलेल्या वृंदावनाचा डोल हे लोकांना पटत नव्हते. अनेकांनी प्रत्यक्ष पाहूनच खात्री केली होती. आनंदमूर्तींना खूप परीक्षा द्याव्या लागल्या. एकदा चोर त्यांच्या मागे लागले पण त्या चोरांना यांच्याबरोबर दोन धनुर्धारी तरुण दिसले. त्यामुळे त्यांना चोरी करता आली नाही. त्यांनी सांगलीत पोचल्यावर आनंदमूर्तींना ते धनुर्धारी कोण असे विचारले. तेव्हा आनंदमूर्तींना काहीच कल्पना नव्हती. ते म्हणाले आमचे गुरु रघुनाथ स्वामींनी ही अघटित घटना घडवून आणली. धनुर्धारी रूपात तुम्हास त्यांचे दर्शन झाले. तुम्ही पुण्यवान आहात. आता हा व्यवसाय सोडा आणि चांगले आयुष्य जगा. चोरांनी ते ऐकले.
स्वामींना आपल्या अवतार समाप्तीची जाणीव होऊ लागली. थोरला मुलगा कृष्णाप्पा याला बोलावून त्यांनी माझ्यामागे गुरु रघुनाथ स्वामींच्या पादुकांची पूजा, ब्रम्हनाळ गावचे इनाम, मठ, शेती, स्थावर जंगम मालमत्तेची व्यवस्था, वार्षिक उत्सव, आल्या गेल्या भक्तांची वास्तव्य व भोजनाची कायम व्यवस्था करण्यास सांगितले. त्याला समोर बसवून कानात तत्वमसी-“सोऽहं”मंत्राचा उपदेश केला. भूमध्यावर अंगठ्याने दाब देताच त्याची समाधी लागली. काही वेळानंतर त्याच्या डोळ्यास पाणी लावून त्यांनी समाधी उतरवली. व सांगितले तू दिवसा संसार व देवस्थानचा व्यवहार व ब्राह्ममुहूर्ती जप ,तप, ध्यान करत रहा.
आनंदमूर्तींनी पूजा आटोपली. बाहेर भक्तमंडळींना सांगितले आज वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. या पुण्यदिवशी आम्ही देह त्याग करणार. देह त्यागानंतर सत्वर ब्रम्हनाळ येथे श्री गुरु रघुनाथ स्वामींचे वृंदावनासमोर आमचा देह दहन करा. नरसोबाच्या वाडीचे नारायण स्वामी दर्शनास आले असता ते दोघांच्या वृंदावनामध्ये बसून ध्यान करू लागले आणि दोन्हीही वृंदावने डोलू लागली.
ब्रम्हनाळ मठाची उपासना श्रीरामाची. इथे रामनवमी ,महाशिवरात्र, रघुनाथ स्वामी व आनंदमूर्तींचे पुण्यतिथी उत्सव व अन्य काही लहान उत्सव कार्यक्रम होतात. सज्जनगडचे श्रीधर स्वामी सुद्धा ब्रह्मनाळला आले होते . त्यावेळी डोल पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या ज्या वेळी वृंदावन समाधीसमोर वेद घोष होतो व भक्तिभावाने भजन, कीर्तन, नाम संकीर्तन, प्रवचने, साधुसंत करतात व ब्रह्मनिष्ठ योगी ,तपस्वी पुरुष दर्शनास येतात त्यावेळी वृंदावन डोलते असा अनुभव आहे.
नरसोबाच्या वाडीचे नारायण स्वामी दर्शनास आले असता ते दोघांच्या वृंदावनामध्ये बसून ध्यान करू लागले आणि दोन्हीही वृंदावने डोलू लागली.
परम कठीण शीला- डोलवी वृक्ष जैसा |
जननी जठर कोषी जन्मला कोण ऐसा ||
हरिभजन प्रतापे ख्याती झाली दिगंती |
अनुदिनु स्मरचित्ता श्री आनंदमूर्ती ||
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈