श्री मकरंद पिंपुटकर
🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
पत्रकार रजत सरदेसाई एका MD (आयुर्वेद) डॉक्टरांची मुलाखत घ्यायला चालले होते. बरोबर त्यांचा मित्र बंड्या काळे होताच. डॉक्टरांनी मुलाखतीचे शीर्षक “मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे” हेच राहणार असेल तरच मुलाखत देईन असं म्हटल्याने हे दोघं बुचकळ्यात पडले होते. बंड्याला तर ब्राझीलमधील चिकिन्हो स्कार्पा या अब्जाधीशाची आठवण आली. त्याने, मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, त्याच्या चार कोटी रुपयांच्या बेंटली गाडीचं शाही इतमामात दफन करायचं घोषित केलं होतं.
“तो स्कार्पा आणि हे डॉक्टर, दोघेही विक्षिप्तपणाबाबतीत एकाच माळेचे मणी दिसतायत,” असं म्हणत म्हणत, बंड्या आणि रजत, मुलाखत देणाऱ्या दादर, मुंबईच्या डॉ. सुयोग कुळकर्णी यांच्याकडे पोचले.
रजतने भेटल्याभेटल्या मुद्द्यालाच हात घातला, “सर, कटाक्षाने आयुर्वेदिकच प्रॅक्टिस करणारे म्हणून तुमचा छान नावलौकिक आहे. पण मुलाखतीचे शीर्षक हेच हवे हा तुमचा अट्टाहास का ? याबद्दल काही सांगाल का, प्लीज ?”
“होय. पहिल्याप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल मला कोणतेही प्रमाणपत्र अथवा पुरस्कार नकोय. तो तर माझा पेशाच आहे, त्याबद्दल मी फी – पैसे आकारतो. त्यामुळे त्याबद्दल वेगळा पुरस्कार मागणं, हे मला तरी पटत नाही. कदाचित माझं बोलणं तुम्हाला extreme वाटेल. पण असं आहे बघा की, खेळाडू असो, वा चित्रपट अभिनेता, किंवा अगदी एखादा शास्त्रज्ञ – या सगळ्या जणांना त्यांच्या उपजीविकेच्या साधनांसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पद्म पुरस्कार दिले जात आहेत. पण मी जे काम करतो ते पूर्ण निस्वार्थीपणे, अगदी नव्या पैशाचाही फायदा न घेता. आणि शिवाय ते समाजाच्या प्रचंड उपयोगाचे आहे. म्हणूनच माझे ठाम प्रतिपादन आहे की ” मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे ! “ डॉक्टर शांतपणे पण आग्रहाने बोलत होते.
“पण असं तुम्ही काय जगावेगळं करता ?” न राहवून शेवटी बंड्याने मध्ये नाक खुपसलंच.
“मी प्लेटलेट डोनर आहे.”
बंड्याच्या चेहऱ्यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह.
“बंडूदादा, पांढऱ्या रक्तपेशी (white blood cells WBC), तांबड्या रक्तपेशी (red blood cells RBC) यांच्याप्रमाणे प्लेटलेट या आपल्या रक्तात असतात. WBC, RBC यांच्यापेक्षा आकारात खूपच लहान. एक मिलीलिटर रक्तात तब्बल अडीच लाखांहून जास्त प्लेटलेट्स असतात. जखम झाल्यावर आलेले रक्त थांबवणे हे यांचं प्रमुख काम,” रजतने थोडक्यात प्लेटलेट्सची कुंडली मांडली.
“हां, हां. ते त्या पलीकडच्या गल्लीतील राजूच्या वडिलांना डेंग्यू झाला होता, तेव्हा त्यांच्या या प्लेटलेट कमी झाल्या वगैरे ऐकलं होतं. अरे, पण रक्तदान ऐकलं होतं, ही प्लेटलेट डोनेशन काय भानगड आहे ?” बंडूतील शंकासूर काही शांत होईना.
“ज्या पेशंटच्या रक्तातील प्लेटलेट संख्या कमी आहे, अशांची जर मोठी शस्त्रक्रिया होणार असेल, किंवा काही अपघात वगैरे झाला असेल तर त्यांना प्लेटलेट्स द्याव्या लागतात. ” – डॉक्टर साहेब. “आणि दुसरा मोठा गट म्हणजे कॅन्सर पेशंट्सचा. कॅन्सर उपचारातील केमोथेरपीचा एक वाईट साईड इफेक्ट म्हणजे याने प्लेटलेट्सची संख्या लक्षणीयरित्या कमी होते.”
“सर, खरं सांगू का, मला एक कळलं नाही”, बंडू निरागसपणे आपलं घोडं पुढं दामटत होता, ” की समजा झाल्या रक्तातील प्लेटलेट्स कमी, तर एवढं काय आकाश कोसळणार आहे ? म्हणजे, तुम्ही म्हणता तसं ज्यांना अपघात झाला आहे, जखम झाली आहे, शस्त्रक्रिया झाली आहे अशांचं ठीक आहे एक वेळ, पण बाकी असा कुठे आपल्याला एवढा रक्तस्त्राव होतो की जो थांबवायला या अशा इतरांकडून घेतलेल्या प्लेटलेट्स घ्याव्या लागतील ?”
बंड्याच्या अश्या या un-diplomatic बोलण्याने रजत चांगलाच कावराबावरा झाला, पण त्याला आश्र्वस्त करत डॉक्टरसाहेब सांगू लागले, ” सर्वसामान्यांना कल्पना नसते पण दैनंदिन जीवनात असंख्य वेळा आपल्या शरीरात सूक्ष्म रक्तस्त्राव होत असतात. जोरात शिंकलात, किंवा शौचाला जरा जास्त जोर केलात तरी रक्तस्त्राव होतो. ज्यांच्या प्लेटलेट्सची संख्या सुयोग्य आहे, अशांच्या शरीरात हा रक्तस्त्राव इतक्या बेमालूमरीत्या आणि इतक्या सहजी आणि इतक्या लगेच थांबवला जातो की ते आपल्याला कळतही नाही आणि त्यामुळे त्याचं महत्त्वही उमगत नाही. पण जर हे छोटे छोटे रक्तस्त्राव थांबले नाहीत तर त्याचं पर्यवसान internal haemorrhage (हॅमरेज) मध्ये होतं आणि पेशंटच्या जीवालाही धोका होऊ शकतो. आणि कर्करोगाच्या पेशंटसची रोगप्रतिकार क्षमता अशीही कमी झाली असते, त्यामुळे त्यांच्याबाबतीत अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.”
डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून बंडूला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं.
–क्रमशः भाग पहिला
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈