डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १५ ते २१ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा १५ ते २१
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या पंधरा ते एकवीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
उ॒त यो मानु॑षे॒ष्वा यश॑श्च॒क्रे असा॒म्या । अ॒स्माक॑मु॒दरे॒ष्वा ॥ १५ ॥
समस्त मनुजांनी पाहिली यशोपताका यांची
यशोदुन्दुभी दिगंत झाली दाही दिशांना यांची
अपुल्या उदरामध्ये यांनी कीर्तीपद रचियले
त्यायोगे ते विश्वामध्ये कीर्तिमंत जाहले ||१५||
☆
परा॑ मे यन्ति धी॒तयो॒ गावो॒ न गव्यू॑ती॒रनु॑ । इ॒च्छन्ती॑रुरु॒चक्ष॑सम् ॥ १६ ॥
किती प्रार्थना रचुन गाईल्या भक्तीप्रेमाने
त्यांच्याचिकडे वळूनी येती किती आर्ततेने
बुभुक्षीत झालेल्या धेनु घराकडे वळती
अमुची अर्चना अर्पित होते यांच्या चरणांप्रती ||१६||
☆
सं नु वो॑चावहै॒ पुन॒र्यतो॑ मे॒ मध्वाभृ॑तम् । होते॑व॒ क्षद॑से प्रि॒यम् ॥ १७ ॥
देवांनो या वेदीवरती करण्या संभाषण
तुम्ही येता करीन हवीला भक्तीने अर्पण
स्वीकारुनी घेण्याला आहे हवी सिद्ध आतुर
झणि येउनिया यज्ञी करी रे हविर्भाग स्वीकार ||१७||
☆
दर्शं॒ रथ॒मधि॒ क्षमि॑ । ए॒दर्शं॒ नु वि॒श्वद॑र्शतं॒ ता जु॑षत मे॒ गिरः॑ ॥ १८ ॥
दिव्य रूपाने विश्वामध्ये ख्यातनाम झाला
धन्य जाहलो आज जाहले दर्शन हो मजला
या अवनीवर शकट तयाचा नयनांनी देखिला
प्रसन्न होऊनी मम स्तोत्रांचा स्वीकार केला ||१८||
☆
इ॒मं मे॑ वरुण श्रुधी॒ हव॑म॒द्या च॑ मृळय । त्वाम॑व॒स्युरा च॑के ॥ १९ ॥
वरूण देवा साद घालितो माझ्या जवळी या
अक्षय मजला सुखा अर्पिण्या वर द्यायला या
मनात धरिल्या कामनेची मम पूर्ति कराया या
पूर्ण कृपेचा आशीर्वच आम्हाला द्याया या ||१९||
☆
त्वं विश्व॑स्य मेधिर दि॒वश्च॒ ग्मश्च॑ राजसि । स याम॑नि॒ प्रति॑ श्रुधि ॥ २० ॥
प्रज्ञामती हे चंडप्रतापी थोर तुम्ही देवा
अवनीवरती स्वर्गामध्ये तुमचे सुराज्य देवा
तुमच्या चरणी आर्जव अमुचे लीन होउनी देवा
पदरी अमुच्या आश्वासन देउनिया जावे देवा ||२०||
☆
उदु॑त्त॒मं मु॑मुग्धि नो॒ वि पाशं॑ मध्य॒मं चृ॑त । अवा॑ध॒मानि॑ जी॒वसे॑ ॥ २१ ॥
पाश-बंधने आम्हावरची शिथील कर देवा
चिरायु होउन आयुष्याचा भोग आम्ही घ्यावा
किती जखडती कायेच्या मध्ये खाली बंधने
मुक्त करी या पाशांमधुनी अपुल्या आशिर्वचने ||२१||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीत रुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 15 – 21
Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 15 – 21
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈