सुश्री शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ चांगदेव पासष्ठी – भाग-11… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆
डोळ्याचे चित्र काढले डोळ्यावरी
ते पाहे डोळा, चलबिचल न करी
दृश्य द्रष्टा दर्शन नुरे त्रिपुटी
जंव आत्म्यास आत्मा भेटी॥५१॥
ऐशा भेटी कैसे बोलणे वा पाहणे
मीतूपणाविण सिद्धभेटी भेटणे॥५२॥
अशी निरुपाधिक भेट अनुवादिली
कल्पनातीत ती मीही अनुभविली
आता मीतूपणाच्या टाकून उपाधी
आत्म्यांच्या भेटीची तू अनुभव सिद्धी॥५३॥
जसे कोणी जेंव्हा आरशात पहातो
द्रष्टाच दृश्य बनून स्वतःस बघतो
माझे ठायी परमात्मा वसतो
मला पाहता तुज तो दिसतो
तुझ्या मध्येही तोच वसतो
तुला पाहता मज तो दिसतो
जशी चवीने चवीची चव घ्यावी
मज माझी, तुज तुझी भेट व्हावी॥५४॥
तशी सिद्धांतांना साध्य बनवुनि
मौन शब्दांची रचना सुंदर करुनि
आपणासि आपण गोष्टी करावी
अद्वैत स्वरूपाची, मौनाकरवी॥५५॥
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈