सुश्री शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ चांगदेव पासष्ठी – भाग-12… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆
या आपुल्या भेटीद्वारे अरूप
तुज दाविले तव आत्मस्वरूप
निजप्रकाशे पाही दीप स्वरूप
तैसे पाही तू तव ब्रम्हस्वरूप॥५६॥
उघडी तव अंतःचक्षु चांगया
कार्यकारण जाण भेटी या॥५७॥
महाप्रलयी पाणी जैसे दावी
सर्वात्म एकरूपता एकार्णवी
उगम, प्रवाह, संगम न उरे
न राहती नामे, रूपे, आकारे
एकरूप होती एकमेकांशी
तसेच हो समरूप अर्णवांशी
तसाच तूही उगम तुझा गिळुनि
तद्रूप हो अज्ञान सर्व सांडुनि॥५८॥
नाम रूपा वेगळे आत्मस्वरूप
हो सुखी जाणुनि स्वानंद रूप॥५९॥
नश्वर देह, रूप, मन, बुद्धी
सांडुनि, जाण आत्मसिद्धी
अंतःकरणी येता ही ज्ञानसंपत्ती
ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान न राही त्रिपुटी
सच्चिदानंद पदी आरूढ होवा
सांगे ज्ञानया तुजप्रती चांगदेवा॥६०॥
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈