इंद्रधनुष्य
☆ पर्वती चा वर्धापन दिन… श्री रमेश भागवत – संकलन श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆
१७ मे — पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या #पर्वती चा वर्धापन दिन.
वैशाख शुध्द पंचमी हा पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराचा स्थापना दिवस.
— मातुश्री काशीबाई बाजीराव पेशवा यांनी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आज्ञेप्रमाणे चिरंजीव श्रीमंत नानासाहेब पेशवा व त्यांच्या पत्नी श्रीमंत गोपीकाबाई पेशवा यांनी सन १७४९ मध्ये या दिवशी श्री देवदेवेश्वराची स्थापना केली. याला आज दिनांक १७ मे २०२३ रोजी २७४ वर्ष पूर्ण होत आहेत. या दिवशी आद्य शंकाराचार्य जयंती सुध्दा साजरी केली जाते. हिंदू धर्मातील विविध पंथाना एकत्र आणण्यासाठी श्री शंकराचार्यानी पंचायतन पूजा पध्दती निर्माण केली अशी मान्यता आहे. त्यांच्या चतुर कल्पकतेचे पर्वतीवरील श्री देवदेवेश्वर शिवपंचायतन हे एक उदाहरण असून या पंचायतनामधे वायव्य कोप-यात मूळ देवी श्रीपर्वताईदेवी या तावरे घराण्याच्या कुलस्वामीनीचाही समावेश करण्यात आला आहे.
पुण्याचाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानचा मानबिंदू असलेले पर्वती हे एक ठिकाण आहे. पेशवाईतील किंबहुना मराठेशाहीतील सर्व चढ-उतार या देवस्थानाने अनुभवलेले आहेत. याची एक मुकी साक्ष पर्वतीवर चाफ्याच्या झाडाच्या रूपाने अजूनही उभी आहे, कारण त्या झाडालाही अंदाजे २५० वर्ष पूर्ण झालेली आहेत. पर्वतीचे आताचे दिसणारे स्वरूप हे विविध पेशव्यांनी त्यांच्या कारकीर्दीतच पूर्ण केलेले आहे.
पर्वती हे पुणेकरांना उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी मदत करणारी व्यायाम शाळा आहे असे म्हणणे उचित ठरेल. असंख्य यु. पी. एस. सी., एम. पी. एस. सी. स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थ्यासह जेष्ठ नागरिक, तरुण मंडळी पर्वतीवर सकाळ संध्याकाळ अंगमेहनत करतांना दिसतात. तसेच गेली कित्येक वर्ष हनुमान व्यायाम मंडळ, पसायदान मंडळ, पर्वती मंडळ आपल्या परीने पर्वतीचे महत्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न संस्थान- -बरोबर करत आहेत.
१९५० साली पर्वतीच्या आजूबाजूस काही भागावर वन खात्याने वनीकरण करून वृक्ष जोपासना केली आहे. तसेच मध्यंतरीच्या काळात कै. डॉ. रमेश गोडबोले व श्री देवदेवेश्वर संस्थानने संस्थानच्या जागेत वृक्षारोपण केले आहे. हाच वारसा गेल्या पाच सहा वर्षापासून ‘ पर्वती हरितक्रांती संस्था ‘ यांच्या माध्यमातून पुढे उत्तम प्रकारे सुरू आहे. पर्वतीचे जुने स्वरूप कायम ठेऊन पर्वतीवर सध्या स्थानिक आमदार व नगरसेवक यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे सुरू आहेत.
पानिपताच्या पराभवाचा धक्का सहन न होऊन श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर देह ठेवला. त्यांचे व पानिपत रण संगामात बलिदान दिले अशा शूर वीरांचे स्मारक पर्वतीवर उभारले जाणार आहे. १४ जानेवारी २०१५ रोजी त्याची प्रतिकात्मक सुरुवात विद्यमान पेशवे कुटुंबियांच्या हस्ते जरीपटका लावून करण्यात आली आहे. या ठिकाणी इतिहास आधारभूत पानिपत युद्धात वीरमरण आलेल्या २६५ योद्ध्यांचा नामनिर्देश करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात येथे युध्द स्मारक करण्याचे काम प्रगतीपथावर असून या ठिकाणी संरक्षणासह इतर सेवा दलातील राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची नोंद घेण्याचा प्रयत्न आहे.
तसेच इसवी सनाच्या सुरवातीपासून महाराष्ट्रावर राज्य केलेल्या विविध घराण्यांचा त्यांच्या कारकीर्दीच्या कालखंडासह त्यांनी केलेला पराक्रम म्युरलच्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे.
पर्वतीची महती ही पुणेकरांसह सर्वांनाच आहे हे सांगणारे उत्तम उदाहरण म्हणजे श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत पर्वतीचे तत्कालीन अव्वल कारकून श्री चिंतामण भिकाजी डिके यांनी सन १९१४ साली लिहिलेली ‘पर्वती संस्थानाचे वर्णन’ ही पुस्तिका.
स्वातंत्र प्राप्तीनंतर १९५० मध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान सार्वजनिक विश्वस्त निधि (Public Trust) म्हणून नोंदले गेले. मा. जिल्हाधिकारी, पुणे, हे संस्थानचे पदसिध्द विश्वस्त असून यांच्या समवेत इतर प्रतिष्ठित पंच मंडळी संस्थानचा कारभार पहातात.
श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत पर्वतीवरील मंदिरे, वास्तुसह पुण्यातील इतर मंदिरे —
श्री देवदेवेश्वर मंदिर, श्री विष्णू मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री कार्तिकस्वामी मंदिर, श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा वाडा व निधनस्थान, पेशवेकालीन अनेक सुंदर आणि प्रेक्षणीय वस्तूंचा संग्रह असलेले पेशवा संग्रहालय. इतर मंदिरे– श्री सिध्दिविनायक मंदिर, सारसबाग, श्री दशभुजा गणपती मंदिर, पौड फाटा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड, श्री रमणा गणपती मंदिर लक्ष्मीनगर, श्री काळी जोगेश्वरी मंदिर बुधवार पेठ, श्री राम मंदिर, ७३४ सदाशिव पेठ, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवा यांची समाधी सासवड.
या व्यतिरिक्त पुण्यातील ऐतिहासिक ३४ देवालयांना संस्थानकडून वर्षासन (अनुदान) दिले जाते. या निमित्ताने या संस्थानशी श्री देवदेवश्वर संस्थानचा ऋणानुबंध आहे.
लेखक : श्री रमेश भागवत
(संस्थानचे विद्यमान विश्वस्त)
संकलन : श्री संजीव वेलणकर
पुणे
प्रस्तुती : माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈