डाॅ. शुभा गोखले
इंद्रधनुष्य
☆ शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू : डॉ. श्रीकांत जिचकर… ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆
एकच माणूस डॉक्टर होता, तो वकीलही होता, तो आयपीएस अधिकारी तसंच आयएएस अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो कीर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता.
इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे “श्रीकांत जिचकर” होय.
“ शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू “ म्हणून संबोधता येईल असं नाव म्हणजे श्रीकांत जिचकर होय.
— अवघ्या ४९ वर्षांचं जीवन, ४२ विद्यापीठं, २० पदव्या आणि २८ सुवर्णपदकं —
हा एवढा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला. आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम
असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच पदव्या मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकर यांच्या नावावर जमा आहे.
जिचकरांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे. जिचकरांनी १० विषयांत एमए. केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास-संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा समावेश आहे. जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवीही मिळवली.
जिचकरांनी मिळविलेल्या या बहुतेक पदव्या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत. श्रीकांत जिचकर यांची भारतातील सर्वात शिक्षीत व्यक्तींच्या पंक्तीत गणती होते. या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने, ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष
वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं. जिचकार यांनी १९७८ साली यूपीएससीची परीक्षा दिली. यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षांत म्हणजे १९८० साली त्यांनी आयएएसची पदवी देखील घेऊन टाकली.
विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला. या बुद्धिवंताने वयाच्या २५ व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकर महाराष्ट्र विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण आमदार होते.
जिचकरांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता.
यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली. १९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. जिचकर १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठीही काम केले.
जिचकर यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याशा गावात झाला. जगातील सर्वांत हुशार १० विद्यार्थ्यांमध्ये (Brilliant स्टुडंट) “ पहिल्या क्रमांकामधे बुद्धिमान “ म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. त्यांनी जगभर शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.जिचकर यांनी जगातले पहिले ‘ कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय ‘ रामटेक, नागपूर येथे सुरू करून जगभर आपल्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला. जिचकर यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचा डॉ. श्रीकांत जिचकर नावाच्या या कर्मयोगी अवलीयास आदरपूर्वक सलाम…
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈