श्री राजीव गजानन पुजारी
इंद्रधनुष्य
☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
१. सूर्य
सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आणि सौरमंडलातील सर्वात मोठा गोलक आहे. त्याच्या अनेक नावांपैकी आदित्य हे एक नांव आहे. सूर्याचे वय ४.५ अब्ज वर्षे आहे. हा हायड्रोजन व हेलियम वायूंचा अति उष्ण व तेजस्वी अंतरिक्ष गोलक आहे. तो पृथ्वीपासून १५० दशलक्ष किलोमीटर अंतरावर असून तो आपल्या सौरमंडळाचा ऊर्जा स्त्रोत आहे. आपणास माहीतच आहे की सौरशक्ती शिवाय पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व शक्य नाही. सूर्याचे गुरुत्वाकर्षण सूर्यमालेतील सर्व वस्तूंना एकत्र ठेवते. सूर्याच्या मध्यवर्ती भागाला गाभा (core) म्हणतात. तेथील तापमान अगदी १५ दशलक्ष अंश सेंटीग्रेड पर्यंत पोहोचू शकते. या तापमानाला तेथे अण्विक संमिलन (nuclear fusion) नावाची प्रक्रिया घडते. या प्रक्रियेमुळे सूर्याला अव्याहत ऊर्जा मिळत असते. आपणास दिसणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाला दीप्तीमंडल (photosphere) म्हणतात हा सापेक्षरित्या ‘थंड’ असतो. येथील तापमान ५५०० अंश सेंटीग्रेड एवढे असते.
२.सूर्याचा अभ्यास कशासाठी?
सूर्य हा आपला सर्वात जवळचा तारा आहे. त्यामुळे इतर ताऱ्यांच्या तुलनेत त्याचा अभ्यास आपणास सांगोपांगपणे करता येतो. सूर्याच्या अभ्यासामुळे आपल्याला आपल्या आकाशगंगेतील इतर ताऱ्यांविषयी तसेच इतर विविध दीर्घिकांमधील ताऱ्यांविषयी खूप अधिक माहिती मिळू शकते. सूर्य हा खूप चैतन्यशील तारा आहे. आपण पाहतो त्यापेक्षा त्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्याच्यावर सतत उद्रेक होत असतात, तसेच तो सौरमंडळात अमाप ऊर्जा उत्सर्जित करीत असतो. जर असे उद्रेक पृथ्वीच्या दिशेने घडत असतील तर त्यामुळे आपल्या भूमंडळावर (पृथ्वी जवळचे अंतरिक्ष) दुष्परिणाम होतात. अंतराळयाने आणि दूरसंवाद प्रणालींवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा उद्रेकांविषयी आगाऊ सूचना मिळणे श्रेयसस्कर असते. याशिवाय एखादा अंतराळवीर जर थेटपणे या उद्रेकात सापडला तर त्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. सूर्यावर घडणाऱ्या औष्णिक व चुंबकीय घटना अगदी टोकाच्या असतात. त्यामुळे ज्या गोष्टी आपण प्रयोगशाळेत शिकू शकत नाही त्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सूर्य ही एक नैसर्गिक प्रयोगशाळा आहे.
३.अंतरिक्ष वातावरण
आपल्या पृथ्वीवर सूर्य उत्सर्जन, उष्णता, सौरकण आणि चुंबकीय क्षेत्र यांद्वारे सतत परिणाम करत असतो. सूर्याकडून सातत्याने येणाऱ्या सौरकणांना सौर वारे म्हणतात व ते प्रामुख्याने उच्च उर्जायुक्त प्रकाशकणांनी (photons) बनलेले असतात. आपल्या संपूर्ण सौरमंडळावर सौर वाऱ्यांचा परिणाम होतो. सौरवाऱ्यांबरोबरच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा पण पूर्ण सौरमंडळावर परिणाम होतो. सौरवाऱ्यांसोबतच सूर्यावर होणाऱ्या उद्रेकांचाही सूर्याभोवतालच्या अंतराळावर परिणाम होतो. अशा घटनांच्या वेळी ग्रहांजवळील चुंबकीय क्षेत्र व भारीतकण यांच्या वातावरणात बदल घडतो. पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र व अशा उद्रेकांनी वाहून आणलेले चुंबकीय क्षेत्र यांच्यातील अन्योन्यक्रियेमुळे पृथ्वीजवळ चुंबकीय अस्वस्थता (magnetic disturbance) निर्माण होते, त्यामुळे अंतरिक्ष मालमत्तांच्या (space assets) कामात विघ्न येऊ शकते.
पृथ्वी व इतर ग्रह यांच्या भोवतालच्या अंतरिक्षतील पर्यावरणाच्या स्थितीमधील सतत होणारे बदल म्हणजे अंतरिक्ष वातावरण होय. अंतरिक्ष वातावरण जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण अंतराळात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. पृथ्वीनजीकच्या अंतरिक्ष वातावरणाच्या अभ्यासामुळे आपणास इतर ग्रहांनाजीकच्या अंतरिक्ष वातावरणाच्या वर्तनाचा अंदाज येईल.
४.आदित्य एल-१ संबंधी माहिती
आदित्य एल-१ ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी योजलेली अंतराळस्थित वेधशाळा वर्गाची पहिली भारतीय मोहीम आहे. हे अंतराळयान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लँग्रेजीयन बिंदू १ (एल-१) च्या आभासी कक्षेत (halo orbit) स्थित करण्यात येणार आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. एल-१ भोवतालच्या आभासी कक्षेत यान स्थिर केल्यामुळे ते कोणतेही पिधान (occultation) किंवा ग्रहण (eclips) यांचा अडथळा न येता सतत सूर्याभिमुख राहून सातत्याने सूर्यावरील घडामोडींवर लक्ष ठेवू शकेल. या यानावर सात अभिभार आहेत. हे अभिभार विद्युतचुंबकीय आणि कणशोधक (electromagnetic and particle detectors) वापरून सूर्याचे दीप्तीमंडल (photophere), वर्णमंडल (chromosphere) आणि प्रभामंडल किंवा किरीट (corona) यांचा अभ्यास करतील. एल -१ या सोयस्कर बिंदूचा फायदा घेऊन चार अभिभार थेट सूर्याचा वेध घेतील व उरलेले तीन अभिभार एल -१ या लँग्रेज बिंदू जवळील सौरकण आणि चुंबकीय क्षेत्र यांचा अभ्यास करतील. आदित्य एल-१ वरील अभिभारांमुळे आपणास सूर्याच्या वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या थराचे म्हणजेच प्रभामंडल किंवा किरीट याचे (corona) अति तप्त होणे, प्रभामंडलामधील वस्तूमानाचे उत्सर्जन (Coronal Mass Ejection- CME), सौरज्वालांपूर्वीच्या व सौरज्वालांवेळच्या घडामोडी व त्यांची वैशिष्ट्ये , सूर्याभोवतालच्या वातावरणाची गतिशीलता (dynamics), सौर कणांचे व चुंबकीय क्षेत्रांचे ग्रहांदरम्यानच्या माध्यमातून प्रसारण (propagation)आदि गोष्टींची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळेल.
५. आदित्य एल-१ ची महत्वाची वैज्ञानिक उद्दिष्टे
अ ) सूर्याचा सर्वांत बाहेरचा थर (प्रभामंडल) अतीतप्त का होतो (coronal heating) याचा अभ्यास करणे.
ब ) सौर वाऱ्यांच्या (solar winds) प्रवेगाचा अभ्यास करणे.
क ) प्रभामंडलामधील वस्तुमानाचे उत्सर्जन (Coronal Mass Ejection-CME), सौर ज्वाला (solar flares) आणि पृथ्वीसमीप हवामानाचा (near earth space weather) अभ्यास करणे.
ड ) सौर वातावरणाची जोडणी (coupling) व गतीशीलता (dynamics) यांचा अभ्यास करणे.
इ ) सौर वाऱ्यांचे वितरण (distribution) आणि तापमानातील दिक् विषमता (anisotropy) यांचा अभ्यास करणे.
६. या मोहिमेची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये
अ ) यावेळी प्रथमच संपूर्ण सौर तबकडीचे अतिनील समीप (near ultra violate) वर्णपटात निरीक्षण.
ब ) सौर तबकडीच्या अगदी समीप जाऊन (साधारण १.०५ सौर त्रिज्या) प्रभामंडला मधील वस्तूमान उत्सर्जनाच्या (Coronal Mass Ejection-CME) गतीशीलतेचा अभ्यास करणे व त्यावरून CME च्या प्रवेगीय भागातील माहिती मिळविणे.
क ) यानावरील कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा सूर्याचे इष्टतम (optimised) वेध घेऊन व इष्टतम विदासाठा (data volume) वापरून प्रभामंडलामधील वस्तूमान उत्सर्जन व सौरज्वाला यांचा शोध घेणे.
ड ) विविध दिशांना केलेल्या निरीक्षणांद्वारे सौर वाऱ्याच्या ऊर्जा दिक् -विषमतेचा अभ्यास करणे.
— क्रमशः भाग पहिला
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
ईमेल – [email protected] मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈