? इंद्रधनुष्य ?

☆ अर्जेंटिनामधील हस्तिनापूर… – लेखक – श्री ल. ग. पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील एक देश, असून “ब्युनोस आयर्स” हे त्याचे राजधानीचे शहर. त्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर, रम्य वनराजीमध्ये हस्तिनापूर नावाचे अर्जेंटिअन नागरिकांनी वसवलेले स्थान आहे. त्याचे क्षेत्रफळ बारा एकरांचे असून तेथे बारा हिंदू देवतांची देवळे बांधलेली आहेत. तितके अर्जेंटिअन लोक तेथे वास्तव्यास असतात.

त्यांमध्ये श्री गणेश, श्री कृष्ण, सूर्यदेव, श्री नारायण आणि शिव यांची अस्सल हिंदू पद्धतीची बारा देवळे असून, हस्तिनापूर नावाला शोभेल असे पांडवांचेही एक देऊळ आहे. हस्तिनापूर हे अक्षरश: देवांच्या राहण्यासाठीच बांधलेले स्थान वाटते. सर्वत्र स्वच्छ व आल्हाददायक वातावरण, रोजवूडची हिरवीगार झाडे, निर्मळ व शांत वातावरण. आवाज हा फक्त झाडांवरील घरट्यांत राहणार्‍या पक्षांच्या कूजनाचा ! भक्तगणांत मृदू व तालबद्ध भजनांचा आवाजही नियमित वेळी उमटत असतो. बगीच्यातील पांढर्‍या दगडांतील उभी गणेशाची मूर्ती, आपले चित्त आकृष्ट करून घेते.

देवळे अर्जेंटिअन लोकांनीच 1981चे सुमारास बांधली. ती हुबेहूब हिंदू देवळांप्रमाणे आहेत. तेथील हिंदू संप्रदायाची स्थापना ‘अल्डा अलब्रेच्ट’ (ALDA ALBRECHT) या साध्वीने केली. तिने हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रसार अर्जेंटिअन लोकांमधे केला व ती त्यांची ‘गुरू’ झाली. तिने पुष्कळ लिखाण केले असून वानगीदाखल ‘हिंदू संत आणि त्यांची शिकवण’ (The Saints and Teachings of India’), ‘हिमालयातील योग्यांची शिकवण’ ही त्‍यांची पुस्‍तके होत.

‘गुस्टाव कॅनझोब्रेट’ (Gustavo Conzober) हा तिचाच शिष्य होय. सांप्रत तो हस्तिनापूर कॉलेजचा डायरेक्टर आहे. त्याला वयाच्या सतराव्या वर्षांपासून हिंदू तत्त्वज्ञानाची गोडी लागली.  ब्युनोसआयर्स येथील भारतीय वकिलातीने नोव्हेंबर 2010 मध्ये फेस्टिवल ऑफ इंडिया’चे आयोजन केले होते, त्यावेळी ‘दक्षिण भारतातील देवळांचे शिल्पशास्त्र’ या विषयावर त्याचे भाषण झाले. तो स्थानिक कंपनीचा मॅनेजर असून (चरितार्थ चालण्यापुरता) बाकी सर्व वेळ तो हस्तिनापूर संस्थेच्या कार्यास देतो. त्याला हिंदू वेद-उपनिषदे यांचे चौफेर ज्ञान असून तो ऑगस्ट 2011 मध्ये भारत भेटीवर आला होता. ती त्याची दुसरी भारतभेट होती.

देवळांची निगा राखणार्‍या आणि करणार्‍या बारा अर्जेंटिअन पुजार्‍यांव्यतिरिक्त दर आठवड्याच्या शेवटी जवजवळ शंभर तरी अर्जेंटिअन लोक निव्वळ ज्ञानप्राप्तीसाठी येतात. म्हणूनच हस्तिनापूरला ‘आध्यात्मिक ज्ञानकेंद्रा’चे स्थान प्राप्त झाले आहे. लोक तेथे तत्त्वज्ञान शिकतात, ग्रंथालयात बसून विविध पुस्तकांचे वाचन करतात. ‘योगा’चे धडे देतात, ध्यानाचे धडे गिरवतात आणि भजने म्हणतात.

देवळांच्या आवारापलीकडे गायी चरत असतात. त्या अर्जेंटिनामध्ये असूनही निर्भय वाटतात; येवढेच नव्हे तर त्या मधून मधून देवळांकडे न्याहाळून पाहत आहेत असेही भासते ! त्यांचे चित्त शांत, स्थिर व भीतीमुक्त वाटते, कारण त्यांना आपणास कोणी धरून नेऊन आपण कापले जाऊ व लोकांचे भक्ष होऊ अशी भीती नसते. हस्तिनापूरमध्ये फक्त ‘शाकाहारा’चे पालन केले जाते. तेथे कोणी ‘स्वामी’, ‘गुरू’ नसून संस्थेत ज्ञान, शांतता आणि ब्रह्मज्ञान यांचा सतत अभ्यास सुरू असतो. प्रसिद्धी पराड.गमुख असे हे लोक आहेत ! वास्तविक त्यांच्यामध्ये इंजिनीयर्स, प्रोफेसर्स आहेत, पण ते फावल्या वेळात संस्थेत येऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात.

तेथे गौतम बुद्धाचे, कुमारी मेरीचे, डिमेटर (Demeter ) या ग्रीक देवाचे, आणि एक देऊळ ‘सर्व पंथांचे’ आहे. तेथे कोणत्याही विवक्षित धर्माचा प्रसार करण्यात येत नाही. येणार्‍या ‘भक्तांना स्वत:चा मार्ग’ निवडण्याची मुभा आहे. तेथे विविध कार्यशाळांचे, सेमिनार्सचे आयोजन करून एकांतवासाचे महत्त्व समजावले जाते. ‘गणेशचतुर्थी’ व ‘वैशाखी’ हे उत्सव साजरे केले जातात. रेडिओद्वारे येथील कार्यक्रमांचा प्रसार करण्याची योजना आहे.

हस्तिनापुरातील देवळात पुजारी (बडवे), दानाची पेटी इत्यादी गोष्टी नाहीत ! भक्त लोक येतात, मंत्रपठण करतात, भक्तिगीते गातात, ध्यान करतात. मेडिटेशन हॉल आहे. योगविद्येसाठी तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असून, दर आठवड्यातून एकदाच शिकवले जाते. तेथे अडीच हजार विद्यार्थ्यांची सोय असून, शंभर शिक्षक भारतीय तत्त्वज्ञान आणि एकशेवीस शिक्षक ‘योग’साधना शिकवतात.

‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ तर्फे हिंदू तत्त्वज्ञानावर बरीच पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून, भगवदगीता , योगसूत्रे , उपनिषदे, श्रीभागवत, भक्तिसूत्रे यांची भाषांतरे पण केली गेली आहेत.

अगदी अलिकडे ‘स्पॅनिश’ भाषेत ‘श्रीमहाभारता’ चे भाषांतर प्रसिद्ध झाले आहे. तीन भाग प्रसिद्ध झाले असून एकूण बारा भाग प्रसिद्ध करायचे ठरले आहे. प्रत्येक भाग अंदाजे पाचशे पृष्ठांचा असेल.

ब्युनोस आयर्स मध्ये ‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ची सोळा केंद्रे असून तीन इतरत्र आहेत. खेरीज उरुग्वे, बोलिव्हिया आणि कोलंबिया येथेही केंद्रे स्थापन केली गेली आहेत. (http://en.hastinapura.org.ar ) या वेबसाईटवर आधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.

लेखक : ल. ग. पटवर्धन

पुणे 

दूरभाष – (020) 25384859,  इमेल : – [email protected]

माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments