श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “जीवनाचे नवनीत पुरवणारा कृष्ण…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
जीवनाचे नवनीत पुरवणारा कृष्ण…
…अर्थात एका भारतीय जवानाचा पराक्रम !
सोळा जूनच्या दुपारच्या तीनचा सुमार. पंजाबातील भाक्रा-नांगल CANALच्या पाटातून अतिशय वेगाने पाणी वाहात होते. या पाटाच्या दोन्ही बाजुंनी लोकांची, वाहनांची ये जा सुरू होती.
पतियाला येथील सैन्य रुग्णालयाची एक मोटार आवश्यक अन्नधान्य घेउन शहरातून रुग्णालयाकडे येत होती. या मोटारीत नवनीत कृष्णा नावाचे सैनिकी जवान मागील आसनावर बसलेले होते.
नवनीत यांना या पाटाच्या कडेला शेकडो लोकांचा जमाव उभा राहून आरडाओरडा करताना दिसला. नवनीत यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली आणि ते खाली उतरले.
एक तरुणी पाण्यात वाहून चाललेली आहे हे वाक्य कानावर पडताच नवनीत यांच्यातील भारतीय सैनिक कर्तव्यासाठी पुढे सरसावला. कारण बघ्यांच्या गर्दीतून कुणीही पुढे होत नव्हते, काहीजण मोबाईल चित्रीकरण करण्यात दंग होते. पाण्यात पडलेली तरुणी जीव वाचवण्यासाठी आकांत करीत होती.
नवनीत यांनी पाटाच्या कडेने वेगाने धावायला सुरुवात केली. पाण्याचा वेग त्या तरूणीला पुढे पुढे घेउन जात होता. नवनीत यांनी वेगाने धावत सुमारे शंभर मीटर्स अंतर कापले आणि अंगावरील पूर्ण गणवेशासह त्या पाण्यात सूर मारला.
पाण्यात बुडत असलेली व्यक्ती वाचवायाला आलेल्याला माणसाला जीवाच्या भीतीने मिठी मारण्याची शक्यता अधिक असते. या प्रयत्नात बुडणारा आणि वाचवणारा असे दोघेही बुडण्याची दाट शक्यता असते.
नवनीत यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून तिचे केस पकडले… तिच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून, एका हाताने पाणी कापत कापत पाटाचा जवळचा किनारा गाठला.
बघ्यांची गर्दी आता मात्र मदत करण्याच्या भानावर आली होती. कुणी तरी एक मोठा दोरखंड पाण्यात फेकला. त्यामुळे नवनीत यांचे काम काहीसे सोपे झाले. काठावर पोहोचताच लोकांनी त्या तरूणीला वर ओढून घेतले…नवनीत मागाहून वर आले.
नाकातोंडात पाणी गेल्याने त्या तरूणीचा जीव धोक्यात होता. जवान नवनीत यांनी त्यांना भारतीय सैन्य सेवेत मिळालेले प्रशिक्षण उपयोगात आणले. त्या तरूणीला सीपीआर Cardio Pulmonary Resucitation दिला. त्यामुळे तिच्या जीवावरचे संकट टाळले.
नवनीत थोडेसे सावरले, कपडे चिंब भिजलेले. त्यांनी त्या तरुणीचे नावही विचारले नाही, त्याची काही गरजही नव्हती. The mission was over and successful!
काम झाल्यावर सैनिक पुन्हा बराकीकडे निघतात …जणू काही झालेच नाही अशा सहज आविर्भावात नवनीत आपल्या वाहनात बसून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी फिल्ड हॉस्पिटल मध्ये परतले.
ऐनवेळी एका सैनिकाने स्वतःच्या हिंमतीवर हाती घेतलेल्या Rescue Operation च्या अगदी शेवटच्या काही क्षणांचे कुणीतरी चित्रीकरण करण्यात यश मिळवले होते. हे चित्रीकरण अल्पावधीत viral झाले. तेंव्हा कुठे नवनीत यांचा पराक्रम सर्वांना माहीत झाला.
अर्थात भारतात सर्वांनाच अशा गोष्टी समजतात, असे नाही. यथावकाश भारतीय सैन्यास ही माहिती मिळाली आणि सैन्याच्या महान परंपरेनुसार भारताच्या लष्कर प्रमुख साहेबांनी, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल पांडे साहेबांनी या शूर शिपायास आपल्या कार्यालयात सन्मानपूर्वक बोलावून घेतले. गौरव चिन्ह देऊन त्याचा यथोचित गौरव केला.
नवनीत कृष्णा यांचे शौर्य, नि;स्वार्थ सेवा हे गुण कदर करण्यासारखेच आहेत. सेनेच्या सर्व विभागाच्या सर्व सैनिकांना आणि कर्मचाऱ्यांनाही आवश्यक ते सैनिकी प्रशिक्षण दिले जातेच.
सैनिक फक्त सीमेवरच नव्हे तर देशात जिथे जिथे गरज पडेल तिथे पराक्रम गाजवण्यास, प्रसंगी प्राणांची बाजीही लावण्यास सज्ज असतात…. संधी मिळताच सैनिक आपले कर्तव्य बजावून अलगद बाजूला होतात…. A soldier is never off-duty असे म्हणतात ते खरेच आहे.
नवनीत कृष्णा यांच्या पालकांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये नवनीत यांना शिकवले आणि सैन्यात प्रवेश करण्याच्या योग्यतेचे बनवले. नवनीत याबद्दल आपल्या पालकांविषयी अत्यंत कृतज्ञ आहेत.
नवनीत हे अत्यंत चपळ, धाडसी, काटक, आज्ञाधारक सैनिक असून अत्यंत उत्तम वाहनचालकही आहेत असे त्यांचे अधिकारी मोठ्या कौतुकाने सांगतात.
नवनीत हे मूळचे तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. आपणा सर्वांना अशा या धाडसी जवानाचे कौतुक आहेच व रहायलाही हवे.
🇮🇳 जयहिंद. जय भारत. 🇮🇳
जय हिंद की सेना.
(माहिती आणि छायाचित्र इंटरनेटच्या सौजन्याने ! पाकिस्तानला शरण आणणाऱ्या भारतीय सैन्याचे छायाचित्र या सत्कार प्रसंगी घेतलेल्या छायाचित्रात मागे दिसते आहे. असे पराक्रम करणाऱ्या सैन्याचा सामान्य सैनिक हा भक्कम कणा असतात. त्यांचे यथोचित कौतुक व्हावे !)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈