श्री विश्वास विष्णु देशपांडे
विविधा
☆ अस्तित्व… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
आजचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गाव. महाभारतातील कौरव पांडवांच्या काळातील एकचक्र नगरी. एके काळची जुनी बाजारपेठ. ऐतिहासिक गाव. या इतिहासाच्या खुणा आज भग्नावस्थेत का होईना पण एके काळच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. वेगवेगळे जुने ऐतिहासिक दरवाजे, वाडे, बुरुज, बारव आजही गतवैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर मिरवत आहेत. गावात प्राचीन मंदिरे आहेत. राम मंदिर, केशवराज मंदिर, गणेश मंदिर, शिव मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. जवळच पद्मालय म्हणून एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी श्री गणेशाचे जागृत असे देवस्थान आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच ठिकाणी उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा अशा दोन गणेश मूर्ती आहेत. मंदिराबाहेर ४४० किलो वजन असलेली एक पंचधातूची प्रचंड मोठी घंटा आहे. तिचा आवाज अनेक किमी पर्यंत दूर ऐकू जातो असे म्हणतात. मंदिरासमोर असलेल्या तळ्यात सुंदर कमळे उमललेली असतात. म्हणूनच पद्मालय असे सार्थ नाव या पवित्र ठिकाणाला आहे. श्री गणरायाला रोज कमलपुष्पे अर्पण केली जातात. येथे अंगारकी, संकष्टी चतुर्थी आणि सुट्यांच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. येथून जवळच भीमाने बकासुराचा वध ज्या ठिकाणी केला ती जागा आहे.
एकचक्रनगरी या नावाव्यतिरिक्त एरंडोल शहराची अरुणावती आणि ऐरणवेल अशीही नावे असल्याचे सांगितले जाते. कदाचित ऐरणवेल या नावाचा अपभ्रंश होऊन एरंडोल हे नाव पडले असावे. अशा या गावात पांडव अज्ञातवासात असताना राहिले होते. ते या ठिकाणी ज्या वाड्यात राहिले होते, त्या वाड्याला पांडववाडा असे नाव पडले आहे. आजही हा वाडा या पौराणिक घटनेची साक्ष देत उभा आहे. या वाड्याच्या प्रवेशद्वारावर कमळफुलांची नक्षी आहे. आत प्रवेश केल्यावर भरपूर मोकळी आणि प्रशस्त जागा, रुंद आणि अनेक खिडक्या असलेल्या भिंती आहेत. त्यांच्यावर नक्षीकाम आहे. आज मात्र या पांडववाड्याकडे बघवत नाही. तिथे जामा मशीद उभी आहे. वास्तू कडीकुलुपात बंदिस्त आहे. या पांडव वाड्याजवळच एक धर्मशाळा आहे. एक मोठे वडाचे झाड आहे. तिथे पारावर एका बाजूला गणपती आणि देवीचं मंदिर आहे.
याच पांडव वाड्याच्या उजव्या बाजूला एक ऐतिहासिक केशवराजाचं मंदिर उभं आहे. मंदिरात काळ्या पाषाणापासून तयार झालेली केशवाची देखणी आणि रेखीव मूर्ती आहे. या मंदिराची देखभाल आणि मालकी मैराळ परिवाराकडे गेल्या सात ते आठ पिढ्यांपासून आहे. काही भाविकांचे हे कुलदैवतही आहे. याच मंदिरात ज्यांचं वास्तव्य होतं असे प्रकाशराव मैराळ हे माझे नात्याने साडू आणि माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ. पण साडू किंवा मेहुणे यापेक्षाही आमच्या नात्याला मैत्रीच्या नात्याची किनारच जास्त !
लग्नानंतर आमचं खूपदा एरंडोलला जाणं येणं व्हायचं. मंदिरात पाऊल ठेवताच प्रकाशराव हसतमुखाने आमचं तत्परतेनं स्वागत करायचे. साधारण पाच फूट उंची पण सुबक ठेंगणी अशी त्यांची मूर्ती. पिळदार आणि गोटीबंद शरीर. चेहऱ्यावर सदैव हास्य विराजमान. प्रकाशराव म्हणजे उत्साहमूर्ती ! त्यांचा दिवस सकाळी पाच वाजताच सुरु व्हायचा. मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीचं पाणी सकाळी रहाटाने काढून सगळ्यांसाठी भरून ठेवणार. त्याच पाण्याने स्तोत्र म्हणत त्यांचं स्नान व्हायचं. मग केशवराजाची यथासांग पूजा असायची. मंत्र, आरती सगळं काही शुद्ध आणि खणखणीत आवाजात. प्रकाशराव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. त्यांच्या विविध गावी बदल्या व्हायच्या. पण कुरकुर, तक्रारीचा सूर कधीच ऐकू यायचा नाही. देवाची पूजा झाली की ही वामन मूर्ती सायकलवर बसून आपल्या शाळेत वेळेवर हजर असायची. गावकरी, शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थी साऱ्यांनाच हवेहवेसे वाटणारे आणि आपल्या कर्तव्यात कधीही कसूर न करणारे हे व्यक्तिमत्व होते.
देव काही काही माणसांना प्रचंड ऊर्जा देतो. तसंच प्रकाशरावांच्या या उत्साहाचं मला नेहमी कौतुक वाटायचं. देवपूजा, घरातील कामं हे सगळं आटोपून वेळ मिळाला की स्वारी सायकलला टांग मारून शेतावर जायची. त्यांची पत्नी म्हणजेच माझ्या सौभाग्यवतीची तीन नंबरची बहीण सुद्धा प्रचंड कष्टाळू . खरं तर ती स्टेनो झालेली होती. शहरात उत्तम पगाराची नोकरी तिला त्या काळात कुठेही सहज मिळाली असती. पण तिने प्रकाशरावांचा संसार प्रकाशमान केला. स्वतःला त्यात विलीन करून टाकले. आपल्या दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा यांना शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार प्रकाशराव आणि बेबीताईंनी दिले.
दोघांनीही केशवराजाच्या सेवेत कधी कसूर केली नाही. सगळे सण, उत्सव ते मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने करीत राहिले. चातुर्मासात प्रकाशराव मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी भागवताचे वाचन करीत. एरंडोल गावातील गावकऱ्यांसाठी प्रकाशराव आणि बेबीताई दोघेही आदराचे स्थान. केशवराजा या दोघांची कसून परीक्षा घेत होता. पण हे दोघेही त्यात कुठेही कमी पडले नाहीत. त्याचे फळ केशवराजाने पदरात घातले. दोन्ही जुळ्या मुली प्रेरणा आणि प्रतिमा यांना उत्तम स्थळे मिळून त्यांचा विवाह झाला. मुलगा श्रीपाद एम फार्म होऊन मुंबईला कंपनीत रुजू झाला. यथावकाश त्याचेही लग्न झाले. केशवराजाच्या कृपेने उच्चशिक्षित, सद्गुणी अशी प्राजक्ता सून म्हणून घरात आली. प्राजक्ता आणि श्रीपादच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या. एक मुलगा आणि एक मुलगी.
असं सगळं सुखात चाललं होतं. प्रकाशराव आपला सेवाकाल पूर्ण करून निवृत्त झाले होते. आता खरे तर त्यांचे सुखाचे आणि आरामाचे दिवस होते. पण माणसाच्या नशिबी असलेले भोग काही चुकत नाहीत. मुखात अखंड गोपाळकृष्णाचे नाव असलेल्या या उत्साही, आनंदी आणि तत्पर माणसाला संधी मिळताच आजारांनी ग्रासले. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा विकार लागला. पुढे पुढे तर मेंदूचे शरीरावर असणारे नियंत्रण कमी कमी होत गेले. जवळपास अकरा ते बारा वर्षे प्रकाशरावांना जळगाव येथील मेंदूरोग तज्ज्ञांचे उपचार सुरु होते. कधी थोडीफार सुधारणा दिसायची. पण पुन्हा सगळ्यांना त्यांची काळजी लागून राहायची. या सगळ्या कालावधीत बेबीताई पदर खोचून धीराने उभ्या राहिल्या. जवळ कोणी नसताना गाडी करून त्यांना जळगावला उपचारासाठी त्या घेऊन जायच्या. शनिवार रविवार श्रीपाद मुंबईहून येऊन आईला मदत करायचा. प्राजक्ताही आपल्या दोन लहानग्यांना सांभाळून सासू सासऱ्यांच्या सेवेत तत्पर असायची.
अशा परिस्थितीही बेबीताईंनी केशवराजाकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष होणार नाही याची भक्तिभावाने आणि प्रेमाने काळजी घेतली. चातुर्मासात प्रकाशरावांचा भागवत सांगण्याचा वारसा त्यांनी घेतला. आम्ही अधूनमधून एरंडोलला जायचो. आम्ही गेलो की यापूर्वी सदैव उत्साही असणाऱ्या असणाऱ्या प्रकाशरावांना असं परावलंबी होऊन अंथरुणावर पडलेलं पाहताना गलबलून यायचं. शेवटी शेवटी तर फिट्स यायला सुरुवात झाली. बेबीताई आणि मुलांनी उपचारात कसूर ठेवली नाही. पण फार काही सुधारणा होत नव्हती. प्रकाशरावांच्या मुखातून गोपाळकृष्णाचे नाव मात्र ऐकू येई. आपल्या केशवराजावर त्यांचं अतोनात प्रेम आणि श्रद्धा.
आधी गावभर, मंदिरभर, घरभर असणारे प्रकाशरावांचे अस्तित्व आता अंथरुणावर होते. गेल्या महिन्यात परिस्थिती आणखी बिघडली. प्रकाशरावांना जळगावला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. पण सुधारणा होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. त्यांना शेवटी कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला. डॉक्टरांनी सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर त्यांना घरी नेण्यास सांगितले. घरी आणल्यानंतर तीन साडेतीन तासात केशवराजाच्या साक्षीने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एक प्रकाश दुसऱ्या प्रकाशात विलीन झाला होता. एक उत्साहमूर्ती शांत झाली होती. निर्जीव देहाच्या रूपात आता त्यांचं अस्तित्व उरलं होतं. काही तासांनी तेही अस्तित्व लोप पावलं. तिसऱ्या दिवशी केवळ अस्थींच्या स्वरूपात हे अस्तित्व उरलं. काही दिवसांपूर्वी आपल्याशी हसून खेळून बोलणाऱ्या व्यक्तीचं अस्तित्व आपल्यासमोरच कसं हळूहळू नष्ट होत जातं याचा विषण्ण अनुभव मी घेत होतो. यथावकाश त्या अस्थीही नर्मदेत विसर्जित करण्यात आल्या. रक्षा नदीत सोडून देण्यात आली. आता त्यांच्या अस्तित्वाच्या त्याही खुणा नष्ट झाल्या होत्या.
प्रकाशराव गेल्यावर गावातील लोक हळहळले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी स्त्री पुरुषांनी गर्दी केली. श्रीपादच्या मित्रांनी अंत्यविधीची सगळी व्यवस्था केली. नगराध्यक्षांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या घरी तीन दिवस जेवण आणि चहाची व्यवस्था गावातील लोकांनीच केली. ग्रामीण भागातील लोकांचे प्रेम आणि माणुसकी अजून टिकून आहे याचे दर्शन या निमित्ताने घडले.
आता मंदिरात होती त्यांची प्रतिमा हार घातलेली. आता त्यांचं अस्तित्व फोटोतच असं म्हणायचं का ? त्यांनी मुलांना दिलेले संस्कार, आपल्या ज्ञानदानाने घडवलेले विद्यार्थी, गावातील लोकांना दिलेलं प्रेम या सगळ्यांच्या रूपात त्यांचं अस्तित्व आहेच ! तुकाराम महाराज म्हणतात
तुका म्हणे एका मरणेची सरे । उत्तमची उरे कीर्ती मागे ।।
हा देह नाशिवंत आहे. हाताने नित्य सत्कर्म करावे आणि मुखाने परमेश्वराचे नाम घ्यावे. त्यातच जीवनाचे सार्थक आहे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे असेच तुकोबाराय सांगतात. एरंडोल नगरीत महाभारतकालीन पांडववाडा, विविध मंदिरे, दरवाजे आदींचे अस्तित्व उरले आहे. त्या काळातील कीर्ती त्या वास्तू गात राहतील. प्रकाशरावही स्मृती रूपाने आपले अस्तित्व मागे ठेऊन गेले आहेत.
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Deshpande Sir, Out standing. Thank you for sharing important information.