सौ. पुष्पा चिंतामण जोशी
इंद्रधनुष्य
☆ आनंदकंद ऐसा… भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
१८५७ पूर्वीचा भारत
इ.स.१८२२. फॅनी पार्कस् आणि चार्ल्स क्रॉफर्ड पार्कस् हे दांपत्य पाच महिने बोटीने प्रवास करून इंग्लंडहून कोलकत्याला उतरले. फॅनीचा नवरा चार्लस् ईस्ट इंडिया कंपनीत कारकून होता.फॅनी चांगली चित्रकार होती. प्रवास आणि घोडदौड हे तिचे छंद होते . इथले लोकजीवन, धर्म, राजकारण, इतिहास, भूगोल हे सर्व जाणून घेण्यात तिला रस होता . ती नेहमी स्वतःजवळ डायरी आणि स्केच बुक बाळगत असे. भारतात २४ वर्षे राहून ती लंडनला परत गेली. त्यानंतर तिच्या डायऱ्या व अनुभव यावर आधारित तिने पुस्तक लिहिले आहे. ते दोन खंडांमध्ये आहे.या पुस्तकातील बहुतेक सगळी रेखाचित्रे तिची स्वतःची आहेत. पुस्तकावरील फॅनी पार्कस् हे नाव आणि सगळ्या चित्रांखाली तिची सही उर्दूमध्ये आहे. पुस्तकाच्या पहिल्या पानावर ‘श्री गणेश’ असं देवनागरीत लिहून त्याच्याखाली एखाद्या हिंदू घरातला सर्व देवदेवता असलेला देव्हारा असावा तसे चित्र आहे. शंख, घंटा, पळी पंचपात्र, ताम्हन यांचीही चित्रे आहेत. ती गणपतीला सलाम करते. ‘ही गणपतीसारखी लिहिते’ असे म्हटले जाऊ दे!’ असा आशीर्वाद ती गणपतीकडे मागते.
फॅनीने लिहिले आहे की, कोलकत्यामध्ये कॉलरा, देवी,एंन्फ्लूएंझा असे साथीचे रोग होते. घरात, बागेत सर्रास साप- विंचू सापडत होते.
नंतर चार्लसची बदली अलाहाबादला झाली. बोटीने ८०० मैल आणि घोड्यावरून ५०० मैल असा प्रदीर्घ प्रवास त्यांनी वाटेतल्या डाकबंगल्यांमध्ये मुक्काम करत केला . वाराणसीमध्ये ती हिंदू देवळांमध्ये गेली. तिने लिहिले आहे की हिंदूंचे सगळ्यात पवित्र शहर अंधश्रद्धेने भरलेले आहे. भोळसटपणा हा एक वाढीव अवयव हिंदूंमध्ये आहे.
अलाहाबादला पोहोचल्यावर त्यांनी यमुना नदीच्या किनाऱ्यावर घर घेतले. फॅनी लिहिते की अंधाऱ्या, धुक्याने काळवंडलेल्या लंडनमध्ये राहणारे लोक या उत्साही, आनंदी हवामानाची कल्पनाही करू शकणार नाहीत.
लखनौचा एक इंग्रज सरदार अवधच्या नबाबाला भेटणार होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी फॅनीला तिच्या लखनौच्या मैत्रिणीने आमंत्रण दिले. नबाबी थाटाचे जेवणाचे समारंभ,नाच- गाणे, जनावरांच्या झुंजी झाल्या. इंग्रज पाहुणी म्हणून फॅनीला अनेक काश्मिरी शाली, भारतीय मलमलीचा आणि किनखाबाचा एकेक तागा , मोत्याच्या माळा, किमती खड्यांच्या बांगड्या, इतर दागिने भेट मिळाले.
अलाहाबादला राहत असताना तिने सती जाण्याचा प्रसंग पाहिला. त्याचे हृदयद्रावक वर्णन आपण वाचू शकत नाही.
१८३० मध्ये तिच्या नवऱ्याची बदली कानपूरला हंगामी कलेक्टर म्हणून झाली.दीडशे मैलांचा हा प्रवास पालखीतून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात झाला. या काळात उत्तर हिंदुस्थानात ठगांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला होता.हे ठग प्रवाशांना लुटून, मारून त्यांची प्रेते विहिरीत फेकून देत. फॅनीने ठगांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवून त्याचे सचित्र वर्णन केले आहे.
कानपूरमध्ये चामड्याच्या वस्तूंचा धंदा जोरात होता. चामड्यासाठी विष घालून जनावरे मारण्याचा प्रकारही सर्रास होत असे.
२६ जुलै १८३१ ला फॅनीच्या डायरीत नोंद आहे की गव्हर्नर जनरलने आग्र्याची प्रसिद्ध मोती मस्जिद रुपये १,२५,००० या रकमेला विकली. ती पाडून तिचे संगमरवर विकण्यात येणार आहे. ताजमहालही विकण्यात येणार आहे असे जाहीर झाले आहे. फॅनीने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ती लिहिते की गव्हर्नरजनरलला ताजमहाल विकण्याचा काय अधिकार आहे? पैशासाठी असे करणे अशोभनीय आहे. पुढे पार्लमेंटमध्ये गदारोळ झाल्यामुळे हा प्रस्ताव बारगळला आणि ताजमहाल वाचला.
१८३४ मध्ये फॅनीने एक लहान गलबत खरेदी केले . खलाशांना घेऊन ती एकटीच प्रवासाला निघाली.तिने ताजमहालचे अगदी बारकाईने वर्णन केले आहे. आग्र्याच्या किल्ल्यातील संगमरवरी नक्षीकाम केलेले आणि रत्नमाणकं जडविलेले बाथटब काढून गव्हर्नरजनरलने ते इंग्लंडच्या राजाला पाठविल्याचे तिने लिहिले आहे. तसेच तिथल्या गुप्तपणे फाशी देण्याच्या अंधाऱकोठडीबद्दलही लिहिले आहे.
१८५७ पूर्वीचा भारत— भाग एक समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈