सौ. पुष्पा चिंतामण जोशी
इंद्रधनुष्य
☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
१८५७ पूर्वीचा भारत
(मागील भागात आपण पाहिले की फॅनी पार्कस् हिला भारतासंबंधी कुतूहल होते. भारतात अनुभवलेल्या विविध विषयांचे सचित्र वर्णन तिने केले आहे. आता त्या पुढील भाग…)
हिंदुस्थानातल्या अनेक प्रकारच्या झाडांची माहिती, त्यांचे उपयोग, धनुष्य बनविण्याची पद्धत, सतार कशी बनविली जाते, स्थानिक भाषेतील म्हणी व वाक्प्रचार असे अनेक विषय फॅनीच्या लिखाणात येतात. वन्य प्राणी, कीटक, जीवजंतू यांचीही ती अभ्यासक होती.
फॅनीने लिहिले आहे की, ‘कंपनी सरकार नेटिवांच्या अंधश्रद्धेचा फायदा उकळते. प्रयागला संगमावर स्नान करण्यासाठी प्रत्येकी एक रुपया कर द्यावा लागतो. एक रुपयात एक माणूस महिनाभर सहज जेवू शकतो हे लक्षात घेतले तर हा कर भयंकर आहे.’
सुरुवातीला आलेल्या काही इंग्रजांनी मुगल राजघराण्यात विवाह केले होते आणि त्यांच्यासारखे ऐश्वर्य उपभोगत होते. अशा अँग्लो- इंडियन्सना व्हाईट मुघल्स म्हटले जाई.
बर्मा वॉरवर गेलेल्या काही परिचितांकडून फॅनीला हिंदू ,बौद्ध देवदेवतांच्या मूर्ती भेट मिळाल्या होत्या. त्यातील एक सोन्याची, काही चांदीच्या आणि बाकी ब्रांझ आणि संगमरवराच्या होत्या. अनेकांनी अशा मूर्ती फोडून त्यांच्या डोळ्यांच्या जागी बसविलेले हिरे काढून घेतले. काही मूर्तींच्या तर डोक्यात हिरे साठवलेले होते. फॅनीने आठवण म्हणून मिळालेल्या मूर्ती तशाच ठेवल्या.
प्रचंड टोळधाडीमुळे फॅनी उदास झाली. त्यावेळेच्या भीषण दुष्काळाचे वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. आई- वडील धान्यासाठी, पैशासाठी आपली मुलेही विकत होती.
महादजी शिंदे यांचा दत्तक मुलगा दौलतराव यांची विधवा पत्नी बायजाबाई शिंदे यांची व फॅनीची चांगली मैत्री झाली होती.
हिंदू धर्माप्रमाणेच फॅनीने मोहरमचा सण, त्या मागची कथा, प्रेषितांच्या कुटुंबाची माहिती,शिया आणि सुन्नी यामधील फरक या सगळ्याविषयी लिहिले आहे. वाघाच्या शिकारीच्या अनेक कहाण्या तिने लिहिल्या आहेत. उच्च स्तरातील इंग्रजांची आयुष्यं सुखाची होती. त्यांच्याकडे सगळ्या कामांसाठी नोकर- चाकरांची फौज होती. संस्थानिकांकडून त्यांना किमती हिरे माणके अशा भेटींनी भरलेली ताटे मिळत असत. इंग्रज परके आहेत, शत्रू आहेत ही जाणीव भारतीय नेणीवेत उरली नव्हती.
तीव्र उन्हाळ्यामुळे आजारी पडून फॅनी मसूरीजवळच्या थंड हवेच्या ठिकाणी जवळपास सहा महिने राहिली. तिथेही तिने पहाडात फिरुन, माहिती गोळा करून तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशाचा आणि हवामानाचा दस्तऐवज करून ठेवला आहे. पहाडातला पाऊस, दरडी कोसळणे भूकंपाचे हलके धक्के, तिथली माणसे, झाडे, इतर वनस्पती, पक्षी, फुलपाखरे या सगळ्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. पहाडी बायकांचे जिणे फार कष्टप्रद असते असेही लिहिले आहे.
फॅनी स्वतंत्र बुद्धिमत्तेची आणि भारताविषयी प्रेम असणारी होती. हा भारत तिचा तिने शोधलेला होता. तीव्र निरीक्षण शक्ती आणि रसाळ लेखणी यामुळे तिचे लेखन आजही टवटवीत वाटते. घोड्यावर बसून फिरणारी, सतार वाजवणारी, उर्दू बोलणारी, सिगरेट ओढणारी, देवळांमध्ये, घाटांवर, बाजारात फिरणारी, गलबत घेऊन एकटीच प्रवासाला जाणारी ही मेम हे भारतीयांसाठीही एक आश्चर्यच होते.
अभ्यासू लेखिका सुनंदा भोसेकर यांचा ऋतुरंगमधील फॅनीने पाहिलेल्या भारतावरील लेख मी वाचला होता. आवडलेल्या लेखांच्या झेरॉक्स प्रति जमविण्याची मला आवड होती. करोनाच्या कंटाळवाण्या काळात कपाट आवरताना निराश मनःस्थितीत यातील बहुतेक सर्व लेखांना मुक्ती मिळाली .सुनंदाताईंना या लेखासाठी जेव्हा मी मेल केली तेव्हा अगदी तत्परतेने त्यांचे उत्तर आले. हा लेख माझ्या अजून लक्षात आहे याचेच कौतुक करून त्यांनी मला ऋतुरंग आणि शब्द रुची मधील त्यांच्या लेखांची पीडीएफ लगेच पाठविली. त्यांनी असेही कळविले की, फॅनीने पाहिलेल्या भारताचे लेख समाविष्ट असलेले त्यांचे पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. भारतात येऊन गेलेल्या परदेशी प्रवाशांविषयी त्यांच्या स्वतःच्या प्रवास वर्णनावर आधारित लेखमाला या पुस्तकात असेल चंद्रगुप्ताच्या दरबारात आलेल्या मेगास्थेनिसपासून जहांगीराच्या दरबारात आलेल्या थॉमस रो पर्यंतचे लेख या पुस्तकात असणार आहेत. आपण या पुस्तकाची वाट पाहूया.
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈