सौ. गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ ‘बाईपण भारी’… आणि वैशाली नाईक ☆ सौ. गौरी गाडेकर ☆
तुम्ही केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा ‘ बघितला असेलच.
ही कथा आहे मंगळागौरीच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहा बहिणींची.
यांच्या मनावर लहानपणी खेळलेल्या मंगळागौरीच्या खेळांच्या आठवणीची जादू आहे. त्यामुळे आणि भरघोस बक्षिसाच्या आशेने आणि कोणी ‘इगो’ सुखावण्यासाठीही या स्पर्धेत भाग घेतात.
पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पूर्वीच्या सडपातळ, चपळ, लवचिक शरीराने केव्हाच साथ सोडलीय. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या संसारात आपापल्या परीने बाईपणाचं ओझं वाहतेय. तर अशा या बहिणी स्पर्धा जिंकायची तयारी कशी करतात, त्यांचं ते स्वप्न पुरं होतं का, त्या धडपडीत त्यांच्या हाती इतरही काही लागतं का, ते तुम्ही बघितलं असेलच. नसल्यास जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.
आज हा लेख या सिनेमाची जाहिरात करण्यासाठी लिहिलाय की काय अशी शंका येईल कदाचित.. पण तसं अजिबातच नाही. हा लेख लिहिलाय तो – या चित्रपटाची प्रभावी आणि पठडीबाहेरची कथा, पटकथा, आणि त्यातले खुमासदार संवादही जिने लिहिले आहेत – त्या वैशाली नाईक या जेमतेम ३३-३४ वर्षाच्या तरुणीच्या कौतुकास्पद अशा अफाट कल्पनाशक्तीची आणि लेखन-सामर्थ्याची कल्पना माझ्यासारखीच इतरांनाही यावी म्हणून. . हा चित्रपट म्हणजे वैशालीचं मराठी सिनेसृष्टीतलं पहिलं दमदार आणि यशस्वी पाऊल.
यापूर्वी तिने ‘दिया और बाती’, ‘ये उन दिनों की बात है’, ‘बॅरिस्टर बाबू ‘, ‘तू मेरा हिरो’ वगैरे अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं लेखन केलं आहे. सद्या ती ‘ये रिश्ता क्या क्या लाता है’ या हिंदी मालिकेचं लेखन करत आहे.
वैशालीने यापूर्वी ‘सेव्हन स्टार डायनॉसर एन्टरटेनमेंट’ ही शॉर्ट फिल्म बनवली आहे.
‘सेव्हन स्टार डायनॉसर….’ ही फिल्म ‘धरमशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’, ‘पाम (palm) स्प्रिंग्ज इंटरनॅशनल शॉर्ट फेस्ट 2022’, ‘ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल 2022’, ‘मॅंचेस्टर फिल्म फेस्टिवल 2022’, ‘न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2022’, ‘ऍथेन्स इंटरनॅशनल फिल्म अँड व्हिडीओ फेस्टिवल 2022’, ‘लंडन इंडियन फिल्म फेस्टिवल’ वगैरेमध्ये प्रदर्शित केली गेली आणि वाखाणलीही गेली, हे आवर्जून सांगायला हवे.
‘IFFLA’ ( इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस एंजलीस)मध्ये या फिल्मने ‘Audience Choice Award’ पटकावलं आहे.
याशिवाय वैशालीने काही हिंदी बालकथाही लिहिल्या आहेत. त्या म्हणायला बालकथा असल्या तरी त्या मोठ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत हे विशेष.
सी. एस.( कंपनी सेक्रेटरी ) आणि एल. एल. बी. अशा पूर्णपणे व्यावसायिक आणि रुक्ष म्हणता येईल अशा विद्याशाखांच्या पदव्या प्राप्त केलेली वैशाली, साहित्याच्या या सुंदर आणि समृद्ध विश्वात अचानक पाऊल टाकते काय आणि बघता बघता इतक्या कमी वयातच इथे पाय घट्ट रोवून दिमाखाने उभी रहाते काय …. .. हा तिचा वेगवान आणि झपाट्याने यशाच्या दिशेने होत असलेला प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.
वैशाली नाईक या प्रतिभाशाली तरुण लेखिकेची साहित्य- क्षेत्रातली मुशाफिरीच इतकी दमदारपणे सुरु झालेली आहे की, “ आता ही पोरगी काही कधी मागे वळून बघणार नाही “ असं अगदी खात्रीपूर्वक म्हणता येईल.
वैशालीची ही साहित्यिक घोडदौड अशीच चौफेर चालू राहो, आणि तिला नेहेमीच असे भरघोस यश मिळो, याच तिला मनःपूर्वक शुभेच्छा !
सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈