श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ तेरी मिट्टी में मिल जावां ! भाग-1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
हेमाजींनी त्यांच्या घराच्या मागील बागेकडची खिडकी उघडली. सकाळचा थंड वारा आणि फुलांचा गंध घरात अलगद आला. हेमाजींनी नेहमीप्रमाणे तंबोरा मांडीवर घेतला आणि डोळे मिटले आणि रियाज आरंभ केला!
भैरव… सकाळी शोभणारा राग. भैरवचे स्वर लावण्यात त्यांना महारत हासील होतीच. गेल्या तीन दशकांचा रियाज होता त्यांचा. पण गेले काही दिवस भैरव गाताना आपोआप भैरवीकडे पावलं वळायची त्यांची… आर्ततेने पुरेपूर भरलेली… अंतरीच्या वेदनेची पालखी झुलवत झुलवत श्र्वासांच्या या तीरावरून त्या तीरावर नेणारी!
ही पावलं अशीच पडत होती… गेले काही दिवस, म्हणजे…. गेल्या चाळीस दिवसांपासून खरं तर!
१९९९ वर्षातील तो जुलै महिना… दिल्लीत पाऊस होताच नेहमीसारखा. त्यांचं मन मात्र सहा जून पासूनच ओलंचिंब होतं!
कॅप्टन हनीफुद्दीन
६ जून १९९९ रोजी त्यांचा हनीफ त्याच्या ११, राजपुताना रायफल्सचा युद्धानारा ‘राजा रामचंद्र की जय!’ आसमंतात घुमवीत प्रत्यक्ष मृत्यूला सामोरा गेला होता…. कॅप्टन हनीफुद्दीन अजीज हे त्याचं नाव. अवघ्या दोन वर्षांपूर्वी सैन्यात अधिकारी म्हणून भरती झालेला.
हनीफ अवघ्या सात वर्षांचा असेल नसेल तेंव्हा त्याचे वडील अजीज हे जग सोडून गेले. हेमाजी ह्या शास्त्रीय गायिका. संगीत नाटक अकादमीमध्ये सेवा बजावत होत्या. सैन्यासाठीच्या मनोरंजन केंद्रातही त्यांनी काही काळ आपली कला सादर केली होती. हनीफ कुटुंबाचा आणि सैन्याचा एवढाच काय तो संबंध तोपर्यंतच्या काळातला.
अजीज हे सुद्धा कलाक्षेत्रात होते. त्यातून हेमाजी आणि अजीज यांची मने जुळली आणि ते विवाह बंधनात अडकले. त्यांना दोन मुले झाली. या मुलांनाही आपल्या आईकडून संगीताचा वारसा लाभला.
अजीज लवकर निवर्तले. हेमाजींनी मुलांना आपल्या मूळच्या हिंदू आणि पतीच्या मुस्लीम धर्मातील संस्कारांचाही वारसा देण्यात कसूर ठेवली नव्हती. नवऱ्याचा आधार गमावलेल्या हेमाजींनी आहे त्या उत्पन्नात घर भागवले. त्या संगीत शिकवू लागल्या. मुलांना कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ दिली नाही.
एकदा हनीफ यांना शाळेतली एका शिक्षिकेने विनामूल्य गणवेश देऊ केला. त्यावर हेमाजींनी त्यांना निरोप पाठवला की.. हा खर्च करण्यास मी समर्थ आहे. कृपया दुसऱ्या एखाद्या जास्त गरजूला हा मोफत गणवेश देण्यात यावा.
कॅप्टन हनीफ साहेब देशासाठी हुतात्मा झाल्यानंतर सरकारने त्यांना देऊ केलेला पेट्रोल पंप त्यांनी, घरात तो सांभाळायला कुणी दुसरं नसल्याने नम्रपणे नाकारला आणि इतर हुतात्मा सैनिकांच्या परिवारास देण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली.
वडिलांच्या पश्चात थोरल्या मुलाने शिक्षकी पेशा पत्करला. हनीफुद्दीन अभ्यासात हुशार आणि गाण्यातही उत्तम गती असलेले युवा. दिल्लीच्या शिवाजी कॉलेज मध्ये विद्यार्थीप्रिय. इतके की ‘मिस्टर शिवाजी’ हा किताब प्राप्त केलेले विद्यार्थी कलाकार… शास्त्र शाखेचे पदवीधर. पण कसे कुणास ठाउक हनीफुद्दीन साहेबांना सैन्याच्या गणवेशाने साद घातली आणि ते सैन्यात दाखल झाले. प्रशिक्षण आणि नेमणुकीच्या ठिकाणीही त्यांनी आपले संगीतप्रेम सांभाळले. त्यामुळे ते सर्व सैनिकांत कमालीचे प्रिय ठरले.
सीमेवर जीवघेणा गारठा असतो. जगणं अत्यंत कठीण असतं.. अगदी तगड्या सैनिकांनाही! दोन्ही सैन्याच्या, अर्थात भारत आणि पाक यांच्या तेथील अतिऊंचीवरील सैन्यचौक्या तात्पुरत्या रिकाम्या केल्या जातात आणि हिवाळा संपला की पुन्हा त्यांचा दोन्ही देशांच्या सैनिकांकडून ताबा घेतला जातो, असा अलिखित करार होता, तोपर्यंत तरी, म्हणजे १९९९ पर्यंत. त्याचाच गैरफायदा घेत पाकिस्तानने एप्रिल मे महिन्यातच त्या रिकाम्या चौक्या ताब्यात घेऊन प्रचंड दारूगोळा जमवून ठेवला होता. परदेशातून खरेदी केलेले अत्याधुनिक तंबू, डबाबंद खाद्य पदार्थ, उबदार कपडे.. सर्व तयारी जय्यत.
पहाडांवर आरामशीर बसून त्यांना खाली भारतीय सैन्यावर अचूक निशाणा साधता येऊ शकत होता. भारतीय सैन्याला रसद पुरवठा करण्याच्या रस्त्यावर पाकिस्तान वरून हुकुमत गाजवू शकत होता. रसद बंद झाल्यावर भारतीय सैन्य गुडघे टेकवील आणि मग कश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा नेता येईल, असा त्यांचा कावा होता.
मे महिन्यात एका मेंढपाळाने घुसखोरांना पाहिले. त्यावेळी हा एवढा गंभीर प्रकार असेल, पाकिस्तानी सैन्य यात सामील असेल, असे कुणालाही वाटले नव्हते. तरीही प्रत्यक्ष प्रकार नेमका काय आहे हे तपासण्यासाठी कॅप्टन सौरभ कालिया यांच्या नेतृत्वात पाच जणांची एक गस्त तुकडी १५ मे रोजी पहाडांवर पाठवण्यात आली. या तुकडीवर अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ला झाला. आणि हे सहा सैनिक पाकिस्तानने कैद केले.
पाकिस्तानी सैन्य या प्रकारात सहभागी असल्याचा पाकिस्तान सरकार सतत इन्कार करीत होते. पहाडांवर बंकर बनवून लपून बसलेले ते घुसखोर भारतीय काश्मिरी युवक असल्याचे ते सांगत होते. ते आणि तुम्ही.. तुमचं तुम्ही पाहून घ्या असा त्यांनी धोशा लावला. त्यामुळे या पकडलेल्या सैनिकांची कोणतीही माहिती त्यांनी भारतीय सैन्याला दिली नाही. पाकिस्तानातल्या एका रेडिओ केंद्रावर मात्र भारतीय सैनिक कैद केल्याची बातमी प्रसारित झाली.
पाकिस्तानवर फार दबाव टाकल्यानंतर त्यांनी आठ जून १९९९ रोजी ह्या आपल्या शूर सैनिकांची क्षतविक्षत कलेवरं आपल्या ताब्यात दिली. या वीरांचे त्यांनी जे हाल केले होते ते पाहून राक्षसही लाजले असते!
– क्रमशः भाग पहिला.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈