श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ Let’s HOPE ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
HOPE (Help One Person Everyday !)
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ! ….
त्याच्या आई-बापाने त्याला कोणतंही नाव द्यायला नकार दिला होता. तिथले सगळेच इतर जगाच्या तुलनेत तसे रंगाने काळे. पण हे पिल्लू त्यांच्यापेक्षाही वेगळं निपजलं होतं. हातापायाच्या काड्या आणि मोठाले डोळे,बसकं नाक. आईनं कसंबसं त्याला अंगावर पाजलं काही दिवस.जसं जसं हे पोर मोठं होऊ लागलं तसं बघणारे इतर त्याला विचित्र नजरेनं पाहू लागले! त्यांच्या त्या देशात चेटकीणी मुलांच्या रुपात जन्माला येऊन लोकांना छळतात म्हणे. हे बाळ म्हणजे तशाच एखाद्या चेटकीणीचा मानवी अवतार! बरं,मानवी अवतार म्हणावं तर तसं फारसं माणसासारखं तरी कुठं दिसतंय? लोकांची कुजबूज वाढली. तो पर्यंत बाळ एक वर्षांचा झाला.
दारिद्र्य,अज्ञान आणि अंधश्रद्धा कायमची वस्तीला आलेल्या त्या पृथ्वीवरच्या नरकाच्या जिवंत देखाव्यात माणुसकी,कणव,सदसदविवेकबुद्धी इत्यादी मानवी गुण औषधालाही आढळत नव्हते. सर्वांनी मिळून त्या बाळाच्या आईबापाला दमदाटी केली…..तुझं पोरगं माणूस नाही…चेटकीण आहे….फेकून दे लगेच ही ब्याद ! … आईबापाला ऐकावं लागलं…आणि त्यांचीही तशीच खात्री पटत चाललेली होतीच काही महिन्यांपासून. त्यांच्या आसपास त्यांनी अशी अनेक चेटकी मुलं पाहिली होती….की ज्यांना लोकांनी दगडांनी ठेचून मारून टाकलं होतं….आपल्या पदरातही असाच निखारा पडला की काय?
एके दिवशी रात्रीच्या अंधारात त्या दोघांनी त्या झोपेत असलेल्या लेकरास उचललं आणि रस्त्यावर आणून टाकलं. त्याला ठेचून मारून टाकण्याची हिंमत नव्हती त्यांच्यात….हे त्या बाळाचं दैव बलवत्तर असल्याचं लक्षण !
सकाळ झाली…बाळाने टाहो फोडला. येणा-या-जाणा-यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं…अशी अनेक मुलं असतात रस्त्यावर फेकलेली. त्यातून हे तर चेटकीणीसारखं दिसणारं पोर….. आठ महिने कशाला म्हणतात? इतक्या दिवस हे बालक जगलं हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतंच. कुत्र्याच्या एखाद्या पिलासारखं हे माणसाचं पिलू जमेल तसं जगलं…रस्त्यावर रांगता रांगता हाती लागेल ते तोंडात घातलं….पुढे काही दिवसांत स्वत:च्या पायांवर चालू लागलं…अठरा महिने झाले होते त्याला जन्मून. जंगलात हरीणीची पाडसं जन्मल्या नंतर काही तासांतच उड्या मारू लागतात. खरं तर माणसाच्या अपत्यांना ही सवलत नसते. पण हे मूल आता आपल्या मनानेच मोठं झालं होतं !
ती…समाजसेवेसाठी होतं-नव्हतं ते सारं विकून घराबाहेरच नव्हे तर देशाबाहेर पडलेली तरूणी. उत्तम शिकलेली. एका कापड कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरी करीत होती आधी. तत्पूर्वी निम्मं अधिक जग फिरून आलेली. कधी कधी एकटीनं प्रवास केलेला होता तिने. तो ही युरोपात नव्हे तर दारिद्र्य,रोगराई,गुंडगिरी,अंधश्रद्धा यांनी ग्रासलेल्या आफ्रिकी देशांमध्ये. नायजेरीया सारख्या देशांत वेगळं रूप घेऊन जन्मलेल्या मुलांना चेटकीणी समजून त्यांच्या हत्या केल्या जातात, हे तिने पाहिले आणि अनुभवलेही होते.
नोकरीतून साठवलेले काही पैसे, स्वत:च्या नावे असलेली स्थावर, जंगम मालमत्ता विकून आलेले काही पैसे तिने गाठीशी बांधले आणि ती निघाली….या चेटकीण बालकांना वाचवायला. तिला तिथल्या लोकांनी शक्य तो सर्व त्रास दिला, ती काही महिन्यांची पोटुशी असताना तर तिचं तिच्या एका स्थानिक कार्यकर्त्यासह चक्क अपहरणही झालं होतं पैशांसाठी. तिला अनेकवेळा धमकावण्यातही आलं होतं….ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावून घर सोडलेली ती….आपलं मानवीय कार्य करीत राहिली. तिचा लाईफ पार्टनरही तिच्या सोबत आला होता या कामात तिला मदत करायला.
टळटळीट दुपारची वेळ. आफ्रिकेतील ऊन ते. सगळीकडे धुरळा उठलेला. रस्त्यावर शेकडो लोक आहेत. त्यांच्या गर्दीत तिला ते मूल दिसलं…कसंबसं हालचाल करीत एक एक पाऊल पुढे टाकीत निघालेलं दिसेल त्या दिशेला. ती गाडीतून खाली उतरली. तिने त्या लोकांना विचारलं…कुणाचं मूल आहे? नाव काय याचं? कुणी याला खायला घातलंय की नाही गेल्या कित्येक दिवसांत? कुणाकडेही काहीही उत्तर नव्हतं. गेली आठ महिने अन्नान दशेत जगलेलं हे मूल…शरीर कसंबसं तग धरून होतं….. तिने आपल्या हातातील बिस्कीटांपैकी एक बिस्कीट त्याच्या हातात दिलं…त्यानं ते लगेच घेतलं आणि तो अत्यंत हळूहळू आणि काळजीपूर्वक एक एक घास खाऊ लागला. तिने पाण्याची बाटली त्याच्या सुकलेल्या ओठांपाशी नेली. त्याने तिच्याकडे बघत बघत एक एक घोट पाणी प्यायला आरंभ केला. खपाटीला गेलेलं पोट..सर्व बरगड्या सताड उघड्या. दुस-याच क्षणी तिने निर्णय घेतला….या कुणाच्याही नसलेल्या बाळाला सोबत घेऊन जायचं !
तिने त्याला कपड्यात गुंडाळलं अलगद. कारमध्ये बसली त्याला मांडीवर घेऊन. तिच्या नव-याने तिच्याकडे पाहिलं…त्याचे डोळे तिला जणू सांगत होते..हे बाळ काही फार दिवसांचं सोबती नाहीये! ती म्हणाली….मला आशा आहे हे जगू शकेल! आपण याचं नाव होप ठेऊयात का? हो,छान आहे…तो म्हणाला. आणि ते दोघं त्यांनी उभारलेल्या एका बालकाश्रमात आले. तिथं अशीच काही मुलं होती लोकांनी चेटकीण म्हणून हाकलून दिलेली…मारून टाकण्याचा प्रयत्न केलेली.
माणसाला जगायला अन्न लागते,पण जीवनाला प्रेम,वात्सल्य गरजेचं असतं. मथुरेतून आलेल्या कन्हैय्याला यशोदेनं दूधही पाजलं आणि प्रेमामृतही…म्हणूनच कान्हा वाढला. या कृष्णवर्णीय बालकाला तिने आपल्या बालकाश्रमात आणून भरती केलं. जणू ते काल-परवाच जन्माला आलंय अशी त्याची काळजी घ्यायला सुरूवात केली…जणू त्याचं आयुष्य अठरा महिन्यांनी मागे गेलं होतं…नव्यानं आरंभ करण्यासाठी.
तिच्या मनातील आशेने आता बाळसं धरायला प्रारंभ केला. साजेसं अन्न,स्वच्छता,निवारा आणि नि:स्वार्थ प्रेम या चार गोष्टींनी आपला परिणाम दाखवला काहीच दिवसांत….खुरटलेलं,रोगानं ग्रासलेलं,सुकलेलं हे मानवी रोपटं आता अंग धरू लागलं…..आता ते जिवंत राहण्याचं स्वप्न पाहू शकत होतं…आणि ते जगावं अशी तिला आशा होती….आणि तसं झालंच! त्या कुरूप वेड्या पिलाचं एका राजहंसात रूपांतर झालं! चेटकीणीचा शिक्का बसलेलं ते मूल आता देवदूतासारखं दिसू लागलं होतं! होप आता शाळेत जाऊ लागला आहे. (ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे…आता होप बराच मोठा झाला असेल.)
तिचं नाव Anja Loven. यातील j चा उच्चार ‘य’ असा करायचा. अन्या लोवेन तिचं नाव. आडनावात तर Love आधीपासूनच असलेलं..जणू देवानंच दिलेलं नाव….. अन्या डेन्मार्क मध्ये जन्मलेली. पदवीधर. शिक्षणानंतर जग पाहण्यासाठी हिंडली. एका हवाई कंपनीत नोकरी केली काही दिवस. तिच्या आईला जीवघेणा कॅन्सर झाला म्हणून तिच्या सेवेसाठी ती घरीच राहिली…आई गेल्यानंतर तिने आपलं गाव सोडलं. एका कापड व्यवसायात व्यवस्थापकपदी पोहोचली. एका वर्षी सामाजिक कामाच्या निमित्ताने मालावी देशात जाऊन आली. टांझानियातील शाळांच्या मदतीसाठी तिने निधी जमवायला सुरूवात केली. २०१२ मध्ये अन्याने एक सामाजिक संस्था स्थापन केली. नायजेरीय सारख्या देशातील बालक-चेटकीण अंधश्रद्धेविषयी तिने ऐकलं आणि तिला ध्येय गवसलं…जवळचे सर्व विकून ती नायजेरीयात राहायला गेली…तिथे एक बालक संगोपन केंद्र काढलं जिथे अशा चेटकीण-बालकांना आसरा,शिक्षण दिलं जातं. नायजेरीयातील एका कायदेतज्ज्ञ माणसाशी, इम्यानुअल उमेम शी विवाह केला….त्यांना एक मुलगा आहे आता. अन्याने २०१५ मध्ये स्वत:ची जागा विकत घेऊन काम वाढवलं आणि लॅन्ड ऑफ होप चिल्ड्रेन्स सेंटर सुरू झालं. इथं आता शंभरच्या आसपास मुलं आहेत….चेटकीणींचं रूपांतर देवदूतात करण्याचा प्रयत्न सुरू आहे….कारण तिच्या मनात अखंडीत आशा आहे !
(इंटरनेटवरील प्रोजेक्ट नाईटफॉल पेजवरील एका विडीओमध्ये अन्याची गोष्ट पाहिली आणि तुम्हांला सांगावीशी वाटली. आपल्याकडेही सिंधुताई सपकाळांसारख्या माई होऊन गेल्या…त्यांची आठवण झाली यानिमित्ताने. अन्या म्हणते… HOPE means Help One Person Everyday!अन्याचं खरंच आहे…हे आपण करूच शकतो !)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈