श्री कचरू चांभारे
इंद्रधनुष्य
☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-१ ☆ श्री कचरू चांभारे ☆
2 सप्टेंबर हा दिवस वि. स. खांडेकर यांचा स्मृतिदिन. विष्णू सखाराम खांडेकर म्हणजे मराठी साहित्यातला कोहिनूर हिरा.एका शब्दाच्या स्पष्टीकरणासाठी त्या शब्दाला उपमानाचे विविध अलंकार चढवून ,इंद्रधनूची कमान सजवून तो शब्द मांडावा तो खांडेकरांनीच. वि.स.ना भाऊ या नावाने संबोधत असत, पण हेच भाऊ साहित्यातला ‘ दादा ‘ माणूस होता ,बाप माणूस होता.
ऊंचा जन्म कोकणातला .आजोळचं राहणं एका गणपती मंदिरातलं. गणपती मंदिरातच त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव गणेश ठेवले होते. गणेश आत्माराम खांडेकर हा बालक शाळेत खूप हुशार होता. वडिलांचं छत्र जास्त दिवस मिळालं नाही. बाल गणेश जेमतेम बारा तेरा वर्षाचा असतानाच वडील सोडून गेले. मामाच्या मदतीने त्यांनी उच्च शिक्षण घेतले. 1913 साली ते मॕट्रिक उत्तीर्ण झाले तेव्हा अहमदाबाद ,बेळगाव,मुंबई या बोर्डातून ते पहिल्या दहात होते. वाचन व लिहिण्याची त्यांना खूप आवड होती.सोळाव्या वर्षीच त्यांनी ‘ रमणीरत्न ‘ नावाचे नाटक लिहिले होते.त्यावेळचे प्रख्यात नाटककार वासुदेवा शास्त्री त्यांना म्हणाले होते की ,’ हे नाटक तू लिहिले आहेस.यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही.’ ते नाटक म्हणजे उत्कट प्रेमाचा आशय होता.हे नाटक प्रकाशित होऊ शकले नाही.
शिरोडे जि.सिंधुदुर्ग येथे भाऊंनी जवळपास अठरा वर्षे शिक्षक म्हणून काम केले. ययाति,अमृतवेल वगळता त्यांच्या अनेक साहित्यकृती शिरोड्याच्या शाळेतच जन्माला आल्या. ‘ हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी लिहिली व भाऊ थेट ज्ञानपीठापर्यंत पोहचले. साहित्य क्षेत्रातलं सर्वोच्च मानाचं पद स्वीकारत असताना त्यांच्या पूर्णतः दृष्टीहीन डोळ्यात सगळा जीवन चित्रपट उसळला असेल. वडिलांच्या मृत्यूनंतर ते खूप पोरके झाले होते. मामा वगळता जवळच्या नात्यातून कोणाची मदत होत नव्हती. त्यांचे चुलते सखाराम यांनीही मदत नाकारली होती. या सखारामला चौदा अपत्य होऊनही फक्त एकटी वारणाक्का जिवंत होती. पुढे याच सखारामने वारसा चालविण्यासाठी गणेशला दत्तक घेतले व हा गणेश म्हणजेच तिथून पुढचा विष्णू सखाराम खांडेकर होय. वारणाक्का बहिणीने दिलेले भाऊ हे कौटुंबिक नाव त्यांना आयुष्यभर चिटकून राहिले.
भाऊंनी अमर्याद लेखन केले. लेखनाचे विषय व त्या विषय अनुषंगाने उभी केलेली पात्रे अजरामर झाली.
‘रिकामा देव्हारा‘ ही त्यांची कादंंबरी स्त्रीचे महत्व सांगणारी आहे. ज्या घरात स्त्रीस देवतेसमान मानले जात नाही, ते घर म्हणजे रिकामा देव्हाराच होय. एवढ्या एका ओळीवरून कादंबरीच्या विषयाची प्रचिती येते. ‘ जळलेला मोहर ‘ मांडताना त्यांनी स्वप्नभंग झालेल्या स्त्रीची कथा मांडली आहे.’ अश्रू ‘ कादंबरीचा नायक म्हणजे शिक्षकी व्यवसायतल्या गुरूजीच्या तत्वनिष्ठेचा उत्कृष्ट नमुना होय.
लहानपणीपासूनच प्रकृतीने कृश असलेल्या खांडेकरांना उत्तम प्रकृतीमानाचे स्वास्थ्य लाभले नाही. दोन्ही डोळे अधू होते .कणकण व अंगातला ताप तर कायम पाचवीला पुजलेला. शिरोडे येथे कार्यरत असताना एकदा सर्पदंशही झाला होता. वाढत्या वयानुसार डोळ्याचा नंबरही वाढत गेला.1972 साली भाऊंच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. दुर्दैवाने शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली व जगाला शब्दसूर्याचा प्रकाश देणारा हा शब्दमहर्षी कायमचा अंधकारमय झाला. चार लेकरं पदरात देऊन पत्नीनेही जाण्याची घाईच केलेली होती. जीवापाड जपलेली उषा ,अर्ध्या वाटेतच काळोख करून गेली होती. पत्नीवियोगानंतरचं आयुष्य अत्यंतिक खडतर असतं. पत्नी उषाताईच्या अकाली जाण्याने भाऊ खचले होते .वाचन व लेखन या दोन शक्ती त्यांच्या प्राण होत्या. मंदाकिनी ही त्यांची लेक भाऊंची आईच झाली होती. स्वतःची नोकरी सांभाळत तिनं अंध भाऊचे आजारपण सक्षमपणे पेलले होते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत.
राम गणेश गडकरी हे वि.स.खांडेकरांचे गुरू. एकदा बालगंधर्वाच्या घरी गडकरी व विशीतला वि.स.गेले होते. त्यावेळी हा तरूण कोण ? या बालगंधर्वाच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले होते.. ‘ हा तरूण श्रीपाद कोल्हटकरांच्या गादीचा वारसदार आहे.’ त्या काळात सांगली म्हणजे नाट्यासाठी स्वर्गभूमी होती व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या रंगभूमीचे निर्विवाद देव होते. इतक्या मोठ्या माणसासोबत झालेली तुलना व तुलना करणारे गडकरी म्हणजे साहित्य क्षेत्रातला अढळ तारा…. या दोन्हीचा सुखात्म परिणाम खांडेकरांच्या हृदयात लेखनाचे बीज पेरून गेला व त्यांनी जे पेरले ते आज जगासमोर आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या मूल्यांची कास वि.स.खांडेकरांच्या लेखनात दिसून येते. प्रस्तावना हे भाऊंचे खास बलस्थान. औपचारिक प्रस्तावना असं न लिहिता भाऊ ‘ दोन शब्द ‘ असं लिहून पुस्तकाची पार्श्वभूमी लिहितात. ‘ पहिले प्रेम ‘ या पुस्तकाला तर कादंबरीपेक्षा प्रस्तावनाच मोठी वाटावी इतकी ती विस्तृत आहे. स्वतःच्या सर्व ग्रंथासह इतर ६३ लेखकांसाठी त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
त्यांच्या प्रस्तावनेचे गारूड कुसुगाग्रजांच्या नजरेतून सुटले नाही. कुसुमाग्रजांनी वि.स.च्या प्रस्तावनेवर एक ग्रंथ लिहिलेला आहे. साहित्य क्षेत्राततल्या एका प्रज्ञासूर्याला दुस-या प्रज्ञासूर्याकडून वेगळी मानवंदना काय असू शकते ? नाटक, कादंबरी, समीक्षा ,कविता, कथासंग्रह ,ललितलेखन,निबंधलेखन,नियतकालिकासाठी स्तंभ लेखन,संपादन, अग्रलेख…. असं जे जे म्हणून साहित्यातलं काही असेल त्या प्रत्येक क्षेत्रात भाऊंनी एखाद्या चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे अनभिषक्त राज्य केले आहे. तुमची कोणती साहित्यकृती तुम्हाला फार आवडते ?असं भाऊंना विचारल्यावर भाऊ मिश्किलपणे म्हणत.. ‘ आईला सगळी लेकरं सारखीच.’ तरीही भाऊंना ‘ उल्का ‘ कादंबरी खूप आवडत असे. त्यांनी उल्केच्या प्रास्ताविकातही हे लिहिलं आहे.
उल्का म्हणजे काही अंशी त्यांचं स्वतःचं कथानक आहे. तत्वाला मुरड घालणाऱ्या व मरेपर्यंत तत्वाला चिकटून राहणाऱ्या अशा दोन मतप्रवाहांची कथा म्हणजे उल्का. या कादंबरीत भाऊसाहेब हे एक पात्र आहे. अनेक लोकांना हे पात्र म्हणजे वि.स.खांडेकरच वाटतात. वि.स.खांडेकर लेखनाच्या श्रीमंतीत कुबेराहून अधिक श्रीमंतीचं जीवन जगले पण आर्थिक सारीपाटावर त्यांचे घर नेहमीच दैन्यावस्थेचे प्रतीक राहिले.सहकारी शिक्षकमित्राच्या मुलीच्या लग्नासाठी स्वतःच्या एका कादंबरीचे संपूर्ण मानधन देणारा हा दाता ,स्वतःसाठी मदतीची याचना करू शकला नाही. अप्रत्यक्षपणे त्यांनी मांडलेली विवंचना लोकांना पुस्तकाचाच भाग वाटली.
– क्रमशः भाग पहिला
© श्री कचरू चांभारे
संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड
मो – 9421384434 ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈