श्री हेमंत तांबे
इंद्रधनुष्य
☆ कृष्णं वंदे जगद्गुरुम् ☆ श्री हेमंत तांबे ☆
भगवान कृष्णाने छोट्या करंगळीनंच गोवर्धन पर्वत का उचलला ?
तसंही आपण सर्व जाणतोच की, इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी श्रीकृष्णानं करंगळीनं गोवर्धन उचलला.
दुसऱ्या बाजूने सुध्दा या प्रसंगाचा विचार करता येईल.
जेव्हा कृष्णानं इंद्राच्या रागा पासून गोकुळ वासियांचं संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वतच आपल्या बोटानं उचलण्याचं ठरवलं, तेव्हा कृष्ण आपल्या हाताच्या बोटांना विचारतो, मी कोणत्या बोटानं पर्वत उचलू ?
सर्वात आधी अंगठा म्हणाला, मी सर्वात ताकदवान आहे, पुरुष आहे, बाकीच्या तर स्त्रिया आहेत, आपण पर्वत उचलण्यासाठी माझाच वापर करावा !
नंतर तर्जनी म्हणते, भगवान, कधी कुणाला चुप बस असं सांगताना मिच कामास येते.आणि आपण जे काम करणार आहात ते इंद्राला चुप करण्याचंच आहे.म्हणून आपण माझा वापर करावा, हे उत्तम !
यानंतर मध्यमा म्हणाली, सर्वात उंच होण्यासोबतच मी ताकदवान सुध्दा आहे.म्हणून या कामासाठी आपण माझाच विचार करावा !
अनामिकेला खात्री होतीच, तरीही ती म्हणाली, भगवान, सर्व पवित्र कामं माझ्यामुळं संपन्न होतात. सर्व मंदिरांत मीच देवतांना टिळा लावते.
आता कृष्णानं फक्त छोट्या करंगळीकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात पाणी होतं, ती म्हणाली, ” भगवान, एक तर मी सगळ्यात छोटी आहे.माझ्यात असा कोणताच असामान्य गुण नाही.
माझा कुठं उपयोग सुध्दा होत नाही. माझ्याकडे एवढी शक्ती सुध्दा नाही, की मी पर्वत उचलू शकते. मला फक्त याची खात्री आहे की, मी तुझी आहे !” छोट्या करंगळीचं म्हणणं ऐकून भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, “ कनिष्ठे तुझी विनम्रता पाहून मी आनंदी झालो आहे. जर काही उच्च मिळवायचं असेल तर विनम्र होणं आवश्यक आहे.” ….. आणि कनिष्ठेच्या सन्मानासाठी भगवंतानं करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला !”
कृष्णं वंदे जगद्गुरुम्
© श्री हेमंत तांबे
पाटगाव.
मो – 9403461688
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈