श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ तिसरं ‘क्षितीज’ विस्तारताना…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
सृष्टीच्या निर्मात्याने स्त्री आणि पुरूष अशी दोन आभाळं निर्माण केली आणि त्यांना आपापली क्षितीजं नेमून दिली…पण या दोन्ही क्षितीजांच्या जाड, ठसठशीत सीमारेषांच्या मध्ये एक निराळंच आभाळ उगवलं आहे, याचं त्यालाही भान राहिलं नसावं कदाचित! या आगंतुक आभाळाला क्षितीज दिलं जाण्याचा प्रश्नच उदभवला नसावा त्याच्या मनात !
पौरूषत्वाचं रूपडं घेऊन उगवलेली असंख्य नक्षत्रं मात्र स्त्रीत्वाच्या क्षितीजाकडे धाव घेत होती. आणि स्त्रीत्त्वाचं क्षितीज काही तेवढं विस्तारलेलं नव्हतं यांना कवेत घेण्याइतपत. एका बाजूला देह पुरूषांच्या आभाळात अडकून आणि मन त्या दुस-या नाजूक आभाळाकडे डोळे लावून बसलेलं ! यातून संघर्ष, निराशा, अवहेलना, प्रताडना, उद्विग्नता, असहाय्यपणा असा उल्कापात होणं निसर्ग नियमाला धरूनच होतं. अवकाशातून पृथ्वीकडे झेप घेणारे ख-याखु-या खगोलीय पदार्थांपैकी निदान काहींना जमीनीच्या कुशीत आसरा मिळतो…पण या तिस-या आभाळातील तारका पृथ्वीकडे वेगाने निघालेल्या असताना वातावरण त्यांना मधल्यामध्येच जाळून भस्म करून टाकते….राख मग फिरत राहते अंतराळात…अनंत काळाचा अंत होण्याची वेडी आशा मनात मिरवत !
विषयच एवढा लपवून ठेवलेला की शब्दांतून व्यक्त नाही होत सहजी…फक्त आवाजातून ऐकू येत राहतो…दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर जोरात आदळले आणि दोन्ही तळव्यांच्या मध्ये चेपली गेलेली हवा तिथून निसटायचा प्रयत्न करते तेंव्हा एक ध्वनी निर्माण करत जाते. जे ‘त्यातले’ नाहीत,ते आपण त्यातले नाही आहोत या समाधानाचा सुस्कारा सोडत पुढे निघून जातात. पण जे त्यातच आहेत…त्यांना देह जगवण्यापुरता तरी हात पसरावा लागतोच ! पुरुषी देह स्त्रीत्वात नटवण्यासारखं अवघड काम जगात दुसरं नसावं बहुदा. कारण वाढत्या वयासोबत पौरूषत्वाच्या खुणा अधिकाधिक गडद होत गेलेल्या असतात,त्या मिटवणं जिकीरीचं होत जातं. स्वरयंत्राने आपल्या तारा आधीच जुळवून ठेवलेल्या असतात, त्यातून कोमल स्वर निघणं केवळ अशक्य…खर्ज मात्र लागतोच लागतो ! राऊळाच्या दारातील घंटेचा लोलक घंटेच्या तनूकडे ढकलावा आणि त्यातून मंजुळ ध्वनीऐवजी वीजेचा कडकडाट कानी पडावा…असं झालं तर कोण ऐकत थांबणार…तेथून आवाजाच्या कक्षेच्या बाहेर पळण्यातच भले !
पण हा कर्कश आवाज मनापासून ऐकून तो इतरांच्या कानांवर सहन होईल अशा रितीने पोहोचवण्याचा अत्यंत प्रामाणिक आणि तितकाच परिणामकारक प्रयत्न करणारा एक लेखक, कवी मराठीत निर्माण झाला याचं मराठी माणूस म्हणून कौतुक वाटणं साहजिकच आणि माणूसकीला धरूनच आहे, असं म्हणावं लागेल.
क्षितीज पटवर्धन त्याचं नाव. लेखक म्हणून आघात, सतरंगी रे, टाईमपास, लग्न पहावं करून, डबल सीट, क्लासमेटस,वायझेड,फास्टर फेणे, माऊली, धुरळा इथपर्यंत चित्रपट. मोहिनी, मन धागा धागा जोडते नवा, अरे कृष्णा…अरे कान्हा, मन शेवंतीचे फूल, रोज रोज नव्याने, तुला जपणार आहे, जल्माची वारी, इथपासून ते.. फिसल जा पर्यंत गीतकार, आधी नाटक-दिग्दर्शक,लेखक आणि असंच बरंच काही नावावर असणारा क्षितीज तृतीय पंथी बांधवांच्या ‘ताली’ मध्ये आपला तळहात मिळवतो तेंव्हा त्याच्याबद्दलचा आदर प्रचंड दुणावत जातो !
या आधीही या तिस-या जगातल्या विषयाला अनेकांनी स्पर्श केलाय…पण क्षितीजने विषय प्रवेशच केला नाहीये केवळ, तर विषयाचा काही विषयच ठेवलेला नाही. कोरोनाचं संकट, वाटेत आलेले नकार,आपला विषय पटवून देताना करावे लागणारे दिव्य, चंदेरी दुनियेत मराठी स्वप्नांना मुळातच असलेली पडेल किंमत, या आणि अशा अनेक लाटांना तोंड देत क्षितीजने ‘ताली’ वाजवून तर दाखवलीच आहे, पण जो कोणी ही ‘ताली’ ऐकेल, पाहील त्याला एकच टाळी नव्हे तर टाळ्यांचा कडकडाट करायला भाग पाडलं आहे..आणि या टाळ्यांना आसवांची ओलही त्याच्याच शब्दांनी प्रदान केलेली आहे. आजकाल माणसांना रडवणं अत्यंत अवघड झालेलं असताना किमान सहृदय माणसांच्या काळजातील खोलवरच्या पाण्याला पृष्ठभागावर आणण्याचं भगीरथी काम क्षितीजने केले आहे…हे ताली पाहताना, ऐकताना, समजून घेताना पदोपदी जाणवत राहतं. ताली एक एक भाग करून पहावा लागतो…जशी भरलेल्या सभागृहात कुणी प्रेक्षक एका टाळीने सुरूवात करून देतो तसं आहे हे काहीसं. मग पाहणा-याची विषयाच्या ब्रम्हानंदी टाळी लागते…शेवटच्या भागाच्या अंतापर्यंत पाहणा-याचा जीव टांगणीला लागून राहतो…आणि सकारात्मकतेचा ध्वनिकल्लोळ उमटवून टाळी थांबते….मात्र तिचा आवाज मनात खोलवर रूजत जातो.
‘ ताली ‘ चित्रपट असता तर किती बरे झाले असते…सलग एक परिणाम विषयाला एक वेगळे परिमाण देऊन गेला असता. आणि आणखी लोकांपर्यंत पोहोचला असता. सर्व भाग एकत्र करून नवे प्लॅटफॉर्म न परवडणा-या किंवा सहज उपलब्ध नसलेल्या लोकांपर्यंत ताली पोहोचला तर छानच होईल. तालीमधले हिंदीतले संवाद थेट मनावर कोरले जातात. हे संवाद छापील स्वरूपात वाचायला मिळाले तरी एक आख्खी कादंबरी, एक समग्र आत्मचरित्र वाचल्याचे समाधान निश्चित लाभेल. अर्थात हे माझ्यासारख्या सामान्य वाचकाचे, प्रेक्षकाचे स्वप्नरंजन आहे म्हणा. प्रत्यक्षात लेखकाला किती अडचणी आल्या असतील हे आपल्याला नाही समजणार.
दिग्दर्शक रवी जाधव…मानलं ! स्वच्छतागृहात एका बाजूला पुरूष आणि दुस-या बाजूला स्त्री अशी खूणचित्रे दिसताहेत…आणि भिंतीवर मधोमध असणा-या आरशात नायिकेचे प्रतिबिंब अधिकाधिक स्पष्ट होत जातं आहे….तिच्या चेह-यावरची शाई तिने वॉशबेसिन मध्ये धुण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती शाई हळूहळू तिथून वॉशबेसीनच्यामध्ये असलेल्य छिद्रातून ओघळून जाते आहे….ही कमाल रवी जाधवांचीच खास ! निर्माते अर्जुनसिंग बरन, कार्तिक डी.निशानदार यांची निर्मिती प्रशंसनीय. गाणी,संगीत,अभिनय,चित्रीकरण,प्रतिमांचा वापर, कसलेल्या कलाकारांचा अभिनय, नवख्या कलाकारांचा वावर आणि करून घेतलेला वापर…यावर स्वतंत्र लिहावे लागेल.
लढवय्या गौरी सावंत सुश्मिता सेन यांच्या आवाजातून आणि चेह-यावरून जिंकत जाताना दिसतात ….त्या विजयात क्षितीज पटवर्धन नावाच्या शब्दांच्या, भावनांच्या, विचारांच्या शिलेदाराचे मोठे योगदान असते…..गौरी सावंत यांना समाजाने वीजेचे लोळ दिले,वादळं दिली…क्षितीजने श्री गौरी सावंत यांच्या संघर्षाच्या आभाळाला इंद्रधनुष्य दिले असेच म्हणावे लागेल !
‘त्या’ सर्वांना ‘ताली’ पाहता यावा. किंबहुना तशी सोय कार्यकर्त्यांनी करावी. ‘त्यातले’ नसलेल्या सुदैवी लोकांनी ‘ताली’ पहावीच…किंबहुना ते आपले कर्तव्यच आहे. वेदनेला अंत नसला तरी किमान काहीजणांना खंत वाटू लागली तरी क्षितीजच्या शब्दांचे चीज होईल. त्यातून काही चांगले निर्माण होईलच कधी न कधी तरी. लेखक,कवी,संवाद लेखक क्षितीज पटवर्धन यांचे हे वर्तमानातील काम भविष्यकाळात ऐतिहासिक ठरेल,हे निश्चित !
(‘ताली’ या वेब सिरीजबद्दल हा माझा View लिहिलाय ! अधिक-उणे असेलच.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈