श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाच्या गहनतळी… ☆ श्री सुनील देशपांडे

आजकाल सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी आपल्या संस्कृतीचे गोडवे गात असताना किंवा धर्म संकल्पनेचे गोडवे गात असताना, जे जे आधुनिक विज्ञानामधले शोध लागलेले आहेत, ते सगळे पूर्वीच आमच्या संस्कृतीमध्ये किंवा धर्मात अस्तित्वात होते असे सांगितले जाते.  त्यासाठी तार्किक समीकरणे जोडून पुरावे सुद्धा दिले जातात. या सर्व गोष्टींची गंमत वाटते. 

एक प्रश्न असा पडतो की जे  जे आपल्याकडे होते, ते सर्व परदेशी शास्त्रज्ञांनी शोध लागल्यानंतरच आपल्याला कसं समजलं ? त्याआधी कसं माहित नव्हतं ?  जर हे आपल्याकडे आधीच होतं तर परदेशी शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांच्या आधीच आपण हे शोध इंग्लिश भाषेमध्ये भाषांतरित करून का सादर केले नाहीत ?  त्यांनी शोध लावल्यानंतरच मग आपण कित्येक वर्षानंतर आमच्याकडे हेच कित्येक वर्षांपूर्वी होतं असं सांगण्याची सर्कस का करतो ? ते सुद्धा सुरुवातीला त्या शोधांना विरोध करून, नंतर त्यांची सिद्धता आणि उपयोगिता या बळावर जेव्हा जगभर पसरते त्यानंतर मग हे आमच्याकडे होते असं सांगण्याची अहमहमिका सुरू होते. असं का ? .. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी माझ्याच मनाच्या गहनतळात खोल बुडी मारून विचार करू लागलो.

गहनताळात जाऊन विचार करता  मला दोन शक्यता आढळून आल्या.

पहिली शक्यता ही की हे सर्व शोध एका वेगळ्या स्वरूपात आपल्याकडे होते असे गृहीत धरू. मग ते मध्येच लुप्त होण्याचे कारण काय ?  हे संशोधन थांबण्याचे कारण काय आहे ?  या शास्त्रज्ञांच्या शोधाची पुढे काहीच प्रगती का नाही झाली ?  या सर्वांचा विचार करता असे झाले असण्याची शक्यता आहे की, काही स्वार्थी प्रवृत्तींनी या सर्व शास्त्रज्ञांना बाजूला सारून, सत्ताधारी राज्यकर्त्यांना हाताशी धरून स्वतःची राज्यसत्ता आणि धर्मसत्ता अबाधित राखण्यासाठी काहीतरी षडयंत्र करून या संशोधनामागील तत्त्व सोडून दिले . त्या संशोधनाला विकृत स्वरूप देऊन काही रुढी निर्माण केल्या.  त्यालाच शास्त्र म्हणून पुढे करून पुढील पिढ्यांची दिशाभूल केली.  मुख्य तत्व न अंगिकारता फक्त रुढींनाच शास्त्र समजून त्या रूढींचं अवडंबर माजवलं गेलं. त्यामुळे धर्माचं किंवा संस्कृतीचं मूळ तत्व हे बासनात गुंडाळून त्या तत्त्वाच्या अनुषंगाने त्यावेळच्या कालमान परिस्थितीनुसार ज्या काही रूढी पडल्या होत्या त्याच अपरिवर्तनीय मानून त्याला धर्माचे स्वरूप दिलं गेलं.  ज्या ठिकाणी परिवर्तनीयता संपते त्या ठिकाणी धर्माचं भ्रष्ट स्वरूप अंगिकारलं जातं. 

दुसरी शक्यता अशी की परकीय  आक्रमकांनी संशोधक आणि त्यांचे संशोधन या गोष्टी नष्ट केल्या. त्यामुळे पुढील संशोधन होऊ शकले नाही.  काही सत्ता लोलुप धर्मपिठाधिशांना हाताशी धरून परकीय आक्रमकांनी त्यांचे वर दवाव आणून विकृत रूढींनाच धर्मस्वरूप म्हणून लोकांमध्ये प्रस्तुत केले. ज्यायोगे राज्यसत्तेविरुद्ध लोकांनी बंड करून उठू नये.  कारण काही संशोधनांती काही काही गोष्टी खऱ्या असतील याचे पुरावे सापडतात. उदाहरणार्थ कै. शिवकर बापूजी तळपदे या गृहस्थाने विमानविद्या या संस्कृत ग्रंथाच्या आधारे राइट बंधूंच्या सुमारे दहा वर्षे आधी विमानाची निर्मिती केली होती. याचा उल्लेख ब्रिटिशांच्या त्या काळातील गॅझेटमध्ये सापडतो. तसेच केसरीच्या त्याकाळच्या लेखांमध्येही सापडतो.  ते विमान दहा ते पंधरा मिनिटे मुंबईच्या चौपाटीवर आकाशात उडाले होते याचाही उल्लेख ब्रिटिश गॅझेट मध्ये आहे. त्याला त्याकाळी अनेक साक्षीदार ही होते. तळपदे यांना लोकमान्य टिळकांनी असे सुचितही केले होते की, इंग्लंडमध्ये विमानाचे संशोधन चालू आहे.  तेथील संशोधकांची मदत घेऊन यामध्ये आणखी काही प्रगती करता येईल का ? यासंबंधी विचार करावा.  परंतु तळपदे यांचा म्लेंच्छांची मदत घ्यायला विरोध होता. त्यांनी ते मानले नाही.  तसेच त्यांनी त्यांच्या पुढील पिढीला अथवा दुसऱ्या कुणालाही त्या संशोधनाची विस्तृत माहिती दिली नाही किंवा शिष्य म्हणून हाताशी धरले नाही. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या त्या डायऱ्या, नोंदी आणि ते सर्व साहित्य त्यांच्या मुलाबाळांनी अडगळीत ठेवून दिले होते.  ब्रिटिश गॅझेट मधील उल्लेख वाचून लंडन मधून रॅली ब्रदर्स नावाच्या एका कंपनीने त्यांच्या अधिकाऱ्यांना पाठवून चांगला आर्थिक मोबदला देऊन त्या सर्व नोंदी डायऱ्या आणि सर्व इक्विपमेंट खरेदी करून लंडनला नेले. त्यामुळे तळपदेंच्या नंतर त्याचे पुढे काहीही आपल्या देशात होऊ शकले नाही. तळपदेंच्या चरित्रासंबंधाने संशोधन करून हिंदीमध्ये  ‘हवाईजादा’ या नावाचा एक चित्रपट निर्माण केला गेला होता. खूप चांगला चित्रपट.  तो अजूनही युट्युब वर उपलब्ध आहे. अर्थात त्या चरित्राच्या अनुषंगाने थोडीफार फिल्मी लिबर्टी घेतली असणारच. पण तरीही तो चित्रपट बघण्यासारखा आहे. 

शेवटी संशोधन ही एकट्याने करायची गोष्ट नाही. ती सामूहिक पद्धतीने केल्यास ती पुढे सरकते आणि अधिकाधिक संशोधन होऊन प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगात आणता येते. त्यामुळे संकुचित वृत्ती न ठेवता सामूहिक रीतीनेच  पुढे जाणे या गोष्टींचा मधल्या काळात अभाव झालेला आढळतो.  त्यामुळेही संशोधन पुढे जाऊ शकले नसावे.

‘दीर्घतमस् आणि सूर्य ‘ या नावाचे पुस्तक मी फार पूर्वी कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या लायब्ररीमध्ये वाचले होते.  त्यामध्ये दीर्घतमस ऋषींनी खगोलशास्त्राच्या अभ्यासातून मांडलेल्या सिद्धांताचे श्लोक रूपाने कशा पद्धतीने वर्णन केले होते ते सविस्तर सांगितले आहे.  त्यावरून सूर्य आणि पृथ्वी याचे अंतर,  पृथ्वी आणि चंद्र यांचे अंतर पृथ्वी आणि मंगळ यांचे अंतर अशा बऱ्याचशा गोष्टींचे अचूक आडाखे आजच्या संशोधनानुसार सिद्ध होतात असे सांगितले होते. अर्थात ते पुस्तक नंतर मला कधीही उपलब्ध झाले नाही. अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु ते मिळाले नाही. कुठेतरी असेलच, अर्थात मी ते पुस्तक शोधायला जास्त झोकून देऊन प्रयत्न केले नाहीत हेही खरेच.

एकंदरच सध्या आपल्याकडे अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी. कष्ट घेण्याची प्रवृत्ती कमी.  ‘सांगे वडिलांची कीर्ती’ यावरच समाधान मानण्याची प्रवृत्ती जास्त…. कष्ट, कष्ट आणि कष्ट; अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. अशा सर्व त्रासदायक गोष्टींच्यामध्ये निरपेक्ष वृत्तीने स्वतःला झोकून घेण्याची प्रवृत्ती जेव्हा असते, त्याच वेळेला संशोधन कार्य उभे राहते.  सध्या तरी आपल्या समाजामध्ये या गोष्टी फारच अभावाने आढळतात. 

… बघू पुढच्या पिढीच्या हातून काही आशादायक घडते का? आता लक्ष फक्त त्या शुक्राच्या चांदणीवर !

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments