सुश्री शांभवी मंगेश जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

पर्यावरणपूरक गणेशोत्सव व सामाजिक जबाबदारी ह्या नूतन संगमातून ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प चिंचवड येथील श्री शंकर महाराज सेवा मंडळ राबवत असून त्यातून मिळणारी आर्थिक मदत वृद्धाश्रमासाठी व विविध सामाजिक कार्यासाठी वापरली जाते.

श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था असून रक्तदान शिबिरांपासून संस्थेची सुरुवात झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम संस्थेद्वारे राबविले जातात व त्यापैकीच एक महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे संस्थेकडून किवळे येथे ‘स्नेहसवली – आपलं घर’ हा निशुल्क वृद्धाश्रम चालविला जातो. आज रोजी संस्था २५ निराधार आजी – आजोबांचा सांभाळ करत असून त्यांचा निवास, भोजन, कपडे, इतर संबंधी गरजा तसेच महत्वाचे म्हणजे आवश्यक मोफत वैद्यकीय सेवेची जबाबदारी संस्था घेत आहे. सांभाळ करत असणाऱ्या वृद्धांचे वयोमानानुसार अंगी लागणारे आजार, वैद्यकीय तपास व गरजेप्रमाणे बायपास सर्जरी, कॅटरॅक्ट ऑपरेशन, हिप रिपलेसमेंट सारखे अवघड व खर्चीक शस्त्रक्रियेची जबाबदारी देखील निशुल्क उचलली जाते. हा सर्व डोलारा चलविण्यासाठी येणारा खर्च हा साधारण दोन लाख रुपये प्रति महिना असून तो उभा करण्यासाठी संस्था अनेक उपक्रम राबवते व त्यातून मिळणारे दान व होणारी आर्थिक मदतीतून वृद्धाश्रमाचा सर्व खर्च भागविला जातो. ह्या मध्ये दैनंदिन स्तरावर  संस्थेकडून रद्दीदान व भंगारदान उपक्रम राबविला जातो ज्याअंतर्गत संस्थेद्वारे घरोघरची रद्दी व भंगार गोळा करून निधी निर्माण केला जातो व ह्याकरिता साधारण सतरा हजार कुटुंब दानस्वरूपी मदत संस्थेला वर्षभर करतात. ह्याबरोबरीने संस्थेकडून अभिनव संकल्पनेने दरवर्षी नियमितपणे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा उपयुक्त प्रकल्प राबविला जातो.

मूर्ती आमची किंमत तुमची’ ह्या प्रकल्पांतर्गत केवळ नैसर्गिक रंगात रंगवलेल्या (हळद, कुंकू, बुक्का व गुलाल हयातून निर्मित) पर्यावरण स्नेही शुद्ध शाडू मातीच्या मूर्तींचे दालन भरवले जाते. अभिनव संकल्पना अशी की ह्या दालनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही केवळ प्रदर्शनाला ठेवली जाते व त्याची कोणतीही विक्री किंमत मांडली जात नाही. उलट येणाऱ्या भक्ताने आपल्या मनाला पसंत पडेल ती मूर्ती निवडायची असते व भक्ताला जी किंमत वाटेल ती गुप्तदान पद्धतीने दानपेटीत टाकून मूर्ती घेऊन जायची एवढी सोपी पद्धत आहे. लोकांना चांगल्या गुणवत्तेच्या मूर्ती उपलब्ध करून देणे, मनुष्याची भाविकता जपणे व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणे हा त्यामागचा उद्देश असून अधिकाधिक लोकांशी संस्थेला जोडता यावे व अधिकाधिक दान पदरात पडावे, जेणेकरून समाजाची अधिकतर सेवा करता यावी हा या उपक्रमामागचा सुप्त हेतू आहे. वेगवेगळ्या आकारातील व विविध प्रकारामध्ये श्रींच्या मूर्ती ह्या दालनात प्रदर्शनाला ठेवल्या जातात. तसेच प्रदर्शन कालावधीमध्ये अखंड नामजप, दत्त याग, गणेश याग, संत पादुका दर्शन, रक्तदान शिबिर,मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पुस्तक प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम संस्थेकडून आयोजित केले जातात. गणेशमूर्तीविषयी प्रत्येकाला एक ओढ असल्यामुळे हा प्रकल्प काय आहे हे समजावून घेण्याच्या मनस्थितीत कोणी नसतो. परंतु पर्यावरण, सेवा, अध्यात्म, धर्म, राष्ट्रप्रेम, माणुसकी, दान, समाज संघटन या अष्टसुत्रीवर हा प्रकल्प आधारित असून हा समाजाने समाजासाठी चालविलेला समाजाचा सामाजिक प्रकल्प आहे. जगात असे कोठेही उदाहरण नाही जेथे एक उत्पादक आपल्या वस्तूंची किंमत ग्राहकाला ठरविण्यास सांगतो आहे. अगदी भाजी, दूध, वर्तमान पत्र या पासून सोनं नाणं, जमीन जुमला या पर्यन्त कोठेही आपल्या मर्जी प्रमाणे पैसे देण्याची किंवा अजिबात पैसे न देता सेवा/वस्तू घेण्याची मुभा नसते पण येथे आपणास ही मुभा आहे कारण नात्यानात्यामधील विश्वास स्थापित करण्यावर संस्थेचा भर आहे. संस्थेचे कार्य सर्वदूर पोहोचावे व लोकांनी ह्या सामाजिक कार्याला हातभार लावावा यासाठी ही प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते. यंदा ह्या प्रकल्पाचे १० वे वर्ष असून सुमारे २२०० मूर्ती दलनामध्ये प्रदर्शनास उपलब्ध आहेत. गेली ९ वर्षे मोजके भाविक परदेशात गणेश मूर्ती घेऊन जातात तसेच भारताच्या जवळजवळ प्रत्येक प्रांतात व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाविक मूर्ती घेऊन गेल्याचा संस्थेचा अनुभव आहे. आगळ्यावेगळ्या ‘ स्नेहसावली – आपलं घर ’ या नि:शुल्क वृध्दाश्रमास भेट द्या व गणेश मूर्ती घेऊनच जा, मूर्ती मिळो, घेवो अथवा न घेवो. प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने तेथे ठेवलेले एक पाकिट घेऊन दानधर्म या स्तुत्य सामाजिक कारणासाठी करावा ही अपेक्षा व आवाहन संस्थेकडून लोकांना केले जाते. यंदा हे प्रदर्शन दि. ०८/०९/२०२३ रोजी सं. ४ पासून मूर्ती संपेपर्यंत चिंचवडे लॉंन्स, हॉटेल रिव्हर व्यू समोर, चिंचवडगाव येथे खुले असणार आहे.

ह्या बरोबरीनेच संस्था गेली 30 वर्षे रक्तदान क्षेत्रात कार्यरत आहे व आजपर्यंत सुमारे १५०० हून अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन सामाजिक बांधिलकी ह्या नात्याने केले आहे. संस्थेद्वारे समाजातील गोर-गरीब, गरजू लोकांना रुग्णसेवा दिली जाते, ज्यात प्रामुख्याने गरजू रुग्णांचे विविध शस्त्रक्रिया करून संबंधित औषधोपचार व उपयुक्त वैद्यकीय वस्तू, जसे वॉकर, व्हील चेअर, डायपर्स, ई. निःशुल्क पुरविले जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत देखील संस्था आजवर करत आली आहे. तसेच कापडी पिशवी चे वितरण व इतर संबंधित पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवण्यात देखील संस्थेचा अधिक जोर आहे. 

संस्था संपर्क –

संस्थेचे संचालक : डॉ. अविनाश वैद्य – ९५७९२२५२९८ / डॉ. मनाली वैद्य – ९४२०८६३९२०

संस्थेचे व्यवस्थापक : सौ. आशाताई पात्रुडकर – ९४०४८३०१६०

माहिती संकलन : सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments