श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ नाचकीन ! एक सहज कानकोरणं ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

इअर बड अस्तित्वात येण्याआधी आणि ते सुधारीत आवृत्तींच्या कानाशी लागण्यापूर्वी नाचकीन किंवा नाचकिंड नावाचं शस्त्र प्रत्येक घरी असायचंच. बाजारात,एस.टी.स्टॅन्ड्सवर,रेल्वे स्टेशन्सवर एका गोल तारेत गुंफून ठेवलेली ‘नाचकिंड’ विकणार-या (बहुदा) महिला दिसायच्या. या बाबीला विविध नावे असतीलच गावां-गावांनुसार हे निश्चित.  

हे स्वस्तातलं आणि बहुपयोगी अवजार म्हणून जनतेत,त्यातल्या त्यात ग्रामीण भागात प्रसिद्ध होतं. यात प्रामुख्याने तीन पाती असायची. एक दांडपट्ट्यासारखं…टोकाला तिरकं…धार आणि एक टोक असणारं. ग्रामीण भागात बाभळी आणि त्यांचे काटे टाळता न येणा-या बाबी असतात. पायांत चामडी जाड वहाणा नसतील, तर कंटक हे समाजाच्या तळपायांत घुसखोरी करायला सदैव वाटेवर पसरलेले असायचेच. त्याकाळी चप्पल म्हणजे चैनीची बाब असायची. नंतर आलेल्या एकोणीस रुपये नव्य्याण्णव पैसे फक्त स्लीपर्सचा काट्यांना धाक नसायचा. मग पायांत काटा घुसणं सहज व्हायचंच. शिवाय हे बेटे काटे बाहेर काढताना त्यांची टोकं टाचेतच रुतून बसून रहायची…एखादी अप्रिय गोष्ट मनात रुतून बसते तशी. मग हा उर्वरीत काटा बाहेर काढण्याची मोठी कसरत करावी लागत असे…त्यासाठी नाचकीन मधलं हे हत्यार उपयोगात यायचं. तळपायातला हा काटा एक्तर दिसणं दुरापास्त असे. अंदाजाने शस्त्र वापरावं लागे. आधी त्या काट्याभोवतीचा मांसल भाग कोरून तिथे जागा करून घ्यावी लागे. काट्याचा किंचित जरी भाग वर दिसू लागला की लगेच नाचकीन मधील चिमटा हाती घेतला जाई. हे ऑपरेशन तसं बराच वेळ चाले. कधी कधी काटा निघाला आहे, असं समाधान वाटे…पण चालायला गेलं तर ‘काही तरी राहून गेल्यासारखं’ फिलींग येत राही…आणि मग ही हत्यारं पुन्हा परजली जात. 

पण यातलं एक अस्त्र मात्र अगदी उपयोगाचं असे…कानकोरणं. दुधारी शस्त्र. उपयोग चुकला की जग आपल्यासाठी मुकं होण्याची शक्यता खूप जास्त. याच्या टोकाला खोलगट वाटीसारखा एक भाग असतो. कानात ही वाटी अलगद सरकवावी लागे आणि अंदाजाने कान ‘कोरला’ जाई. पाषाणातून मूर्ती कोरणा-या कलावंतासारखंच पूर्ण एकरूप होऊन हे काम करावं लागे. यात जवळपास कुणीही असता कामा नये…धक्का लागी बुक्का ! 

कानकोरण्याच्या या वाटीमध्ये जमा होऊन आलेला मळ वाटीतून कोरून काढावा लागे आणि त्याचं नेमकं करायचं काय याचा विचार आधीच न करून ठेवल्यामुळे मग त्याची विल्हेवाट लावणं मुश्किल व्हायचं.

काही लोक या कानकोरण्याला कापसाचा बोळा लावून कानकोरणं कानात घालत. हेच पाहून कंपनी वाल्यांना प्लास्टीकच्या काडीला मेडिकेटेड कापूस बोंड लावून बड (म्हणजे कळी) लावण्याची कल्पना सुचली असावी. पण ही बड नीट नाही वापरली तर इतरांची बडबड ऐकू येण्याचा प्रसंगही उदभवत येऊ शकतो. कानकोरण्याची एकच बाजू वापरता येते…बड मात्र दोन्ही बाजूंनी कान टवकारून उभी. मात्र या कळीवरचा मळ काढून टाकण्याची सोय मुद्दामच केली नसावी. वापरून झालं की सरळ फेकून द्यायचं. नाचकिन मात्र वापरलं आणि ठेवून दिलं की पुरे. मात्र ही वस्तू शेजारी पाजारी हक्काने मागून घ्यायची वस्तू म्हणून घेऊन जात आणि मागितल्याशिवाय परत करण्याची परंपरा नसते! कुणी मागितलीच तर उद्या आमचं आमचं  विकत घेऊन येऊ…त्यात काय एवढं, असं ऐकून कानातला मळ आणखीन घट्ट होत असे. असो. 

नाचकिन फेकून देण्याची गरज नसे…पण जॉन नावाच्या कुणा इसमाच्या मुलाने तयार करून दिलेले हे काडीपैलवान फेकून दिल्याशिवाय पर्याय नसतो. समुद्रात जो कचरा बाहेर काढला जातो..त्यात सर्वांत जास्त कचरा ह्या कापूसधारी काड्यांचा असतो युरोपात…असं म्हणतात.

कान कोरताना एक अनुभव निश्चित येतो…तो म्हणजे खोकला ! काय असेल ते असो…मात्र मानेवरील जे अवयव असतात ते एकमेकांशी अत्यंत जवळचे संबंध ठेवून असतात. कानांच्या आत कुणी खाजवलं की घशाला त्याची संवेदना जाणवते आणि मग थोडं थांबून कान कोरण्याचा खो खो पुन्हा खेळायला सुरूवात करावी लागते. कान कोरताना जास्त जोर लागला की तिथली खेळपट्टी खरवडून निघते आणि मग शब्दांचे चेंडू स्पिन व्हायला लागतात या खेळपट्टीवर पडलेले. म्हणून खूप हळूवार फलंदाजी करावी लागते…राहूल द्र्विड सारखी. पण आधुनिक वैद्यकशास्त्र हा द्राविडी प्राणयाम करू नका असं सुचवते…अगदी बरोबर! पण बडने कान कोरण्यात तसे कमी थ्रील असते म्हणून बरेच दिवस ऐकतच नव्हते डॉक्टरांचे. आणि शिवाय या बडचा कापूस कानातच राहून गेल्याच्या केसेस सापडतात खूप…म्हणून लोकांना कान कोरणं बरं वाटायचं. कान कोरणं ते शेवटी कान कोरणं. कोणतीही किल्ली चालते लोकांना कानात घालायला. काही बहाद्दर तर काडेपेटीतली गुलाची काडीही आत घालायला कमी करीत नाही. कानात मळाचा खडा झालेला असेल आणि त्या खड्यावर हा गुल घासला गेला तर केवढा जाळ निघेल ना? आणि नंतर घरचे कानाखाली काढतील तो जाळ असेल तो वेगळाच. 

(हाताच्या) बोटांचा वापर कानात घालण्यासाठीही होतो. फक्त अंगठा,मधले बोट याला अपवाद. करंगळीला प्राधान्य कारण ती बिचारी काहीशी सडपातळ असते बहुतेकांची. पण बोटांनी कानात गेलेलं आणि तिथंच रेंगाळत राहणारं पाणी बाहेर निघू शकतो…पण त्यासाठी कानाची फार कानधरणी करावी लागते. हे पाहणं मात्र नयनरम्य असते….ज्या वेगाने बोटाची हालचाल करावी लागते, मान एका बाजूला खाली घालावी लागते…सर्वच प्रेक्षणीय! पण ते पाणी बाहेर पडताना कानांना मिळणारं सुख दैवी. हल्ली यासाठी अनेक स्वयंचलित यंत्रे मिळतात म्हणे. पण अजून या गोष्टी ब-याच लोकांच्या कानावर आलेल्या दिसत नाहीत. 

हलक्या कानाचे लोक या इशा-याकडे डोळेझाक (की कान झाक?) करू शकतील…पण कानातील मळ हा जबरदस्तीने काढण्याचा पदार्थ नव्हे…तो आपल्या मनाने हळूहळू बाहेर येतोच. तो गोडीगुलाबीने काढून घ्यायचा पदार्थ आहे…एखाद्याकडून आपण त्याची सिक्रेटस काढून घेतो तशी. तशीही मळ ही ‘सीक्रीट’ होणारी गोष्ट आहे..म्हणजे स्रवणारी! .कानांना निसर्गाने दिलेलं संरक्षण आहे मळ म्हणजे! (यह) मैल अच्छा होता है! आपल्याकडे कानांत तूप किंवा तेल त्यात लसणाची एखादी पाकळी घालून,थोडंसं गरम करून आणि थंड करून,कापसाच्या बोळ्यानं घालण्याची पद्धत आहे. त्यानं नेमकं काय होतं हे डॉक्टरांना विचारायला पाहिजे….पण फारसं नुकसान झाल्याचं कानावर नाही आलेलं अजून. काही लोक आपल्या हाताच्या बोटांची नखे कानात घालतात…खूप वाईट्ट आहे हे…पण त्याने बरे वाटत असेल तर आपण कशाल कुणाचे कान भरा? भिंतीला असलेलं कान कशाने बरं कोरत असतील असाही प्रश्नच आहे. या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही असं कसं बरं शक्य आहे. पण निसर्गाने दोन्ही कानांचा एकमेकांशी काहीहे संबंध ठेवला नाही ते एक बरे आहे. एक खराब झाला तरी दुसरा सगळ्यांचं ऐकून घ्यायला तयार. दोन कान शेजारी पण भेट नाही संसारी हेही खरेच. 

कानकोरणं आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एखादं घरात किल्यांच्या जुडग्यात असेल तर काढून हुकला अडकवून ठेवा….पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी. फक्त ते कानांत घालायचं नाही (आणि इतरही काही…पेंसिल,पेन इत्यादी) एवढी गोष्ट मात्र या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ नका !

सहज वाटलं म्हणून तुमच्या कानावर घातले झालं ! वाटल्यास कर्णोपकर्णी होऊन जाऊ द्या ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments