श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

गोष्ट माणुसकीची… ☆ श्री सुनील देशपांडे

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट.

माणुसकी नावाचा एक माणूस, खरोखरी माणूस असणारा माणूस राहत होता. त्याची पत्नी नीती. 

दोघांचा संसार अत्यंत सुखाचा आणि चांगला चालला होता. त्यानंतर त्यांना मुले झाली प्रत्येक मुलाचे नाव त्यांनी धर्म असे ठेवले.  फक्त ओळखू यावा म्हणून त्याला धर्म एक, धर्म दोन, धर्म तीन … अशा क्रमाने नावे दिली.  हे धर्म काही दिवसांनी आपापली वेगवेगळी घरे बांधून आपापल्या घरात राहू लागली.  त्यानंतर त्यांची ही कालांतराने लग्ने झाली.  त्यांनाही ज्या पत्नी मिळाल्या त्यांचीही नावे श्रद्धा१, श्रद्धा२,. … अशी होती. हे वेगवेगळे धर्म आपापल्या घरामध्ये थोड्याफार कुरबुरी असल्या तरी बऱ्यापैकी सुखाने नांदत होते. परंतु काही काळानंतर त्यांना त्यांनाही मुले झाली आणि ती मुले धर्मपंथ एक, धर्मपंथ दोन, धर्मपंथ तीन … अशा नावाने संबोधले जाऊ लागले. कालांतराने त्यांची लग्ने झाली आणि त्यांना मिळालेल्या पत्नींची नावे अशीच अंधश्रद्धा एक, अंधश्रद्धा दोन, अंधश्रद्धा तीन, … अशी झाली.

अशी प्रत्येक धर्माची वंशावळ वाढू लागली आणि पंथ व अंधश्रद्धा यांची मुले पुन्हा वेगळ्या पद्धतीने विभागून एकमेकात भांडू लागली एकमेकांमध्ये भांडत असताना एकमेकांचे जीव घ्यायलाही कमी करत नव्हती.  भांडता भांडता एकमेकां पासून मनाने दूर दूर जाऊ लागली.  धर्म दोन आणि धर्म तीन …..  मध्ये सुद्धा अनुक्रमे असेच होऊ लागले.  मग कुठल्यातरी धर्मपंथाचा  कुठल्यातरी दुसर्‍या धर्मपंथाच्या वंशजाला म्हणू लागला तू माझ्याकडे ये.  महत्वाचे म्हणजे आपल्या पंथाचे वर्चस्व वाढवण्यासाठी त्याला आपले समर्थक वाढवायचे होते.  त्यामुळे प्रत्येक पंथाचे वंशज वेगवेगळ्या धर्माच्या वंशजांकडे वळून त्या धर्माच्या वंशजांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू लागले.  हे पाहिल्यानंतर काही जण तात्पुरते आपापल्या पंथातल्या मारामाऱ्या थांबवून दुसऱ्या धर्मांच्या बाबत आक्रमक बनू लागले.  अशा तऱ्हेने या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून सगळीकडे मारामाऱ्या आणि हिंसाचाराचा उद्रेक झाला.  प्रत्येक पंथाचा व त्या पंथातील प्रत्येकाचा स्वार्थ आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्याची स्पर्धा यामुळे हे  धर्मातले म्हणा किंवा पंथातले म्हणा किंवा त्यांच्या वंशजातले म्हणा आक्रमक होऊन भांडू लागले.  याचे स्वरुप इतके क्लिष्ट होत गेले की नक्की कोण कोणाला मारतो आहे कोण कुणाचा खून करतो आहे काहीच समजेनासे झाले.  

माणुसकी आणि नीती दोघेही बिचारे प्रचंड म्हातारे झाले होते त्यांना हे सगळे आवरता येणे शक्य होईना त्यांनी ठरवले की हा सर्व विनाश आपल्या डोळ्यांनी बघण्यापेक्षा आत्महत्या  करणे चांगले परंतु माणुसकी आणि नीती या दोन गोष्टींमुळे आत्महत्या करण्यासाठी त्यांचे मन धजेना.  

कालांतराने  त्यांच्या वंशजातील काही लोकांनी या आपल्या सर्व भांडणाचे  मूळ कारण आपला मूळ पुरुष आहे असा निष्कर्ष काढून त्यांच्यावरच ते चाल करून गेले. माणुसकी आणि नीतीचा खून करू लागले. 

परंतु दुर्दैवाने त्या दोघांनाही इच्छामरणाचा शाप असल्यामुळे त्यांना मरणही येईना आणि जखमा आणि वेदनांमुळे त्यांना जगता ही येईना.  अशीही दुर्दैवी कहाणी माणूसकी आणि नीती यांची केव्हा व कशी संपेल कोण जाणे ?

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments