सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆एकमेव वामन मंदिर !!!… लेखक : साकेत नितीन देव ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
श्री विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार हा ‘वामन’ अवतार मानला जातो. हातात कमंडलू , डोक्यावर छत्र अणि एक पाय बळीराजाच्या माथ्यावर ठेवलेल्या वामनांचे चित्र अनेकदा बघितलेलं, मात्र वामनांची मूर्ती कुठेच दिसली नाही. ती इच्छा आपल्याच पुण्यात पूर्ण झाली.
पुराणांतील एका कथेनुसार, असुरांचे गुरू ‘शुक्राचार्य’ यांनी संजीवनी विद्या अवगत केली. त्याच्यामुळे मेलेले असुर पुन्हा जिवंत होऊ लागले. शुक्राचार्य हे असुरांचा राजा ‘बळीराजा’ साठी एक मोठा यज्ञ करतात. असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते अणि ते इंद्रावर हल्ला करण्याची तयारी करतात. जर बळीराजाचे शंभर यज्ञ पूर्ण झाले, तर त्याला इंद्रपद मिळेल या भीतीने इंद्रदेव श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.
महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. त्या बाळाचे नामकरण ‘वामन’ असे करण्यात येते. ऋषिमुनींकडून मृगचर्म, पलाश दंड, वस्त्र, छत्र, खडावा, कमंडळु वस्तू मिळाल्यावर वामन यज्ञास्थळी पोहोचतात. बटू रूपातील श्री वामन बळीराजाकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात अणि भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात, बळीराजा वचन देतात.
वामन विशाल रूप घेतात अणि एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा पाय स्वर्गात ठेवुन दोन पावले घेतात. आणि मग बळीराजाला विचारतात “आता तिसरे पाऊल कुठे ठेवु?” आपला पराभव मान्य करत, पण दिलेले वचन पाळत शेवटी बळीराजा वामनासमोर नतमस्तक होतात व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतात. वामन तसेच करतात अणि बळीराजाला पाताळात ढकलतात. (ज्या दिवशी हे घडले तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा !). पुढे वामन पृथ्वी मानवांना अणि स्वर्ग देवांना देऊन टाकतो.
तर, अशा या वामनांचे एक मंदिर आपल्या पुण्यात आहे. डावा हात हृदयाशी, उजवा हात मोकळा सोडलेला, गळ्यात माळ, अंगात जानवे अणि चेहर्यावर प्रसन्न भाव अशी वामनांची मूर्ती आहे. विशेष म्हणजे शेजारी वामनांची आई ‘अदिती ‘ उभी आहे. माता अदितीच्या डाव्या हातात कमलपुष्प तर उजवा हात वामनांच्या खांद्यावर अभय मुद्रेत आहे. या दोन्ही मूर्तींना प्रभावळ असून, हे संपूर्ण शिल्प संगमरवरी दगडात घडवलेले आहे.
अशा प्रकारचे हे कदाचित भारतातील एकमेव मंदिर असावे. सदर मंदिर शुक्रवार पेठेत, राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या शेजारी आहे. पूर्वी मंदिराला सभामंडप व गाभारा होता. तिथे असलेल्या ‘धर्म चैतन्य’ संस्थेत वासुदेवशास्त्री कोल्हटकर यांचे कीर्तन होत असे. एक शाळा ही भारत असत. आज ‘आल्हाद’ नवाच्या इमारतीच्या तळघरात हे मंदिर आहे. मंदिर खाजगी असून श्री कोल्हटकर त्याची व्यवस्था बघतात.
लेखक : साकेत नितीन देव
(वामन जयंती, शके १९४५)
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈