☆ इंद्रधनुष्य : अनुवादित साहित्य…एक देणगी…. ☆ सुश्री मंजुषा मुळे ☆
केव्हाही थोडा निवांत वेळ मिळाला की पुस्तकांच्या दुकानात फेरफटका मारणे या माझ्या छंदाचे आता जणू व्यसनच झालंय, जे मला फार उपयोगी पडते आहे. त्यामुळेच आज एक गोष्ट मला आवर्जून तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते आहे.
पुस्तकांच्या कुठल्याही समृद्ध दुकानात गेलं की अनेक लेखकांची वेगवेगळ्या विषयांवरची असंख्य पुस्तकं तर तिथे असतातच. पण त्यांच्या जोडीने कितीतरी अनुवादित पुस्तकेही तिथे उपलब्ध असतात. पण अनेकदा माझ्या असे लक्षात आले आहे की अनुवादित पुस्तके अगदी आवर्जून, जाणीवपूर्वक दाखवली जात नाहीत. त्यामुळे मग वाचकांनीच आपणहून अशा पुस्तकांची मागणी करावी असे मला मनापासून सांगावेसे वाटते.
याचे कारण असे की मी अशी बरीच पुस्तके वाचते. काही इंग्रजी पुस्तकांचा मी मराठीत अनुवादही केला आहे. आणि ती वाचतांना, त्याहीपेक्षा त्यांचा अनुवाद करतांना एक गोष्ट मला नेहमीच प्रकर्षाने जाणवतआलेली आहे की, भाषा कुठलीही असली तरी त्यातून व्यक्त केल्या जाणाऱ्या भावनांची आणि विचारांची समृद्धता व ताकद, आपल्या मातृभाषेइतकीच प्रभावी असते.
मानवी भावना आणि विचार व्यक्त करण्याचे सर्वात जास्त परिणामकारक माध्यम म्हणजे भाषा. म्हणूनच आपल्या भाषे – व्यतिरिक्त, इतर भाषांमधून प्रकट होणारे विचारधनही आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी त्याचा आपल्या भाषेत अनुवाद करण्याचा विचार ज्यांनी सर्वप्रथम केला असेल त्यांचे खूप आभार मानायला हवेत.
असे अनुवादित साहित्य वाचण्याचा एक मोठा फायदा हा असतो की, त्यामुळे आपले स्वतःचे विचार आणि विचार करण्याची क्षमता आणि पद्धतही समृद्ध होऊ शकते, सकारात्मकपणे बदलू शकते. याचे कारण असे की, विचार कुठल्याही भाषेत मांडले असले तरी, एकाच गोष्टीबद्दलचा वेगवेगळ्या लेखकांचा विचार वेगवेगळा असू शकतो. आणि कोणाच्याही विचारांवर त्याच्या संस्कृतीचा, भोवतालच्या परिस्थितीचा, जगण्याच्या पद्धतीचा, आयुष्याकडे बघण्या -च्या दृष्टिकोनाचा नक्कीच परिणाम होत असतो, यात दुमत नसावे. त्यामुळेच वेगवेगळ्या भाषा असणाऱ्या वेगवेगळ्या देशातले, प्रांतातले साहित्यही खचितच वेगवेगळे असते. विचारांचे वैविध्य असलेल्या अशा अनेक भाषांमधल्या प्रचंड साहित्याचा रसास्वाद घेणे साध्य व्हावे यासाठी अनुवाद हा एकमेव सर्वोत्तम मार्ग आहे. आणि साहित्यसंपदेत मोलाची भर घालणारी ती एक देणगीही आहे.
आपल्याच देशातल्या प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती, आचारधर्म एकमेका – पेक्षा वेगळे आहेत,आणि त्या प्रत्येक भाषेमधील साहित्यात तिथल्या संस्कृतीचे आणि विचारधारेचे प्रतिबिंब पडलेले आहेच. फक्त मराठी भाषकांच्यापुरते सांगायचे तर त्या साहित्याचा मराठीत अनुवाद केला गेला तरच ही विविधता आपल्याला खात्रीने समजते. आत्तापर्यंत असे इतर भाषांमधील कितीतरी साहित्य मराठीत अनुवादित केले गेलेले आहे.
याचे सर्वात मोठे उदाहरण देता येईल ते श्री ज्ञानेश्वरी “चे संस्कृत भाषेतला अतिशय प्राचीन ग्रंथराज म्हणजे श्रीमद् भगवद्गीता. मानवी आयुष्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा हा महान ग्रंथ. पुढे कित्येक वर्षांनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी या ग्रंथाचा तत्कालीन प्राकृत मराठी भाषेत मुक्त अनुवाद केला आणि गीतेतल्या सातशे श्र्लोकांच्या जागी नऊ हजार ओव्या रचल्या. अर्थात याला रूढार्थाने केवळ अनुवाद केला असे म्हणणे वावगे आहे. कारण त्यात दिसून येणारी ज्ञानदेवांची अफाट बुद्धिमत्ता, विचारांची खोली आणि उंची, भाषेचे सौंदर्य, अतिशय चपखल दाखले,आणि ओघवती भाषा, ही सगळी उत्तम वैशिष्ठ्ये पाहता, ज्ञानेश्वरी हा एक स्वतंत्र आणि परिपूर्ण असा समृद्ध ग्रंथ उचीतपणे मानला जातो.
अलीकडच्या काळातली उदाहरणे द्यायची तर .. पूज्य श्री. रवींद्रनाथ टागोर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मा. शिवराम कारंथ,कन्नड साहित्यिक श्री. भैरप्पा, गुजरातीतले श्री. चूनिल… मला वाटते अनुवादित साहित्याबद्दल आणखी कितीतरी सांगण्यासारखे असले तरी, वाचनाची आवड आणि त्यातून चतुरस्त्र ज्ञान मिळवण्याच्या इच्छेपोटी वेगवेगळी पुस्तके वाचणाऱ्या वाचकांनी आवर्जून अनुवादित पुस्तके वाचण्यासाठी उद्युक्त व्हावे. इतर अनेक भाषांमधील साहित्य, जे अनुवादाच्या माध्यमातून जणू नव्याने निर्मिले जात असते, ते जातीच्या वाचकांनी जाणीवपूर्वक वाचावे एवढेच मी शेवटी आग्रहाने सांगेन. मग जुन्या जाणत्या विचारवंतांनी ,” अनुवाद म्हणजे अनुसृजन किंवा अनुनिर्मिती ” ही जी व्याख्या केलेली आहे, ती खरोखरच अतिशय सार्थ आहे, हे त्यांना मनोमन पटल्याशिवाय राहणार नाही.
© सुश्री मंजुषा मुळे
मो ९८२२८४६७६२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈