श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सहावी माळ) – मुक्ता ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
धृतराष्ट्र आंधळा म्हणून गांधारीने उसनं आणि राजस अंधत्व मिरवलं, तसं मुक्ताबाईंना करून चालणार नव्हतं. लेकीने बापाच्या घरी रहायचं नसतं, ती परक्याची अमानत असते हे तिने लहानपणापासून ऐकलं होतंच. त्यामुळे तिच्या बालमैत्रिणींसारखं तिचंही लग्न ठरलं तेव्हा तिला वेगळं असं काही वाटलं नाही. मात्र लग्नात घरात खूप आनंदी वातावरण असतं याचा अनुभव तिने मोठया बहिणींच्या लग्नात घेतला होताच. त्या बहिणी माहेरी आल्यावर तिकडचं जे वर्णन करायच्या ते मुक्ताबाईच्याही कानांवर यायचंच. माहेरवाशिणी आणि आईचा संवाद म्हणजे ओल्या काळजांचं एकमेकांना दिलेलं मऊ आलिंगनच असतं जणू. सासरच्या गोष्टींचा भला मोठा भारा बांधून आणलेला असतो लेकीने, त्यातील एक एक काडी ती उलगडत राहते अगदी मध्यरात्रीपर्यंत. उबदार गोधडीत आईच्या मऊ हातांवर डोकं ठेऊन तिच्याशी हितगुज करण्यातलं सुख इतर कुणाच्याही वाट्याला येणार नाही. या संभाषणात आईला तिचं स्वत:चं माहेर आठवत असतं. ती वरवर हं हं म्हणत असते आणि लेकीच्या कपाळावरून उजवा फिरवत फिरवत तिला थोपटत असते, तिला एखादा कानमंत्रही देत असते आणि जिवलग मैत्रीण असल्यागत मधूनच फिदीफिदी हसतही असते. मुक्ता पलीकडच्या गोधडीत शिरलेली असली तरी तिचे कान जागे असायचे.
मुक्ताला लग्नात नवरा मुलगा तसा स्पष्ट दिसलाच नव्हता. मुक्ता ठेंगणीशी आणि तो तिच्यापेक्षा जवळजवळ दुपटीने उंच. भटजींनी अंतरपाट दूर केल्यावर तर लज्जेने त्याच्याकडे पाहणे झालेच नाही. हार घालतानाही थोडी नजर वर केली पण जुन्या जमान्यातल्या कागदी झिरमुळ्यांचं बाशिंग…नवरदेवाचं कपाळ मात्र उठून दिसलं. आणि तासाभरात व-हाडाच्या बैलगाड्या घुंगरं वाजवीत निघाल्या.
मुक्ता एकूणात तिसरी मुलगी. आधीच्याच लग्नातली आचा-याची, मांडववाल्याची देणी अजून बाकी होती. त्यातच नात्यातल्या एकाने मुक्तासाठी त्याच्या दूरच्या नात्यातलं एक स्थळ सुचवलं. नवरदेवाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय, वर्षात लग्न नाही केलं तर पुढे आणखी तीन वर्षे थांबावं लागेल, म्हणून त्यांना घाई आहे. खातंपितं शेतक-याचं घर आहे, मोठं खटलं आहे. मुक्ता संपादून जाईल त्या घरात. सांगणा-याने काही तपशील वगळून तर काही पदरचा घालून त्या स्थळाचं वर्णन केलं. आणि मुक्ताच्या वडिलांनी या स्थळामध्ये डोकं देण्याचं मनावर घेतलं. आणखी एक वावर विकलं तरी फारसं बिघडणार नव्हतं. कारण एकच लेक होता. मुक्ताच्या पाठीवर असलेल्या मुलाच्या लग्नात नाहीतरी सर्व वसुली करण्याची संधी मिळणार होतीच.
सकाळी सुपारी खेळण्याच्या वेळी मुक्ताने नव-याकडे पाहिलं आणि ती पहातच राहिली. नवरा मुलगा मात्र तिच्याकडे डोळे बारीक करून पहात हसतोय असं तिला वाटलं. तेवढ्यात मुक्ताला समोरच्या हळदी-कुंकवाच्या पाण्याने भरलेल्या ताटात अंगठी हाताला लागली. हा खेळ मुक्ता जिंकली होती….पण जिंकण्याचा आनंद तिला तसा झालाच नाही. महिपती नाव होतं नव-याचं. मैत्रिणींनी सांगून ठेवलेल्या उखाण्यांपैकी मुक्ताला एकही उखाणा आठवला नाही .. किंवा तिला आठवायचा नव्हता ! तिने कसाबसा एक साधा उखाणा घेतला. पण या उखाण्यात महिपतीरावांच्या नावाआधी आईवडिलांचा मान राखण्यासाठी मी हा विवाह केला आहे,असा आशय व्यक्त करायला ती विसरली नाही… ‘ चांदीच्या ताटात मोहरा आणि माणिक मोती…माहेरची लाज सारी लेकीच्या हाती…महिपतराव माझे शंकर आणि मी त्यांची पार्वती ! ‘
दुस-या दिवशी नव-यामुलीची पहिल्यांदा माहेरी पाठवणी झाली. रात्री आईच्या गोधडीत शिरलेल्या मुक्ताला तिला काहीही सांगावंसं वाटलं नाही. गोधडीतला अंधार तिला जास्त जवळचा वाटू लागला होता. दोन दिवसांनी मुक्ताला सासरी पाठवताना वडिलांनी मुक्ताला घट्ट जवळ घेतलं…पोरी महिपतराव डोळ्यांनी अधू आहेत…आंधळे नाहीत. देवभोळा साधा माणूस आहे. तू त्याचे डोळे हो ! मुक्ता बैलगाडीत बसली तेव्हा वडील हात हलवत होते.. पण त्यांचे पाण्याने भरलेले डोळे खाली पहात होते.
संसार सुरू झाला. पहिला मुलगा होईपर्यंत मुक्ताबाई आणि महिपतीरावांचा उघड संवाद झालाच नाही…त्याकाळी असं होणं अगदी सर्वमान्य होतं. जाऊबाईंना आपल्या अशा दीराला इतकी नीटस बायको मिळाली याचा आनंद कमी आणि हेवा अधिक वाटत होता. महिपतराव नजर अधू असूनही वाचणारे होते. कागदाला जवळजवळ पापण्यांचा स्पर्श होईल इतक्या जवळ त्यांना कागद धरावा लागायचा. पण वाचनाचा कंटाळा अजिबात नव्हता. मुक्ताबाईंनी माहेरी अभ्यासाचा कंटाळाच केला होता तसा. इथं महिपतराव मुक्ताबाईंची शाळा झाले.
महिपतरावांकडे शेतीतल्या काबाडकष्टांचा जणू मक्ताच दिला होता थोरल्याने. याचं काही लग्नं होणार नाही, त्यामुळे आपल्या मुलाला आपल्या माघारी मिळणार असलेल्या जमिनीत कुणी वाटेकरी नसणार हे तो गृहीत धरून चालला होता. सारा रोखीचा व्यवहार त्याच्याकडेच आणि घरातल्या किल्ल्यांचा जुडगा त्याच्या बायकोकडे.
मुक्ताबाई पुढे पुढे धीट झाल्या. व्यवहारात लक्ष घालू लागल्या. नवरा बैलगाडी घेऊन निघाला की कासरा आपल्या हाती धरू लागल्या…बैलगाडी गाववाल्यांच्या नजरेच्या टप्प्यापलीकडे गेल्यावर. महिपतरावांची नजर हळूहळू धूसर होत जाणार होती. दैवाने त्यांच्यासाठी मुक्ताबाईंचे दोन सुंदर, टपोरे डोळे पाठवून दिले होते. आणि आता तर हे डोळे अक्षरं वाचू लागले होते.
नावाचा महिमा असेल कदाचित, पण महिपतरावांच्या तशा तापट स्वभावावर त्यांनी प्रेमाने फुंकर घातली होती. आंधळा म्हणून हिणवणारा गाव, व्यवहारात फसवणारा थोरला भाऊ, यांच्याबद्द्ल असणारी नाराजी महिपतरावांच्या शब्दांतून आणि कधी कधी कृतीतूनही व्यक्त होई. पण मुक्ताबाईंनी त्या क्रोधाला संयमाची झालर लावून टाकली.
बापजाद्यांपासून चालत आलेल्या जमिनीच्या वादाच्या न्यायालयीन खटल्यांना कित्येक वर्षे लोटून गेली होती. निकाल काही लागत नव्हता. थोरले भाऊजी या बाबतीत तसे उदासीन होते. मुक्ताबाईंनी स्वयंपाकघरातून हळूहळू ओसरीवर प्रवेश मिळवला. कधी घरी सल्लामसलतीसाठी येणा-या वकिलांशी बोलण्याचं, त्यांना काही विचारण्याचं धाडस मिळवलं.
खटल्यातून यशस्वी माघार घेणं फायद्याचं आहे, असं सर्वांना पटवून दिलं. आणि वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या खटल्यातून सर्वांचीच सुटका केली. वाद तर चुलत घराशीच होता. ती मंडळीही मुक्ताची चाहती झाली. एकादशी, भजन करणारी, पहाटे उठून सडा रांगोळी घालणारी, तुळशीला पाणी घालणारी, जात्यावर दळण दळताना जनाबाई होणारी मुक्ता महिपतरावांच्या घराची लक्ष्मी झाली होती. मुक्ताबाईंना दोन मुलगे झाले. मुलगी हवी होती पण नाही पडली पदरात. मुलांची शिक्षणं व्यवस्थित होतील याकडे त्यांचं लक्ष असायचंच. थोरला शहरात नोकरीस लागला आणि धाकट्याने शेतीत लक्ष घातले. आता पैशांची कमतरता नव्हती. म्हणून गरजू आणि मुक्ताबाईंचं घर अशी जोडी ठरून गेली.
महिपतरावांची आई आणि मुक्ता जणू मैत्रिणीच बनल्या होत्या. म्हातारीची खूप सेवा केली मुक्ताबाईंनी. ‘माझ्या आंधळ्या लेकाचा संसार तुच कडेपतोर नेशील गं माझे बाये !’ असं म्हणून म्हातारी मुक्ताच्या गालांवरून हात फिरवायची आणि तिच्या स्वत:च्या डोक्याच्या उजव्या बाजूवर बोटं ठेवून कडाकडा मोडायची….हा आवाज मुक्ताला टाळ्यांच्या कडकडकटासारखा भासायचा. मुक्ताबाई माहेर तसं विसरूनच गेली होती.
महिपतरावांची दृष्टी आता जवळजवळ गेल्यातच जमा होती. अगदीच प्रयत्नांती त्यांना थोडंफार दिसायचं. पण बाकी सर्व व्यवहार अंदाजेच. माळकरी असले तरी महिपतरावांना पंढरी काही घडली नव्हती. गावात होणाऱ्या कीर्तनांना, काकड्याला मात्र ते नियमित हजेरी लावत. अनेक अभंग त्यांना मुखोदगत होते. मुक्ताबाईंनाही त्यांनी विठूचा छंद लावला. सूरदास, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांची चरित्रे मुक्ताबाईंना खूप जवळची वाटली.
एके दिवशी पंढरीला जायचा हट्टच धरला मुक्ताबाईंनी महिपतरावांपाशी, आणि त्यांनी मुलांना सांगून तशी व्यवस्थाही करवून घेतली. देवापुढे उभी राहिली ही जोडी तेव्हा तेथील रखवालदारांनीही घाई केली नाही..मुक्ताई महिपतरावांना आपल्या डोळ्यांनी देव दाखवत राहिल्या…देवाचिये द्वारी क्षणभर उभं राहून. चारी मुक्ती त्या साधू शकणार नव्हत्या…पण पदरी पडलेलं त्यांनी पवित्र मात्र करून घेतलं होतं.
आज महिपतराव आणि मुक्ताबाई हयात नाहीत. पण प्राप्त परिस्थितीमध्ये जीवनाला सामोरे जाण्याची जिद्द दाखवणाऱ्या मुक्ताबाई स्त्रीशक्तीचं प्रतीकच बनून राहिल्या .. किमान त्या गावात तरी. नवरात्रात अशा द्विभुज देवींची आठवण येते, यात नवल नाही.
परिस्थितीमुळे, गरीबीमुळे, परंपरांमुळे असे संसार स्वीकारावे लागणाऱ्या अनेक मुक्ताबाई आधीच्या पिढीने अनुभवल्या आहेत. त्या लढाऊ दुर्गांना या सहाव्या माळेच्या निमित्ताने नमस्कार.
(लेखातील नावे काल्पनिक आहेत. आयुष्य मात्र खरे.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈