श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दहावी माळ) – न केलेले ‘सीमोल्लंघन‘… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
“ राजा बोले अन दल हाले “ ही पहिल्यापासूनची रीतच म्हणायची. मानवी वर्चस्ववादाच्या संघर्षात एकमेकांचा नाश करणे अपरिहार्य झाले, तसे प्रत्येक समुदायाने स्वत:ची सैन्यदले उभारली. राजाने निश्चित केलेल्या शत्रूचा समाचार घेण्यासाठी त्याचा जीव घेणे आणि या प्रयत्नात स्वत:चा जीव देण्याची तयारी
ठेवणे , हा रणबहाद्दरांचा स्थायीभाव बनून गेला.
असंख्य राजे-रजवाड्यांचा आणि त्यांनी वेळोवेळी केलेल्या युद्धांचा देश.. ते आताचा स्वतंत्र, सार्वभौम लोकशाही गणराज्य असलेला देश .. म्हणून आपल्या भारत देशाची जगाला ओळख आहे.
स्वत:हून आक्रमण करायचं नाही असं तत्व उराशी बाळगून असलेला आणि ते तत्त्व हरत-हेची किंमत मोजून पालन करणारा देश म्हणून भारत उभ्या जगाला माहित आहे आणि आदर्शवतही आहे.
सैन्य पोटावर चालत असले तरी या चालणाऱ्या सैन्याला अतिशय सक्षम नेतृत्वाची अनिवार्य गरज असते. भारताच्या सुदैवाने सुमारे पंचेचाळीस वर्षांची दैदिप्यमान कारकीर्द गाजवणारा एक रणधुरंधर सेनापती स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात निर्माण झाला….. गुजरात प्रांतातील वलसाड येथे वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले Hormizd Manekshaw हे आपली गरोदर असलेली पत्नी Hilla, née Mehta.. हीला मेहता यांना घेऊन त्यावेळच्या लाहौर येथे निघाले होते. तेथे वैद्यकीय व्यवसाय थाटावा असा त्यांचा मनसुबा होता. रेल्वेप्रवासात प्रकृती बिघडल्यामुळे हीला यांना पुढे प्रवास करणे अशक्य झाल्याने हे दाम्पत्य अमृतसर स्टेशनवरच उतरले. तेथील स्टेशनमास्टरच्या सल्ल्यानुसार हीला यांना हर्मिझ यांनी स्थानिक रूग्णालयात दाखल केले. तेथे त्या अगदी बऱ्या झाल्या. अगदी थोड्या दिवसांच्या वास्तव्यात ह्या माणेकशा दाम्पत्याला अमृतसर शहर खूप भावले आणि त्यांनी तेथेच कायम वास्तव्य करण्याचे ठरवले. डॉक्टरसाहेबांनी थोड्याच कालावधीत या नव्या शहरात वैद्यकीय व्यवसायात आपला जम बसवला.
एका दशकाच्या अवधीत या पती-पत्नींनी सात अपत्यांना जन्म दिला. सॅम हे एकूणातले पाचवे अपत्य. दोघे भाऊ इंजिनियर व्हायला परदेशात गेले. साहेबांना डॉक्टर व्हायचं होतं, पण वडिलांनी ‘ हा खर्च झेपण्यासारखा नाही ‘ असं बजावलं. मग साहेब काहीसा बंडात्मक पवित्रा अनुसरून थेट सैन्यात भरती झाले. पाठचा भाऊ जॅम डॉक्टर बनून त्यावेळच्या हवाई दलात रुजू झाला. सॅम साहेब मात्र त्यावेळच्या ब्रिटिश सेनेत स्थिरावले. हिंदी, इंग्लिश, गुजराती, पंजाबी, उर्दू भाषांवर उत्तम पकड असल्याने त्यांना
‘हायर स्टॅन्डर्ड आर्मी इंटरप्रीटर ‘ म्हणून जबाबदारी मिळाली होती. अत्यंत निर्भीड असलेल्या सॅम साहेबांनी त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिलेल्या पंजाबी सैनिकालाच आपल्या तंबूबाहेर रात्री पहाऱ्यावर नेमून इतर सैनिकांच्या मनात आदर निर्माण केला होता. सैनिकांची ते अत्यंत आस्थेने काळजी घेत.
जपान्यांशी लढताना एका मोहिमेत त्यांनी शौर्य गाजवले. मोहिम यशस्वी झाली खरी, पण मोहिम संपता संपता त्यांच्या पोटात सात गोळ्या लागून मूत्रपिंड,यकृत, फुप्फुस यांना गंभीर इजा होऊन ते कोसळले. ही लढाई पाहणाऱ्या मेजर जनरल कोवान यांनी त्यांना स्वत:ला मिळालेला मिलिट्री क्रॉस बॅज त्यांना बहाल केला….हा सन्मान प्रत्यक्षात स्वीकारायला ते काही जगणार नाहीत असे त्यांना वाटले होते. जखमी सॅम साहेबांना त्यांचे सहाय्यक मेहर सिंग यांनी चौदा किलोमीटर अंतर खांद्यावर वाहून नेऊन इस्पितळात पोहोचवले…. यांचा जीव वाचणे शक्य नाही असे म्हणून डॉक्टरांनी उपचारास नकार दिला होता….पण मेहर सिंग यांनी कडक पवित्रा घेतल्यावर डॉक्टर तयार झाले…त्यांनी साहेबांना विचारले तुम्हाला अशा जखमा कशा झाल्या.. त्यावर तशाही गंभीर परिस्थितीत सॅम मस्करीत उत्तरले….’ मला एका खेचराने ठोकरले ! ‘ उपचार मिळाले आणि सॅम बहादूर बचावले, हे पुढे स्वतंत्र भारतीय सैन्याचे नशीब म्हणावे लागेल.
स्वतंत्र भारतात त्यांची कारकीर्द बहरली. मात्र सैन्याच्या कारभारात राजकारणी लोकांचा हस्तक्षेप त्यांना मान्य नसे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना सेनेतील नोकरी जवळजवळ सोडण्याची पाळी आली होती. त्यांच्याविरुद्ध लष्करी न्यायालयात खटला सुरू असतानाच १९६२ मध्ये चीनने आक्रमण केले. खटल्याचा निकाल न लागल्याने या युद्धात सॅम साहेबांना भाग घेता आला नाही. चीनकडून पराभव झाल्याने भारतीय सैनिकांचे मनोबल खच्ची झाले होते. अशा स्थितीत सॅम साहेबांकडे सैन्याचे नेतृत्व सोपवले गेले. त्यांनी सैन्याला आक्रमक होण्याचे आदेश दिल्याने सैन्याचे मनोबल उंचावले गेले. त्यांनी सैन्याच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला. त्यामुळे भारतीय सैन्य हे केवळ प्रतिकार करणारे सैन्य नव्हे, तर प्रसंगी आक्रमण करू शकणारे सैन्य बनले. १९६४ मध्ये सॅम साहेबांना नागालॅन्ड भागात नेमण्यात आले. तेथे त्यांनी नागालॅन्डमधील बंडखोरी मोडून काढली..याबद्दल त्यांना पदमभूषण किताब प्रदान करण्यात आला.
सन १९७१ मध्ये सीमांवर खूप धामधुम सुरू होती. परंतु या दरम्यान झालेल्या घटना सॅम माणेकशा यांचा करारी बाणा, निर्भीडता, निर्णयक्षमता आणखी ठळकपणे अधोरेखित करणा-या आहेत.
त्यावेळच्या पाकिस्तानात घडलेल्या राजकीय, तसेच लष्करी घटनांमुळे लाखो निर्वासित भारतात घुसले होते. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. शेजारील देशातील अशांतता भारताला त्रासदायक ठरू पाहत होती. अशा परिस्थितीत देशाच्या नेतृत्वाने पाकिस्तानमधून फुटून स्वतंत्र बांगलादेश निर्माण करण्याच्या त्या लोकांच्या प्रयत्नांना सक्रीय पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारले होते. पण यातून भारताचे आणि पाकिस्तानचे जोरदार युद्ध सुरू होण्याची शक्यता होती. एप्रिल १९७१ मधल्या एका सकाळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या विषयावर एक तातडीची बैठक बोलावली. सॅम माणेकशा त्यावेळी लष्करप्रमुख म्हणून उपस्थित होते. बराच उहापोह झाल्यानंतर सॅम माणेकशा यांना “ तुम्ही युद्धास तयार आहात का? ” असा प्रश्न विचारण्यात आला. आणि अर्थातच राजकीय नेतृत्वाला सकारात्मक उत्तराची अपेक्षा होती.
परंतु अनुभवी, बेधडक निर्णय घेण्यात वाकबगार असलेले आणि हाडाचे सैन्याधिकारी असलेले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी अत्यंत स्वच्छ, स्पष्ट शब्दांत असे घाईघाईने सीमोल्लंघन करण्यास नकार दिला. या नकारामागे अत्यंत सूक्ष्म अभ्यास होता साहेबांचा. देशात सुगीचा हंगाम सुरू आहे. रेल्वेने धान्याची वाहतूक सुरू आहे. आपले सैन्य देशाच्या विविध भागांतून सीमेवर आणायला रेल्वेगाड्या लागतील आणि त्यामुळे धान्य वाहतुकीसाठी रेल्वे उपलब्ध राहणार नाहीत. देशात अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पावसाळा फार दूर नाही. सीमेवर पावसामुळे दलदल, पूरस्थिती असेल, त्यात अडकून राहावे लागेल. साहेबांनी अभ्यासपूर्ण परिस्थिती स्पष्टपणे विशद केली. तरीही आग्रह धरला जाऊ लागताच त्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘ आता आपण युद्धात उतरलो तर आपला पराभव शंभर टक्के निश्चित आहे.’ यावरून त्यांनी राजीनामाही देण्याची तयारी दाखवली होती… आणि अर्थातच ही सोपी गोष्ट नाही.
अगदी नेमकेपणाने परिस्थिती समजावून सांगितल्याने नेतृत्वाला सॅम साहेबांचे म्हणणे पटले. सॅम साहेबांनी पुढील योग्य काळात युद्ध केले जाईल आणि ते खात्रीने जिंकले जाईलच याची हमी दिली. नेतृत्वाचा आग्रह डावलून फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशा साहेबांनी हे न केलेले सीमोल्लंघन पुढील विजयादशमीसाठी किती महत्त्वाचे ठरले, हा इतिहास आहे !
साहेबांनी अतिशय योजनाबद्धरित्या पावले उचलली. बंगाली स्वातंत्र्ययोद्ध्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. आपल्या सैन्याला सर्वांगाने सिद्ध केलं आणि तीन डिसेंबरला सुरू झालेलं युद्ध सोळा डिसेंबरला संपुष्टात आणून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले.
दुस-या महायुद्धात जपानने शरणागती पत्करल्यानंतर त्यांच्या साठ हजार युद्धकैद्यांची सारी व्यवस्था करण्याचे काम सॅम साहेबांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने पार पाडले. १९७१ मध्ये शरण आलेल्या सुमारे ब्याण्णव हजाराच्या आसपास पाकिस्तानी सैनिकांची व्यवस्था करताना त्यांना हा अनुभव कामी आला. शरणागतीच्या आधी त्यांनी पाकिस्तानी सैन्यासाठी एक रेडिओ संदेश प्रसारीत केला होता…. “ आमच्या सैन्याने तुम्हाला चारही बाजूंनी पुरते घेरले आहे. तुम्हाला कुठूनही मदत मिळणे अशक्य आहे. तुम्ही केलेल्या अनन्वित अत्याचारांचा बदला घेण्यासाठी मुक्ती वाहिनीचे लोक टपून बसलेले आहेत. तुमचे जीव कशाला वाया घालवता…तुम्हांला घरी जाऊन तुमच्या बायका-पोरांना भेटायचे नाहीये का? एका सैनिकाने एका सैनिकापुढे हत्यारे म्यान करण्यात काहीही कमीपणा नसतो. आम्ही तुम्हांला एका सैनिकाला द्यावी तशीच सन्मानाची वागणूक देऊ !” …. या संदेशाचा खूप मोठा प्रभाव पडला यात नवल नाही.
(फिल्ड मार्शल सॅम ‘बहादूर’ माणेकशा यांच्या आयुष्यावर बेतलेला एक हिंदी चित्रपट डिसेंबरात येऊ घातलेला आहे. या ख-याखु-या बहादूर सेनानीची माहिती नव्या पिढीला व्हावी असा विजयादशमीच्या निमित्ताने सुचलेल्या या लेखाचा उद्देश आहे. संदर्भ, माहिती अपुरी असण्याची शक्यता दाट आहे. दिलगीर आहे. परंतु सेनाधिका-यांचे योग्य निर्णय देशासाठी काय करू शकतात याचे उदाहरण म्हणजे सॅम साहेबांचे त्यावेळी ‘ न केलेले सीमोल्लंघन ‘ होय, असे म्हणता येईल.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈