श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “असाही एक तुरुंग अधिकारी…” – लेखक : संपत गायकवाड ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
असाही एक तुरुंग अधिकारी—
मानवतेचा पुजारी असणारा, रत्नागिरी विशेष जिल्हा कारागृहाचा तुरूंग अधिकारी अमेय मिलिंद पोतदार…
अमेयची बदली झाली तर आम्हीही त्यांच्यासोबत त्यांच्याच जेलमध्ये जाणार अशी मागणी कैदी करतात. असा हा महाराष्ट्रातील सर्वात Youngest जेलर.
लहानपणी दहावीत असताना आजीला मुंबईला जाण्यासाठी रात्री सोडण्यास गेला असता कोंडाळ्यात वयोवृद्ध स्त्री अन्न शोधून खात होती हे विदारक दृष्य पाहून अस्वस्थ होतो. आईकडून पैसे घेतो व धावत पळत बिस्किटचे पुडे आणून त्या स्त्रीला देतो. ती ते पुडे अघाशासारखे खात असताना त्याला आजीने दिलेला मसाले भाताचा डबाही तो त्या वृद्ध स्त्रिला खायला देतो. लहान वयातील हा माणुसकीचा गहिवर तुरूंगाधिकारी झाल्यावरही ज्याच्याकडे कायम राहिला तो म्हणजे अमेय होय.
विनोबा भावे, सानेगुरूजी, बाबा आमटे आणि मदर तेरेसा यांच्याकडे समाजाप्रती असणारी करुणा अमेयकडे बालपणापासून चरित्र वाचनातून व शिक्षिका असणाऱ्या आईकडून अंगी बाणली. कोल्हापुरात जि.प.व म.न.पा.शाळेत मराठी माध्यमात शिकलेला अमेय MPSC मधून तुरूंग अधिकारी म्हणून रत्नागिरी येथे रूजू झाला.
जन्मजात कोणी गुन्हेगार नसतो. सर्वांत मोठा अधिकार सेवेने व प्रेमाने प्राप्त होतो याची जाणीव अमेयला होती. गुन्हेगारामध्येसुद्धा माया, ममता, आपुलकी,आत्मियता, आपलेपणा असतो यावर विश्वास असणारा अमेय…. रत्नागिरी कारागृहात खतरनाक बंदीजनांसोबत राहून त्यांच्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो आहे. माणूसपण जपले की कैदी मनाने मोकळे होतात. जमिनीवर पाय ठेवून काम केले की लोकांना आपलेपणा वाटतो. हे लक्षात घेऊन काम केल्याने बंदीजनांना अमेय आपला सखा, मित्र, सोबती वाटू लागला आहे. मन समजून घेता आले तर मनास जिंकता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेय. आकाशसारखे अनेक खतरनाक कैदी अमेयच्या इतके प्रेमात पडले आहेत की तुमच्या बदलीनंतर आम्ही काय वाटेल ते करून तुमच्याच जेलमध्ये येऊन उर्वरीत शिक्षा पूर्ण करणार असा आग्रह धरतात. याला काय म्हणावे? यापूर्वी हे शिक्षकांच्या वाट्याला यायचे पण तुरूंगाधिकारी यांच्यासाठी असे होते तेव्हा देशाचे भविष्य उज्ज्वल आहे असे दिसते. (पूर्वी ‘ दो आँखे बारह हाथ ’ या सिनेमासारखा जेलर व कैदी असतील तर किती बरे होईल असे वाटायचे. आता ते सत्यात येत आहे. महामहीम किरण बेदी यांनी तिहार जेल बदलवला होता. अमेय तसाच प्रयत्न करत आहे.)
आपल्या वाट्याला आलेले काम समाजासाठी, राष्ट्रासाठी उपयुक्त करून आवडीने, प्रामाणिकपणे व मनोभावे करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती हे अमेयला ठाऊक आहे. तारूण्याचा काळ म्हणजे जीवनाचा रचनाकाळ असतो. म्हणून अमेयने नवनवीन चॅलेंज स्वीकारली. अमेयला त्याचे दैवत असणाऱ्या वीर सावरकर यांचे वास्तव्य असणारी कोठडी व त्यांच्या वापरातील साहित्य व अभिलेख केवळ ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करून ठेवल्याचे दिसून आले . अमेयने उपलब्ध साधनसामुग्रीतून नूतनीकरण करून ही वास्तू ‘स्मृतिभवन‘ म्हणून विकसित केली. वीर सावरकर यांचा जीवनपट सदर कक्षात पोस्टरच्या स्वरूपात, तसेच छानशा लघुपटाद्वारे भेटीस येणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला. ऐतिहासिक वारसा अभिनव पद्धतीने जतन करण्यासाठी वरिष्ठांनी अमेयच्या अथक प्रयत्नांचे खूप कौतुक केले. केवळ वास्तू न बघता अमेय जेव्हा प्रचंड वाचन, अमोघ वक्तृत्व , ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास या जोरावर पर्यटकांना वा महनीय व्यक्तींना वीर सावरकरांचा इतिहास सांगतो, तेव्हा लोक भारावून जातात. त्यांच्या अश्रूंचा अभिषेक कोठडीस होतो.
अमेयकडे समाजभान असल्यामुळे त्याने स्वत:च्या लग्नातील २५ किलो अक्षता पक्षीमित्रांसाठी दिल्या . लग्नात अंगावर टाकून त्या वाया घालविल्या नाहीत. रत्नागिरी कारागृहाकडे १५ एकरपैकी १२ एकर पडून असणाऱ्या जागेवर विविध फळझाडे (आंबा व नारळाची खूपच झाडे) लावली आहेत. बागायत शेती विकसित केली आहे. बंदीजनांना विश्वासात घेतले तर नरकाचे नंदनवन होते हे सिद्ध केले आहे. राज्यात काही कारागृहात घेतलेला मधमाशी पालन प्रकल्प रत्नागिरी येथे सुरू केला आहेे. मधाचे ” मका” नावाने ब्रॅडिंग होणार आहे. मधमाशी पालन प्रकल्पामुळे मधाबरोबर परागीकरणाचा फायदा शेती उत्पादन वाढीसाठी होईल हा अमेयला विश्वास आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या वतीने त्याने ‘ पक्षी वाचवा मोहिम ‘ कारागृहात सुरू केली. पक्ष्यांसाठी कारागृह परिसरात घरटी व पाण्याची भांडी ठेवण्यात आली. स्वत:च्या लग्नातील अक्षता व दुकानात पडलेले धान्य यांचा वापर केला. आज विविध पक्षांचे आनंदाचे व सुरक्षित आश्रयस्थान म्हणजे कारागृहाची शेती झाली आहे. जागतिक दृष्टी दिनानिमित्य अंध मुलांना सन्मानाने बोलावून त्यांच्या हस्ते कारागृह परिसरात वृक्षरोपण केले. मुलांसाठी हा अनोखा कार्यक्रम ही पर्वणीच होती.
बंदीजनांच्या कुटुंबांची सार्वत्रिक गळाभेट घडवून आणणे , एकत्रित भोजन करणे, एकमेकांना डोळ्यांत साठविणे आणि मुलांना ‘ खूप शिका, आईचे ऐका, खूप मोठे व्हा.आईची काळजी घ्या. माझी काळजी करू नका ‘ हे संवाद ऐकताना कारागृहात अश्रूंचे सिंचन होते हा अनोखा.. भावनेने ओथंबलेला, कारागृह गहिवरून टाकणारा अनुभव अमेयने घेतला. .
२००५ पासूनच्या बंदीजनांची माहिती PRISMS या प्रणालीमध्ये विहीत कालावधीत उत्कृष्टरित्या पूर्ण करण्याचे कठीण काम अमेयने करून दाखवून वरिष्ठांची वाहवा मिळविली . संगणकीकृत प्रणालीमध्ये, असणाऱ्या २४ मोड्यूलपैकी २१ मोड्यूल चालू करण्यात खूप मोठे योगदान अमेयचे होते. .
बाबा आमटे नेहमी म्हणत, ” मी माणसांना माणसात आणण्याचे काम करतो “. अमेय हेच काम पुढे चालवत आहे. विनाशकारी शक्तीचे रूपांतर कल्याणकारी शक्तीत करण्याचे काम संस्काराद्वारे,आचरणाद्वारे अमेय करतो आहे. बंदीजन जेव्हा शिक्षा संपून जातात तेव्हा अमेयची भेट सासरी जाणाऱ्या मुलींसारखी असते. आपला तुरूंगाधिकारी आपण जाताना गहिवरतो, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात… हे पाहिल्यावर बंदीजन बाहेर माणुसकीने, चांगुलपणाने वागण्याची हमी देऊन जातात, तेव्हा या बापाचा जीव भांड्यात पडतो. कसलं नातं???
आई- बाप हेच त्याचे दैवत. तुरूंगाधिकारी झाल्यावरही ‘हॉटेलमधील प्लेटमध्ये राहिलेली भाताची शिते पुसून घे’ म्हणणारा बाप अमेयला भेटला. ‘मोठ्या माणसांच्या पायाला युनिफॉर्मवरही असताना हात लाव’ असे शिकविणारी आई. ‘भ्रष्टाचाराच्या वाऱ्यालासुद्धा उभा राहू नकोस. हरामाचा पैसा विषासारखा असतो.’ हे तत्वज्ञान रुजविणारे आई- बाप असतील तर अमेयसारखा मुलगा घडू शकतो. चांगुलपणावर विश्वास ठेवून चाकोरीबाहेर जाऊन काम करणारे अमेयसारखे अधिकारी प्रत्येक क्षेत्रात थोडे का असेना आहेत. म्हणून तर देशाचा भविष्यकाळ उज्वल आहे. .
“अमेय, तू हाताखालील कॉन्स्टेबल, हवालदार, लिपीक व परिचर यांच्यावरही जीव लावला आहेस. माझ्यासारखा केवळ वयाने खूप मोठा माणूस असूनही तुला वंदन करून सलाम करतो.
… बाळ, खूप खूप शुभेच्छा व अनेक शुभाशिर्वाद.”
लेखक : श्री संपत गायकवाड.
माजी सहाय्यक शिक्षण संचालक
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈