डॉ गोपालकृष्ण गावडे
इंद्रधनुष्य
☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
सध्या आपण रोज इस्राईल आणि हमास युद्धच्या बातम्या ऐकत आहोत. 7 ऑक्टोबर च्या सकाळी हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्राईल वर हल्ला करून क्रूरपणे 1400 निशस्त्र नागरिकांचा बळी घेतला. महिलांवर अत्याचार केले. लहान मुलांचे गळे कापून क्रूरपणे हत्या केली गेली. दोनशेहुन अधिक लोकांना बंदी बनवून गाझा मध्ये नेले गेले. याच्या प्रतिक्रियेत इस्राईलने गाझापट्टीवर बॉम्बहल्ले केले. आता इस्राईली फौजा गाझा मध्ये शिरून हमासला नष्ट करायचे काम करत आहेत.
संपूर्ण युरोप आणि अमेरिकेतील प्रत्येक मोठया शहरांत पॅलेस्टीन आणि हमासच्या समर्थनार्थ प्रदर्शने होऊ लागले. त्याला प्रतिक्रिया म्हणून या शहरांमध्ये इस्राईलच्या समर्थनार्थ प्रदर्शने होऊ लागले आहेत. संपूर्ण जगाचे राजकारण या घटनेमुळे धवळून निघाले आहे.
पण सतत चर्चेत असलेला हा इस्राईल देश आणि ज्यु धर्म प्रकरण आहे तरी काय?
बायबलनुसार एकेश्वरवादी इस्राईली लोकांची गोष्ट चार हजार वर्षांपूर्वी सुरु होते.
आपण सर्वांनी बायबल मधील नोव्हाच्या नौकेची गोष्ट ऐकली असेलच. बायबलनुसार चार हजार वर्षांपूर्वी या नोव्हाचा नववा वंशज उर या इराकी शहरांत राहत होता. त्याला तीन मुले होती. त्यापैकी अब्राहम नावाच्या मुलाचा जन्म ई स पूर्व 1900 साली झाला. पुढे त्याला एकेश्वरवादी देवाने दर्शन दिले. एकेश्वरवादाचे वचन घेऊन त्याला कॅनन (सध्याचे इस्राईल आणि पॅलेस्टीन) हा भाग कायमस्वरूपी देण्याचे वचन दिले. या भागाला बायबल मध्ये ‘प्रॉमिस्ड लँड’ असे म्हटले आहे. देवाच्या आज्ञेनुसार अब्रहम आपल्या कुटुंबकबिल्यासह या भागात मुलबाळस्थानन्तरीत झाला. या अब्राहमलाच कुराणात इब्राहिम असे म्हटले आहे.
अब्रहम 170 वर्षे जगाला. त्याच्या पत्नी साराला बरेच दिवस झाले नाही. तात्कालिक प्रथेप्रमाणे तिने तिच्या हेगार या दासीमार्फत नवऱ्याकडून एक मूल होऊ दिले. त्याचे नाव इस्मेल असे ठेवले गेले. अब्रहम तोवर शंभरी जवळ पोहचला होता. इसाक अशी त्यांची नावे होती. पुढे साराला स्वतःला मुलगा झाला. त्याचे नाव इसाक असे ठेवले गेले. थोरला इस्मेल दासीपुत्र असल्याने धाकटा असूनही इसाकला बापाचा वारसा मिळाला. संपत्ती आणि प्रॉमिस्ड लँड मधून बेदखल झालेल्या या इस्मेल (इस्माईल) पासून अरबस्थानातील अरब वंश सुरु झाला असे मुस्लिम मानतात.
इसाक आणि त्याची पत्नी रेबेकाला जेकब नावाचा मुलगा झाला. या जेकबलाच पुढे इस्राईल असे संबोधले गेले. या जेकबलाच कुराणात याकूब असे म्हटले आहे.
जेकबला चार बायकांपासून बारा मुले झाली.
जेकबच्या चार बायकांपैकी दोन मुख्य बायका (रेचल आणि लिया या दोघी सख्ख्या बहिणी) होत्या तर दोन उपस्त्रिया स्त्रिया होत्या. त्यांना झालेली बारा मुले खालील प्रमाणे होती.
1) रेचल – जोसेफ आणि बेंझामिन
2) लिया – रुबेन, सिमियन, लेवी, जुडा, इस्साचर, झेबूलून
3) बिलहा – डॅन आणि नेफ्ताली
4) झिलपा – गाड आणि ॲश
या बारा भावांडापैकी जोसेफ बापाचा अतिशय लाडका होता. धाकटा जोसेफ वडिलांचा प्रिय असल्याने बाकी अकरा भावां त्याच्याविषयी ईर्षा वाटे. एक दिवस या इर्षेंपोटी सर्व भावांनी मिळून जोसेफला गुलामांच्या व्यापाऱ्याला विकून टाकला. जोसेफला हिंस्त्र प्राण्याने मारून खाल्ले असे त्यांनी वडिलांना सांगितले.
गुलाम म्हणून विकला गेलेला जोसेफला पुढे इजिप्तमध्ये नेले गेले. जोसेफला स्वप्नांचा अर्थ लावता येत असे. आपल्या अंगभूत गुणांमुळे जोसेफ इजिप्तच्या राजाचा लाडका झाला. राजाने त्याला गुलामगिरीतुन मुक्त होऊन इजिप्तचा मोठा अधिकारी केला. या जोसेफला कुरानात युसूफ असे म्हटले आगे.
जेकबचा कुटुंब कबिला कॅननच्या भागात गुण्यागोविंदाने राहत असताना भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळात खाण्यापिण्याचे वांधे झाल्यामुळे हे बारा भाऊ इजिप्त मध्ये कामधंदा शोधायला गेले. जोसेफने त्यांना ओळखले पण भाऊ त्याला ओळखू शकले नाहीत. इजिप्तमध्ये मोठा अधिकारी झालेल्या जोसेफने दयाळू जोसेफने त्याच्या सर्व भावांना माफ केले. त्या सर्वांना नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशातील पूर्वेकडील सुपीक असलेली गोशेन ही जहागीर म्हणून मिळाली. ते तिथेच स्थायिक झाले. हे सर्व इस पूर्व विसाव्या शतकाच्या आसपास घडले असावे असे मानले जाते.
पुढे इजिप्तमध्ये सत्तांतर झाले आणि सर्व ज्यु कबिले इजिप्शियन लोकांचे गुलाम झाले. 430 वर्षे गुलामगिरीत सडल्यानंतर मोझेस (कुराणात मुसा) या ज्यु पैगंबराने सहा लाख ज्यू लोकांना गुलामीतून मुक्त करून त्यांना आपल्या मायभूमीकडे परत नेले. हे सर्व इस पूर्व पंधराव्या शतकात घडले असावे असे मानले जाते. मोझेसच्या मृत्यू नंतर जोशूवा (येशूवा) या त्याच्या सहकाऱ्याने कॅनॉनचा प्रदेश जिंकून घेतला. या भागात प्रत्येक ज्यु काबील्याने आपले आपले छोटे राज्य स्थापित केले. हेच ते इस्राईलचे बारा कबिले. जेकबच्या बारा मुलांचे हे बारा वंशज होते.
इस पूर्व 1175 मध्ये भुमध्य सागरातील क्रिट बेटावर राहणाऱ्या बहुईश्वरवादी ग्रीक लोकांनी सध्याच्या गाझापाट्टीच्या सुपीक भुभागावर वसाहती वसवल्या. हे विस्तारवादी ग्रीक लोक पॅलेस्टिनी वा फिलिस्टिनी म्हणून ओळखले जात. खरे तर पॅलेस्टिनी आणि इस्राईलच्या लोकांच्या वसाहती शेजारी शेजारी असलेल्या वेगवेगळ्या भुभागवर होत्या. गाझामध्ये राहणाऱ्या ग्रीक पॅलेस्टिनी लोकांना इस्राईली शेजाऱ सहन होत नव्हता. राज्य विस्तारासाठी ते सतत इस्राईलवर हल्ले करु लागले. इस्राईलच्या लोकांचे ग्रीक पॅलेस्टिनी लोकांसोबत वारंवार खटके उडू लागले. त्याविरोधात सम्युअल या पैगंबराने सर्व ज्यु कबिल्यांच्या राजांना एक करून ज्यु लोकांचे संघराज्य स्थापन केल. साऊल या सुज्ञ व्यक्तीला त्यां सर्वाचा महाराज केला. हे सर्व ई.स. पूर्वी अकराव्या शतकात घडले. पुढे इस पूर्व 1000 व्या वर्षी अशाच एका खटक्यात डेव्हिड या मेंढपाळ मुलाने गोलियथ या धिप्पाड पॅलेस्टिनी योध्याला द्वंद्व युद्धात ठार मारले. हा ईश्वरी संकेत आहे असे समजून पॅलेस्टिनी लोक घाबरून युद्धातून पळून गेले. युद्ध टाळले. डेव्हिड महाराज साऊल चा लाडका झाला. त्यांनी त्याला आपला जावई करून घेतला. पुढे पॅलेस्टिन सोबत झालेल्या आणखी एका युद्धात महाराज साऊल आपल्या मुलांसह मारले गेले. मग डेव्हिडला लोकांनी ज्युंचा महाराजा केले. त्याने पुढे मोठा राज्य विस्तार केला. त्याने जेरूसलाम हे शहर जिंकून घेतले आणि तेथे आपली राजधानी वसवली.
डेव्हिड पासून पुढे खऱ्या अर्थाने ज्यु लोकांमध्ये राजघराणेशाही सुरु झाली. डेव्हिड च्या सोलोमन(मुसलमानांसाठी सुलेमान)या मुलाने महाराजा झाल्यावर आर्क ऑफ कोव्हीनंट साठी जेरुसलामचे प्रचंड मंदिर बांधले. तोपर्यंत मोझेस चे दहा ईश्वरी आदेश असलेला दगड ‘आर्क ऑफ कोविंनंट’ या पालखीत टाकून पाठीवर वाहिला जाई. आता त्यासाठी स्थायी मंदिर तयार झाले होते. ज्यु लोकांसाठी शांती, सुरक्षा आणि भरभराटीचा सुवर्णकाळ सुरु झाला होता.
सोलोमनने मंदिर बांधण्यासाठी काही कर लावले होते. पुढे ते कर कमी करण्यावरून ज्यु संघराज्यातील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाद झाला. 931 BC मध्ये इस्राईलच्या संघराज्याचे दोन तुकडे झाले. उत्तरी तुकड्याला उत्तरी इस्राईल म्हटले गेले तर दक्षिणेकडील राज्याला जुडाचे राज्य म्हटले गेले. उत्तरेतील दहा काबील्यांनी करात सवलत देणाऱ्या जेरोबोला आपला राजा घोषित केले. दक्षिणेतील जुडा आणि बेंझमिनया दोन काबील्यांनी सोलोमनचा मुलगा रेहोबोम याला दक्षिणेतील जुडाच्या राज्याचे राजा मानले. उत्तरेतील समारिया हे शहर उत्तरी इस्राईलची राजधानी झाली. त्यामुळे या राज्याला समारियाचे राज्य असेही म्हटले जाते. दक्षिणेतील जुडा राज्याची राजधानी जेरूसलेमच राहिली. या दुफळीमुळे ज्यूंचे राज्य कमजोर झाले.
723 BC मध्ये उत्तरेकडील सुमारिया राज्यावर अस्सेरिअन लोकांनी हल्ला केला आणि उत्तरी इस्राईलचे राज्य जिंकून घेतले. उत्तरेतील दहा ज्यू काबील्यांना त्यांच्या भूमितून परगंदा व्हावे लागले. या दहा टोळ्यांना इस्राईलच्या हरवलेल्या दहा टोळ्या असे म्हटले जाते. यापैकी काही काबिले अफगाणिस्तानात आणि काही ईशान्य भारतात स्थायिक झाल्याचा समज आहे.
यानंतर दक्षिणेतील जुडाचे राज्य पुढे पन्नास वर्ष टिकले. पण 587 BC मध्ये बॅबीलॉनच्या राजाने दक्षिनेतील जुडाच्या राज्यावर हल्ला करून जेरुसलाम शहर भुईसपाट केले. सोलोमनचे मंदिर पाडून टाकण्यात आले. दक्षिणेतील सर्व ज्यु लोकांना गुलाम बनवून बॅबीलॉनला नेण्यात आले. त्यांची गुलामगिरी पुढे 50 वर्ष चालली.
सायरस महान या पारशी(इराणी) राजाने 538BC मध्ये बॅबीलॉन जिंकून घेतले आणि ज्यु लोकांना गुलामीतून मुक्त केले. ज्यू लोकांना परत त्यांच्या मायभूमीत वसण्याची परवानगी दिली. सगळीकडून ज्यु परत मायभूमीत परत आले. ज्यु लोकांना जेरूसलाममधील जुन्या खंडर झालेल्या सोलोमनच्या मंदिराच्या जागी नवीन मंदिर बांधन्याची परवानगी मिळाली. इस्रा या पुजाऱ्याच्या पुढाकाराने सोलोमनचे दुसरे मंदिर बांधले.
पुढे अलेक्झांडरच्या नेतृत्वात बहुईश्वरवादी ग्रीकांनी पर्शियन साम्राज्य नष्ट केले. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या सरदारांमध्ये विभागले गेले. ज्यूंचे राज्य सम्राट सेलूसीडच्या वाट्याला आले. पॅलेस्टिनी लोक ग्रीक असल्याने ग्रीक लोक आत्तापर्यंत इस्राईलचे पारंपरिक वैरी झाले होते. आता ग्रीक लोक ज्यू लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू लागले. ग्रीक आणि इस्राईली ज्यू लोकांमधील तणाव वाढू लागला. शेवटी 167 BC मध्ये माकबीयन या पुजाऱ्याच्या नेतृत्वाखाली ज्यू लोकांनी ग्रीकांच्या विरुद्ध उठाव केला. तीन वर्ष लढा देऊन जेरुसलामला ग्रीकांच्या अंमलातून मुक्त केले. ज्यूंचे जेरुसलेमवर परत राज्य आले.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर
सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈