डॉ. ज्योती गोडबोले
इंद्रधनुष्य
☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-1 – लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
मृत्युपत्र हे संपत्तीची वाटणी करणारं असतं, मात्र वैद्यकीय इच्छापत्राद्वारा माझ्या शरीराचं काय करायचं, मला व्हेन्टिलेटरवर ठेवावं का? किती दिवस ठेवायचं? माझ्या आजारपणावर ०किती खर्च करायचा, शरीर वा अवयव दान करायचे का यांसारख्या इच्छा लिहून ठेवता येतात.
अठरा वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध लेखक प्रभाकर पाध्ये यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी ‘बंध-अनुबंध’ या गाजलेल्या आत्मचरित्राच्या लेखिका कमल पाध्ये एकटय़ाच राहत होत्या. डॉ. रोहिणी पटवर्धन आणि प्रमोदिनी वडके-कवळे त्यांची काळजी घेत असत. एक दिवस त्यांनी आपले डॉक्टर सुभाष काळे व या दोघींना घरी बोलावलं व सांगितले, ‘हे बघा डॉ. काळे माझ्यावर उपचार करतात. तुम्ही दोघी माझी काळजी घेता. इथून पुढे जर मी आजारी पडले आणि त्या वेळी मी निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत, परिस्थितीत नसेन आणि माणूस म्हणून जगण्याच्याही स्थितीत नसेन तर तेव्हा माझ्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार करू नका. कृत्रिम यंत्रणांवर मला जिवंत ठेवू नका. मी तुम्हा सर्वासमक्ष स्वेच्छेने माझा निर्णय जाहीर करीत आहे!’
‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या संकल्पनेची मुळं वृद्ध कल्याण शास्त्रज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन यांच्या मनांत इथेच रुजली आणि पुढे त्यांनी त्यांच्या प्रसाराचं कार्य सुरू केलं. ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ ही संकल्पना पाश्चात्त्य देशांत प्रचलित असली तरी भारतात मात्र अजून म्हणावा तेवढा प्रचार व प्रसार झालेला नाही. पण बदलत्या काळानुसार आज ‘वैद्यकीय इच्छापत्रा’ची निकड भासू लागली आहे हे निश्चित! वस्तुत: ही संकल्पना अद्याप कायद्याच्या चौकटीत नसली तरी ती एक विचारांची दिशा आहे. ‘माझे वा माझ्या शरीराचे हाल होऊ नयेत, माझ्या कुटुंबियांना निर्णय घेण्यासाठी मानसिक त्रास होऊ नये. त्यांच्यावर महागडय़ा उपचारांचा ताण पडू नये,’ या भूमिकेतून वृद्ध आपली इच्छा या ‘लिव्हिंग विल’ द्वारे व्यक्त करू शकतात.
आपलं शरीर व तब्येत हीसुद्धा एक प्रकारे आपली मालमत्ताच नसते का? मग त्यासंबंधी निर्णय निदान भविष्यकाळातील वैद्यकीय उपचारांबाबतचे आपले आपणच घ्यायला नको का? एखाद्याला बिछान्याला खिळून जगायचं नसेल किंवा कृत्रिम वैद्यकीय उपचार करून घेऊन जिवंत राहायचं नसेल, पण असे निर्णय घेण्यास तो समर्थ नसेल तर आपल्या प्रकृतीसंदर्भात कोणते उपचार केले जावेत वा जाऊ नयेत याचे स्पष्ट निर्देश करणारा दस्तऐवज म्हणजे ‘लिव्हिंग विल’ अर्थात ‘वैद्यकीय इच्छापत्र’! या ‘लिव्हिंग विल’मध्ये आयुर्मर्यादा वाढवणारे कोणतेही उपचार उदा. नळीने अन्न देणं, व्हेन्टिलेटरवर ठेवणं वगैरे करू नयेत असे स्पष्ट निर्देश करता येतात. तसेच देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदान यांसारख्या इच्छांचाही उल्लेख करता येतो. मात्र आपले फॅमेली डॉक्टर आणि कुटुंबियांशी नीट चर्चा करूनच हे इच्छापत्र बनवायला हवे. इतकं सगळं करूनही रुग्णालयातील आपल्या आई वडिलांच्या बाबतीत काय करायचं, हा निर्णय शेवटी मुलांकडे रहातोच. वृद्धांसाठी आपली इच्छा व्यक्त करण्याचा फक्त हा एक मार्ग आहे.
आपल्या शरीरावरील उपचारांविषयीच्या सर्व इच्छा शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून त्यावर ज्या व्यक्तीचं ते ‘लिव्हिंग विल’ आहे त्या व्यक्तीने सही करावयाची असते. त्यानंतर ही व्यक्ती सही करण्यास मानसिक व वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहे असं लिहून त्यावर डॉक्टर सही करतात. त्याचबरोबर पती अथवा पत्नी तसंच मुलं व जवळच्या दोन विश्वासू व्यक्तींच्या सहय़ा घेऊन हे इच्छापत्र नोटराइज्ड करावं लागतं. हे नोटराईज केल्यामुळे ज्येष्ठांची तशी इच्छा होती हे स्पष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर या इच्छापत्राच्या सत्यप्रती काढून त्या फॅमिली डॉक्टर, कुटुंबीय व शक्य झाल्यास हॉस्पिटलला द्याव्या लागतात. फक्त हे इच्छापत्र करण्यापूर्वी प्राथमिक स्वरूपाची चर्चा पती-पत्नी, मुलं, डॉक्टर व सुहृद यांच्याबरोबर अवश्य करावी. तरच या इच्छापत्रातील इच्छांची पूर्तता होण्याची खूप शक्यता असते.
”अर्थात तरीसुद्धा अनेक वेळा समोर मृत्यू दिसू लागताच तोंडाने कितीही निरवानिरवीची भाषा केली तरी रुग्ण उपचार सुरू ठेवायला सांगतात. व जोपर्यंत रुग्ण आपली इच्छा व्यक्त करण्याच्या परिस्थितीत असतो तोपर्यंत त्याच्या इच्छेनुसारच उपचार केले जातात. अनेक वेळा रुग्ण बेशुद्धावस्थेत असेल तरी भावनेच्या भरात नातलगच रुग्णास उपचार सुरू ठेवण्याचा आग्रह धरतात व ‘लिव्हिंग विल’ला विरोध करतात. एक डॉक्टर म्हणून नातलगांच्या मताचा आदर केला जातो त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाही.’
अनेक रुग्णांचे फॅमिली डॉक्टर असणारे व ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव कार्य करणारे डॉ. दिलीप देवधर ‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या अंमलबजावणीतील वस्तुस्थिती सांगतात. ‘लिव्हिंग विल’ अमलात आणताना एक डॉक्टर म्हणून आमचे काही निकष असतात. सर्वसाधारणपणे रुग्णाचं वय ७५ च्या वर असेल तरच हा निर्णय घेतला जातो. त्यातही आम्ही डॉक्टर रुग्णावरील उपचार एकदम बंद करत नाही. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर असेल तर साधारणपणे ७२ तासांत व जास्तीत जास्त ४ ते ५ दिवसांत शरीर उपचारांना प्रतिसाद देऊ लागतं. जर तसं झालं नाही तर रुग्णाचे जवळचे नातलग, फॅमिली डॉक्टर, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर असे सर्व जण एकत्र बसून चर्चा करतात व त्यानंतरच रुग्णाने शांतपणे मृत्यूला सामोरं जावं, असा निर्णय घेतला जातो. अर्थात अशा वेळी रुग्णाने स्वत: जर असं वैद्यकीय इच्छापत्र केलं असेल तर सर्वानाच हा कठीण निर्णय घेणं सोपं जातं व जवळच्या नातलगांना अपराधीभाव येत नाहीत.
सर्वसाधारणपणे डॉक्टरांचा अनुभव असा आहे की मध्यमवर्गीय माणसं भावनेच्या आहारी जाऊन रुग्णाच्या उपचारांसाठी भरमसाट खर्च करतात. वेळेला जमीनजुमला, दागदागिनेसुद्धा विकतात. भारी व्याजाने कर्ज उचलतात. त्यांची पुढची दहा-पंधरा र्वष कर्जफेडीतच जातात व ज्या रुग्णासाठी ते आपल्या मुलांच्या तोंडचा घास काढतात तो रुग्णही हाताला लागत नाही व निराशा पदरी पडते. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर ते कुटुंब मोठय़ा संकटातून वाचू शकतं.
आज माणसाची आयुर्मर्यादा वाढल्यामुळे आर्थिक गणितं साफ बदलली आहेत. वैद्यकीय खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोडीत निघाल्याने जबाबदारी घेऊन रुग्णाला त्याच्या परिस्थितीनुसार सल्ला देणारे डॉक्टर आता राहिले नाहीत. हल्लीची तरुण पिढी व्यवसायानिमित्त परगावी किंवा परदेशी असते. त्यामुळे परावलंबी रुग्णाला सांभाळणं खूप कठीण होत चाललं आहे. बरेच वेळा अशा मृत्युशय्येवरील रुग्णाला ठरावीक मुदतीपुढे हॉस्पिटलही ठेवून घेत नाहीत. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर केवळ कृत्रिम यंत्रणांवर जिवंत असणाऱ्या रुग्णाच्या नातलगांना कटू निर्णय घेण्यासाठी ‘लिव्हिंग विल’ हा फार मोठा दिलासा ठरू शकतो.
परदेशस्थ मुलं तिथल्या नियमांप्रमाणे इथेही उपचारांची दिशा ठरवण्याचा आग्रह धरतात. त्यांना इथल्या अडचणी व मर्यादा लक्षात येत नाहीत व त्याचा इथे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स व जवळचे नातलग यांना खूप त्रास होतो. आई-वडील तब्येतीने धडधाकट असतानाच परदेशस्थ मुलं, इथे ज्येष्ठांची काळजी घेणारे दोन नातलग आणि डॉक्टर यांनी एकत्र बैठक घेऊन पुढील काळात ज्येष्ठ आजारी पडल्यास त्यांच्या उपचारांची दिशा, व्याप्ती व मर्यादा यांचा साकल्याने विचार करून असं ‘वैद्यकीय इच्छापत्र’ केलं तर ते सर्वानाच खूप सोयीचं होईल. अर्थात त्यासाठी निरोगी वृद्धांनी एखाद्या तरी डॉक्टरशी सतत संपर्कात राहून नियमित वैद्यकीय चाचण्या कराव्यात.
‘सनवर्ल्ड’वरील याच सदरातील लेखानंतर रोहिणी पटवर्धन त्यांना अनेक फोन आले. त्यांतील एका ज्येष्ठाची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. ते सांगत होते, ”मी युद्धनीतितज्ज्ञ म्हणून नोकरीनिमित्त सतत फिरतीवर होतो. सतत बाहेरगावी राहिल्यामुळे नातलगांशी माझा संबंध नाही. मला मुलं नाहीत. पत्नी हयात नाही. मी एकटाच आहे. मी तुमच्याकडे रोख रक्कम जमा करेन. त्यांतून खर्च भागेल एवढेच वैद्यकीय उपचार तुम्ही माझ्यावर करा. मी हे लेखी स्वरूपात दिलं तर तुम्ही मला प्रवेश देणार की नाही?”
‘वैद्यकीय इच्छापत्र’ अशा एकटय़ा अविवाहित, विनापत्य, मुलं असूनही जवळ नाहीत वा ज्यांना सांभाळणारं कोणीही नाही त्यांच्यासाठी वरदान आहे. तसंच असाध्य व्याधींनी पीडित ज्यावर औषध व उपचार उपलब्ध नाहीत अशांसाठीही ते उपयुक्त आहे.
आयुष्यभर ज्या मुलांवर आपण जिवापाड प्रेम करतो, त्यांच्यासाठी कष्ट उपसतो, त्यांच्यावर अनावश्यक उपचाराचं ओझं लादणं वा त्यांना अप्रिय निर्णय घ्यायला लावणं यापेक्षा व्यावहारिक विचार करून ‘लिव्हिंग विल’ चा पर्याय स्वीकारणं अधिक योग्य आहे नाही का?
वैद्यकीय इच्छापत्रासंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क साधा –
लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन
मो – ९०२८६६४३३३
प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈