श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “पुण्यातल्या काही ऐतिहासिक आठवणी…” – संग्राहक : सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
पुण्यातला बाहुली हौद आणि स्त्री शिक्षणाची पहिली बळी ……
महात्मा जोतिबा फुलेंनी आपल्या पत्नी क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीने पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची शाळा सुरू करून भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला.
त्याकाळी पुणे हे अत्यंत कर्मठ व सनातनी शहर मानलं जातं होतं. जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. काही वेळा हे हल्ले शारीरिक होते तर काही वेळा मानसिक अत्याचार केला गेला.
याच पुण्यात काहीजण असे होते जे फुले दाम्पत्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला, इतकंच नाही तर त्यांचा वारसा पुढे नेला.
यातच प्रमुख नाव येते डॉ. विश्राम रामजी घोले यांचे.
गुहागर येथील अंजनवेलच्या किल्लेदार गोपाळराव घोले यांच्या नातवाचा हा मुलगा. घराण्याची ऐतिहासिक परंपरा जपत वडील ब्रिटिश पलटणीमध्ये भरती झाले, सुभेदार झाले.
वडील सैन्यात नोकरीला असल्यामुळे विश्वास घोले यांना शिक्षणाची संधी मिळाली. ते शिकून सर्जन बनले. १८५७ सालच्या बंडात देशभर फिरून जखमी सैनिकांची त्यांनी सेवा केली. ब्रिटिश आमदानीत एक नामवंत शल्यविशारद म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात रावबहादूर ही पदवी देण्यात आली होती.
पुण्यात असताना विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून ते लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या पर्यंत तत्कालीन पुढाऱ्यांशी त्यांची चांगली मैत्री होती पण त्यांना भारावून टाकले महात्मा फुले यांच्या सुधारकी विचारांनी.
सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ 1875 ला साजरा करण्यात आला. त्यावेळेस सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद डॉ. विश्राम रामजी घोले यांना देण्यात आले.
महात्मा फुलेंचे विचार सर्वत्र पोहचवेत म्हणून डॉ. घोले प्रयत्नशील होते. उक्ती व कृती मध्ये त्यांनी कधीच अंतर येऊ दिलं नाही. साक्षरतेचा प्रसार केला मात्र सुरवात स्वतःच्या घरापासून केली. आपल्या मुलींना इंग्रजी शिक्षण दिले.
त्यांच्या थोरल्या मुलीचं नाव होतं काशीबाई. सर्वजण तिला लाडाने बाहुली म्हणायचे. या काशीबाईला त्यांनी मुलींच्या शाळेत घातले. जुन्या विचारांच्या अनेकांनी त्यांना विरोध केला, प्रसंगी धमकी दिली.मात्र डॉ. घोले मागे हटले नाहीत.
ही बाहुली शाळेत हुशार व चुणचुणीत होती. दिसायला देखील ती गोड बाहुली सारखी दिसायची. तिचे शाळेत जाणे पहावले नाही. डॉ. घोले यांच्या नातेवाईकांपैकीच कोणी तरी तिला काचा कुटुन घातलेला लाडू खायला दिला. यातच त्या आश्रप मुलीचा मृत्यू झाला.मात्र या घटनेनंतरही विश्राम रामजींनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केले. तिचे पती डॉक्टर होते.
आपल्या लाडक्या बाहुलीचा स्मरणार्थ डॉ. घोल्यानी १८८० साली पुण्यात बुधवार पेठेमध्ये आपल्या घरासमोरच हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. कोतवाल चावडी समोर असलेल्या या हौदाचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी करण्यात आला.
याच हौदाला बाहुलीचा हौद म्हणून ओळखले जाऊ लागले. हौदावरील उल्लेखानुसार काशीबाईचा जन्म १३ सप्टेंबर १८६९ रोजी व मृत्यू २७ सप्टेंबर १८७७ रोजी झाला होता. तिची एक मूर्ती या हौदावर उभी केली होती. कात्रजवरून येणारे पाणी या हौदात पाडण्यात येत असे. या अष्टकोनी हौदावर कारंजा देखील होता.
पुढे रस्ता रुंदीकरणामध्ये हा हौद हलवण्यात आला. इथली बाहुलीचा मूर्ती देखील गायब झाली. आता हा हौद फरासखाना पोलिस चौकीच्या हद्दीत सध्याच्या दगडूशेठ दत्त मंदिराजवळ आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याला “बाहुलीचा हौद गणपती” असेच पूर्वी ओळखले जायचे.
घोलेंनी बांधलेला हौद, तिच्या वरची ती बाहुलीची मूर्ती या जुन्या पुणेकरांच्या आठवणीतच उरला आहे. या ठिकाणी वापरलेला फोटो देखील प्रातिनिधिक नागपूरच्या बाहुली विहिरीचा आहे. स्त्री शिक्षणाचे स्मारक म्हणून काशीबाई घोले यांचे स्मारक जुन्या वैभवात उभे केले.
संग्राहक : श्री सुनील इनामदार
मो. ९८२३०३४४३४.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈