सौ. राधिका गोपीनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ श्री राममूर्ती प्रतिष्ठापना… ☆ सौ. राधिका गोपीनाथ पंडित ☆
कुरूकवाडे…. कुलकर्णी, पंडित परिवारात रामराज्य सुरू झाले……
धुळे जिल्ह्यातील कुरुकवाडे येथील श्रीराम मंदिरात आणि समाधी मंदिरात पाऊल ठेवलं. अतिशय रेखीव, अप्रतिम पंचायतन मूर्ती बघून डोळ्यांचे पारणं फिटलं. डोळ्यात आनंदाश्रूनी गर्दी केली. समस्त कुरुकवाडेकर, पंडित, कुलकर्णी परिवाराची श्रद्धा, भक्ती, सढळ हाताने निर्मळ मनाने दिलेली देणगी, फळाला आली आणि राम दरबार सजला. मनात आलं उत्कट श्रद्धेचं रामराज्य यापेक्षा वेगळे ते काय असणार ? सासरच्या मूळ गावाचा, मूळ पुरुषाचा, कुलस्वामिनीचा अभिमान मनात दाटून आला.
कार्यक्रमाला सुरुवात झाली दिनांक 19 -8 -2023 पासून कलशात सप्त नद्यांचे पाणी घेऊन 11 जोड्या समस्त गावकऱ्यांसह सुवासिनींसह अनवाणी पायाने खेड्यातील दगड धोंडे ओलांडत धमणे वेशीपासून भक्ती-भावानी मिरवणुकीसह निघाल्या. मनात अहिल्येची श्रद्धा, शबरीची भक्ती मावत नव्हती. रथयात्रा पुढे पुढे चालली होती. गावातल्या सुवसिनी सजल्या होत्या. रथमार्गावर सडा, रांगोळी, प्रत्येक घरावर गुढ्या तोरणं पताका लहरत होत्या. आसमंतात एकच निनाद निनादत होता… “श्रीराम जय राम जय जय राम.”
कुरूकवाडे मंदिरात श्री विष्णू श्रीराम सीता आले. लक्ष्मण हनुमानाचे आगमन झाले.. मूर्ती मंदिरात प्रवेशत्या झाल्या. 3 होम कुंडाची, होमहवनाची जय्यत तयारी झाली होती.
एक नवीन माहिती मिळाली. जयपुरला छिन्नीद्वारे आघात करून मूर्ती आकाराला आणतांना शस्त्र वापरावी लागतात. त्यासाठी प्रतिष्ठापनेआधी कुटीरयाग होम करावा लागतो. तो प्रथम साग्रसंगीत करण्यात आला.
नंतर प्रथम संस्कार झाला तो धान्य-संस्कार. हा संस्कार करतांना गावकऱ्यांनी यथामती, यथाशक्ती धान्य आणून दिलें. हां हां म्हणता म्हणता धान्याच्या राशी जमल्या. श्रीराम, सीता, लक्ष्मण तांदुळात विराजमान झाले. तर श्रीगणेश, श्री विष्णू, पादुका गव्हात स्थानापन्न झाले. धान्याचा प्रत्येक दाणा दाणा श्री पंचायतनाच्या पदस्पर्शाने पावन झाला.
कौतुकाची गोष्ट म्हणजे आमचा बराचसा पंडित परिवार, अत्यन्त श्रद्धेने दिनांक 27 रोजी कुरुकवाडे येथे हजर झाला होता. मीनाताईंनी मला त्या धांन्यातल्या पवित्र अक्षता दिल्यावर मी समस्त पंडित परिवाराला त्या वाटून दिल्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, श्रद्धा, भक्ती बघून खूप समाधान वाटले.
धान्य यागानंतर झाला जलनिवास. 108 जडीबुटींनी सप्त नद्यांच्या जल संचयाने यथासांग स्नान घालून मूर्ती पाण्यामध्ये ठेवल्या गेल्या.
त्यानंतर झाला शयन-याग. मूर्ती फुलांच्या बिछान्यावर मऊ गालीच्या वर झोपवण्यात आल्या. अतिशय नयनरम्य सोहळा होता तो. धान्य याग, जलस्नान, शयनयाग झाल्यानंतर होमहवनानंतर यथासांग प्राणप्रतिष्ठा झाली. आणि त्यानंतर अतिशय नयनरम्य, आनंदाने अंगावर रोमांच उभे राहतील असा पंधरावा, अत्यंत पवित्र असा संस्कार साजरा झाला आणि तो म्हणजे लग्न संस्कार. विवाह सोहळा, अंतरपाट मंगलाष्टकांनी, मंगल वाद्यांनी हा रम्य संस्कार गावकऱ्यांनी जल्लोषात धूमधडाक्यात साजरा केला. गदिमांचे गीतस्वर उमटले, ” स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे.”… नंतर झाली पूर्णाहुती, आरती.
रोज भजन, कीर्तन, रामायण चालू असताना हौशी कलाकार श्रीराम, सीता, लक्ष्मणाच्या वेशात एन्ट्री करत होते. राम भक्त हनुमानाचा रोल केलेला उत्साही कलाकार ही मागे नव्हता. त्यामुळे सुरस रामायणाला सुरम्य शोभा आली होती. सळसळत्या उत्साहाने नाचत असलेले कुरूकवाडेकर श्रीराममय झाले होते. आनंदाने नाचत म्हणत होते ” सीतावर रामचंद्र की जय.”
28 रोजी कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता झाली. श्री आप्पा कुलकर्णी व भगिनी परिवारांनी श्रीराम, सीता, लक्ष्मणाच्या मूर्तीवर छत्री चढवली. मूर्तीच्या चेहऱ्यावरची सात्विकतेची तेजोवलये आणखीनच विकसित झाली.
या सोहळ्यासाठी सगळ्या लोकांनी सढळ हाताने देणग्या दिल्या. त्यात श्री आप्पाच्या भगिनींचा पण फार मोठ्ठा हातभार होता. महाप्रसादाचा लाभ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही समस्त पंडित परिवार कुरवाडेकर व कुलकर्णी परिवाराचे अत्यंत आभारी आहोत.
कुरूकवाडे, पंडित व कुलकर्णी परिवारांचा मुख्य सूत्रधार व आमचा प्रतिनिधी म्हणून श्री. अप्पा कुलकर्णी यांचा ह्यात फार मोठ्ठा आणि अत्यंत मोलाचा असा सिंहाचा वाटा आहे.
मोठ्या मनाचे आणि पडद्यामागचे कलाकार असलेले श्री अप्पा कुलकर्णी मोकळ्या मनाने गावकऱ्यांना मोठेपणा देऊन म्हणतात, “मी काहीच केलं नाही, हे सगळं गावकऱ्यांमुळे झालं.”
कार्याचे सूत्र, नेतृत्व, योग्य दिशा दाखवण्याचं मोठं काम श्री आप्पांनीच केलं आहे हे मान्य करावेच लागेल. एवढा मोठा पवित्र सोहळा पार पडतांना श्री आप्पांना त्यांच्या धर्मपत्नी व आमच्या सूनबाईने सौ. अलकाने उत्तम साथ दिली. शांत हसतमुख, सोज्वळ चेहरा, आल्या गेल्यांचे स्वागत करतांनाचं अगत्य पाहून ती साक्षात अन्नपूर्णाच भासत होती.
क्षमस्व. जागेअभावी सगळ्यांची नावे मी नाही लिहू शकले. पण सगळ्यांचेच हातभार लागले आणि सगळ्यांचेच आम्ही अत्यंत आभारी आहोत. कारण, ‘याची देही याची डोळा.’ असा हा सुंदर सोहळा तुमच्या सगळ्यांमुळेच आम्हाला लाभला आहे.
मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जयपूरला मूर्ती आणण्यासाठी गेलेली मंडळी सांगतात, जयपूरहून मूर्ती आणतांना त्यात जडत्व जाणवत होतं. दोन-चार जणांना हातभार लावावा लागला होता. पण त्याच मूर्ती प्रतिष्ठापना करताना अत्यन्त हलक्या भासल्या. इतकं त्यात दैवत्व आलं होतं की एका माणसाने सहज त्या उचलल्या. या भाग्यवान मंडळींना माझा मनापासून दंडवत..
आमचे कनिष्ठ चिरंजीव प्रसाद गोपीनाथ पंडित याच्यामुळेच आप्पा आणि आमच्यात ओळख होऊन कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला. आणि समस्त पंडित परिवाराचा धागा कुरुकवाडे कुलकर्णींशी जोडला गेला. चि. प्रसादला तुमच्या कडून शुभेच्छा शुभचिंतन शुभाशीर्वाद मिळावा ही श्रीरामा जवळ कुलस्वामिनी जवळ आणि तुमच्याकडे प्रार्थना.
इतर पंडित परिवाराने कुठलाही किंतु मनात न ठेवता सढळ हाताने निरपेक्ष मनाने श्री.अप्पाकडे देणग्या पाठवल्या ही आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
© सौ. राधिका गोपीनाथ पंडित
पुणे.
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈