श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(तब्बल दोनशे किलोमीटर्सचा हा प्रवास करायला त्यांना पाच दिवस लागले…प्रभु रामचंद्रांच्या वानरसेनेलाही श्रीलंकेपर्यंत सेतू बांधायला पाचच दिवस लागले होते.) इथून पुढे —
३० ऑक्टोबरला राम-शरद अयोध्येत दाखल झाले! अयोध्येत सुमारे तीस हजार पोलिसांचा खडा पहारा होता…हत्याबंद. माणूसच काय पण पाखरूही रामजन्मभूमी परिसरात फिरकू शकणार नाही अशी पोलादी रचना केली गेली होती. तत्कालीन प्रशासन हे न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे पालन करण्यात व्यग्र होते. हाती लागलेल्या कारसेवकांना प्रशासन वाहनांमध्ये कोंबून दूरवर नेऊन सोडत होते. रामजन्मभूमीस्थळी हजारोंचा जमाव जमला होता. त्यांच्यामध्ये पोलिसांच्या पहा-याची मजबूत भिंत उभी होती. पोलिसांनी अटक केलेले कारसेवक एका वाहनात भरले…ते वाहन तेथून निघणार होते तेवढ्यात एका साधूने वाहनचालकाकडून त्या वाहनाचा ताबा मिळवला आणि ते वाहन सर्व अडथळे तोडून थेट रामजन्मभूमीस्थळी पोहोचले. हे एवढ्या वेगाने घडले की काही मिनिटे पोलिसही गोंधळून गेले. या गोंधळात तोवर त्या इमारतीच्या घुमटावर कारसेवक चढलेही होते….बारीक चणीचे आणि चपळ असलेले शरदकुमार हाती भगवा ध्वज घेऊन सर्वांत आधी घुमटावर पोहोचले…बंधू राम सोबत होतेच. आणि राजेश अग्रवालही. शरदकुमारांनी घुमटावर भगवा ध्वज फडकावला…त्या स्थळावर प्रतिकात्मक अधिकार सांगणारी ती कृती होती….त्याजागी चारशे आठ वर्षांनंतर पहिल्यांदा मूळचा ध्वज फडकत होता! यंत्रणेने या सर्वांना खाली उतरवण्यात यश मिळवले आणि त्यांची रवानगी दूरवर केली.
शरद,राम,राजेश आणि अन्य सहकारी १ नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येत परतले. अयोध्येतल्या एका मंदिरात रात्र काढली. दुस-याच दिवशी कार्तिक पौर्णिमा होती….२ नोव्हेंबर,१९९०! यादिवशी गंगा-यमुना स्नान घडले तर समस्त मनोकामना पूर्णत्वास जातात, अशी श्रद्धा आहे! या दिवशी देव दिवाळीही साजरी केली जाते.
रामजन्मभूमीसमोर जाऊन भजने म्हणत शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्याचे ठरले आणि अर्थात शरद,राम,राजेश हे यात सहभागी होणारच होते. त्यांनी भल्या पहाटे शरयूगंगेत स्नान केले. घाट चढून वर आले तर रस्त्यातल्या एका दुकानात एक वस्त्रकारागीर कारसेवकांसाठी भगव्या कपाळपट्ट्या तयार करताना दिसला. राम आणि शरद यांनी एक एक पट्टी खरेदी केली. आणि पट्टीच्या मागे पेनने लिहिले….कफन! ही कृती तशी काही आधी ठरवून केलेली नव्हती…हा कदाचित प्रारब्धाचा एक संकेतच असावा !
योजनेनुसार अयोध्येतील एका गल्लीतून एक गट नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी भजने गात निघाला. पोलिसांनी अडवले तर रस्त्यातच बसून राहायचे, अशी साधारण योजना होती. भर दुपारची वेळ. एका मठवजा इमारतीतून शरदकुमार आणि रामकुमार नुकतेच बाहेर पडले होते…शांतपणे चालत येत होते. तेवढ्यात पोलिसांनी गोळीबार करायला सुरूवात केली. एका गोळीने रामकुमारच्या मस्तकाचा वेध घेतला…क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ते पाहताच शरदकुमार रामकुमारकडे धावला…लक्ष्मण रामामागे धावला तसा….शरदकुमार त्याच्यापाशी खाली बसला…आणि दुस-याच क्षणी त्याच्याही शरीराचा वेध दुस-या एका गोळीने घेतला! दोघेही जागीच गतप्राण झाले! गल्लीत प्रचंड गदारोळ उठला.
पोलिसांनी मृतदेह वाहनांमध्ये भरून नेण्यास सुरुवात केली होती….परंतू राजेश अगरवाल यांनी त्याही स्थितीत काही व्यवस्था करून राम आणि शरद यांचे मृतदेह ताब्यात घेऊन तेथून हलवले. प्रशासनाने ते मृतदेह अयोध्येतून बाहेर घेऊन जाण्याची अनुमती दिली नाही. नंतर शरयूच्या तीरावर राजेश अग्रवाल यांनी या दोघा भावांना अग्निडाग दिला…!
इकडे कोलकात्यात हीरालाल यांच्या पत्त्यावर एक पोस्टकार्ड आले होते….बाबा आम्ही वाराणसीला पोहोचतो आहोत अशा आशयाचे…काम झाल्यावर लगेच घरी यायला निघतो…जय श्रीराम! त्यानंतरच्या सलग चार दिवशी चार पत्रं आली…पोरांनी पत्र लिहित राहण्याचे वचन पाळले होते आणि प्रत्येक मुक्कामावरून एक एक पत्र धाडले होते.एकात लिहिले होते…ताईच्या लग्नासाठी लवकरच परत येऊ !
घटनेच्या दिवशीच कोलकात्यात बातमी पोहोचली होती….राम शरद आता आपल्यात नाहीत. कौसल्येचे राम आणि सुमित्रेचे लक्ष्मण रावणरूपी मृत्यूच्या जबड्यातून सुटून अयोध्येत परतू शकले होते…परंतू या सुमित्रेचे राम-शरद प्रत्यक्ष श्रीरामांच्या अयोध्येतून परतू शकले नाहीत. हीरालाल आणि सुमित्रा कोठारी यांच्यावर कोसळलेला वेदनेचा डोंगर अगदी महाकाय. आपल्या लेकरांच्या पार्थिव देहांचं अंतिम दर्शनही त्यांना घेता आले नाही. दोन महिन्यांवर लग्न आलेल्या बहिणीने,पौर्णिमाने मग आपला साखरपुडा मोडला आणि राममंदिर उभे राहीपर्यंत अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला…एक आनंदी कुटुंब असं मोडकळीस आलं होतं. रामकुमार आणि शरदकुमार कोठारी यांचे वडील हिरालाल आज जगात नाहीत….ते २००२ मध्ये गेले. हे जग सोडताना त्यांच्या मुखात ‘राम’ नाम होते..आणि शरद नामही! त्यांचा राम जीवनात न रेंगाळता मृत्यूच्या वनात निघून गेला होता. आणि या रामाच्या लक्ष्मणाने आपल्या भावाची सावली बनून त्याच्यासह जाणे स्वीकारले ! २०१६ मध्ये ह्या राम-शरदाची सुमित्राही पुत्रविरहाचं दु:ख हृदयात घेऊन परलोकी गेली! भावपूर्ण श्रद्धांजली !
— समाप्त —
(संबंधित विषयाबद्द्ल विविध स्रोतांमध्ये वाचलेल्या माहितीवर आधारित.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈