श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
सियाचिन…. जगाचं जणू छतच. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली युद्धभूमी आहे ही. आणि ह्या बर्फाच्या साम्राज्यावर आपले पाय रोवून उभे राहण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आपल्या सैनिकांना. शून्याच्या खाली साठ सत्तर अंश तापमानापर्यंत खाली घसरणारा पारा जगणं हीच मोठी लढाई बनवून टाकतो. एवढं असूनही आपले जवान इथे रात्रंदिवस पहाऱ्यावर सज्ज असतात. यासाठी गरजेची असणारी शारीरिक, मानसिक क्षमता केवळ पुरूषांमध्येच असू शकते, असं वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतू या समजुतीला खरा छेद दिला तो राजस्थानच्या उष्ण प्रदेशात जन्मलेल्या एका दुर्गेनं. तिचं नाव शिवा चौहान… अर्थात आताच्या कॅप्टन शिवा चौहान मॅडम.
१८ जुलै १९९७ रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये जन्मलेल्या शिवाचे तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पितृछत्र हरपले. राजेंदसिंह चौहान हे त्यांचं नाव. आईने, अंजली चौहान यांनी मग तिच्या आयुष्याची दोरी आपल्या हाती घेतली.
घरात त्या तिघी. तिची मोठी बहिण कायद्याचं शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आणि शिवा मात्र चक्क सैन्यात जाण्याच्या जिद्दीने पेटून उठलेली. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचारच हा मूळात मोठ्या हिंमतीचा म्हणावा लागतो. शिवाने सिविल इंजिनियरींगमधली पदवी मिळवली ती केवळ सैन्यात जाण्यासाठीच.
सैन्यात भरती होण्याच्या कठीण मुलाखतीच्या दिव्यातून शिवा प्रथम क्रमांकाने पार पडल्या यातूनच त्यांच्या मनातली प्रखर जिद्द दिसून यावी. २०२० मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवला आणि पुरूषांच्या बरोबरीने कठीण शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढच्याच वर्षी त्यांना भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी रेजिमेंट मध्ये नेमणूक मिळाली. त्यांच्या विभागाचं नावच आहे ‘फायर अॅन्ड फ्यूरी सॅपर्स….’ अर्थात ‘अग्नि-प्रक्षोप पथक..’ हरत-हेच्या वातावरणात सैन्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारा विभाग.
मागील दोन वर्षांपूर्वी चीनी सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजीत संघर्षात भीष्मपराक्रम गाजवलेले कर्नल संतोष बाबू याच विभागाचे शूर अधिकारी होते… त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते.
सैन्य म्हणजे केवळ हाती बंदूक घेऊन गोळीबार करणे नव्हे… सैन्याला अनेक विभाग मदत करीत असतात… अभियांत्रिकी विभाग यात खूप महत्वाचा असतो. आपल्या कथानायिका कॅप्टन शिवा चौहान याच ‘फायर अॅन्ड फ्यूरी’च्या अधिकारी.
Spade म्हणजे फावडे. याचेच फ्रेंच भाषेतील अपभ्रंशित नाव आहे Sappe…सॅपं! त्या काळातील युद्धात किल्ले महत्त्वाचे होते. किल्ल्यांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या भिंतींच्या अधिकाधिक जवळ जाणे गरजेचे असे. अशा वेळी त्यावेळचे अभियंते वरून झाकले जातील असे खंदक खणत आणि मग सैन्य त्या खंदकांतून पुढे पुढे सरकत जाऊन किल्ल्याच्या समीप जाई. यावरून सैन्यात सॅपर ही संज्ञा रूढ झाली ती आजपर्यंत.
आधुनिक काळात या सॅपर्सचं अर्थात अभियांत्रिकी सैनिकांचं मुख्य काम असतं ते सैन्याला पुढे जाता यावं म्हणून रस्ते बांधणे, पूल बांधणे, भूसुरुंग पेरणं आणि शत्रूने पेरलेले भूसुरुंग शोधून ते नष्ट करणं. या कामांमध्ये अतिशय उच्च दर्जाची तांत्रिक क्षमता आणि अनुभव गरजेचा असतो. आपल्या सैन्यात बॉम्बे सॅपर्स, मद्रास सॅपर्स असे अन्य अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहेत.
कॅप्टन शिवा चौहान यांनी अगदी कमी कालावधीत अतिशय कर्तव्यतत्पर आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केला. उंच बर्फाळ पहाड चढून जाणे, इतक्या उंचीवर अभियांत्रिकी कामांना अंतिम स्वरूप देणे इत्यादी कामांत त्या वाकबगार झाल्या.
त्यांच्या आधी महिला अधिकाऱ्यांना सियाचिन मधल्या १५६३२ फुटांवरील युद्धभूमीच्या खालील ९००० हजार फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्पपर्यंतच नेमणूक दिली जाई. उरलेली ६६३२ फूट उंची पार करणं तोपर्यंत एकाही महिलेला शक्य झालं नव्हतं. पण शिवा चौहान यांनी खडतर प्रशिक्षणं लीलया पार पाडली.
सियाचिन भागात सायकल चालवणारी महिला हे दृश्यच अनेकांना कौतुकाने तोंडात बोट घालायला भाग पाडणारे होते. शिवा चौहान यांनी चक्क ५०८ किलोमीटर अंतर कापणारी सायकल मोहिम हाती घेतली आणि पूर्णही करून दाखवली. कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी ही अनोखी मोहिम यशस्वी केली. सियाचिन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक अशी ही सायकल यात्रा कॅप्टन शिवा चौहान यांनी इतर पुरूष अधिकारी, सैनिक यांचे नेतृत्व करून पूर्ण केली, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्द्ल कुणाच्याही मनात शंका उरली नाही.
आणि यानंतर मात्र शिवा चौहान यांनी आणखी ६६३२ फूट उंचीवर जाण्याचा चंग बांधला… प्रचंड कष्ट घेऊन आवश्यक ती सर्व प्रशिक्षणं पूर्ण केली आणि जानेवारी २०२३ मध्ये त्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी म्हणून सियाचिन वर प्रत्यक्ष कामावर नेमण्यात आले… एका महिलेसाठी हा एक प्रचंड मोठा सन्मान मानला जावा!
सैनिक हिमवीरांच्या मधोमध मोठ्या अभिमानाने बसलेल्या कॅप्टन शिवा चौहान ह्या नारीशक्तीच्या प्रतीकच आहेत. त्यांच्यापासून समस्त तरूण वर्ग निश्चितच प्रेरणा घेईल. भगवान शिवाचं वास्तव्य असलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखरांवर शिवा नावाची पार्वतीच जणू भारतमातेच्या रक्षणासाठी बर्फात पाय रोवून उभी आहे!
कॅप्टन शिवा चौहान, आपणांस अभिमानाने सल्यूट… जय हिंद !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈