श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ पालनकर्ता शंकर – ☆  श्री मकरंद पिंपुटकर

पालनकर्ता शंकर…

पौराणिक कथांमध्ये “शंकर” हा संहार करणारी देवता आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात असलेले  ८१ वर्षांचे शंकरबाबा मात्र पालनकर्ता देवतास्वरूप आहेत.

महाराष्ट्रातील ‘अमरावती’ जिल्हा हा तसा कोरडवाहूच. पण येथील ‘परतवाडा’ तालुक्यातल्या रूक्ष ओसाड रखरखाटात, ‘वझ्झर’ गावच्या टेकाडावर मात्र मायेचं हिरवंगार पांघरूण अंथरलेलं आहे. ही माया आहे शंकरबाबा पापळकर यांची. 

खरंतर शंकरबाबा इथे येण्यापूर्वी मुंबईत ‘देवकीनंदन गोपाळ’ नावाचं नियतकालिक चालवत होते. मुंबईतील कुंटणखान्यातील – वेश्या व्यवसायातील स्त्रियांची कुचंबणा त्यांना विद्ध करून गेली.  “त्याहूनही वाईट परिस्थिती होती शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्या मुलींची. गावोगावांतून अशा मुलींना या ना त्या बहाण्याने मुंबईत आणलं जायचं आणि वेश्या व्यवसायात ढकललं जायचं,” आपल्या कार्याची सुरुवात कशी झाली ते विषद करून सांगताना शंकरबाबा सांगतात.

“मला हे सहन झालं नाही, आणि या अशा व अन्य अनाथ मुलामुलींना सहारा देण्यासाठी वझ्झर येथे मी ‘अंबादासपंत वैद्य बालसदना’ची पायाभरणी केली. जसजशी कामाची माहिती लोकांना होत गेली, विश्वासार्हता वाढत गेली, तसतसे ठिकठिकाणाहून आई वडिलांनी – समाजाने टाकून दिलेल्या अपंग, मतीमंद लेकरांना माझ्याकडे पाठवलं गेलं. अनेकांना तर खुद्द पोलिसांनीच माझ्याकडे आणून सोडलं.”

१९९० ते १९९५ या काळात २५ मुलं आणि ९८ मुली अशी एकूण १२३ लेकरं शंकरबाबांच्या आश्रयाला आली. १९५७ साली पारित झालेल्या कायद्यानुसार, अशा अनाथ मुलांना त्यांच्या वयाच्या १८ वर्षांनंतर ते केंद्र – तो आश्रम सोडणे भाग असतं. 

“पण जे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत अथवा मतीमंद आहेत, अशांचा हा आधार काढून घेणं सर्वथा अयोग्य आहे. वयाच्या १८ वर्षांनंतर पुन्हा उघड्यावर पडलेले असे हे तरुणतरुणी पुन्हा अनाथ होतात, आणि उदरनिर्वाहासाठी वाम मार्गाला तरी लागतात अथवा कोणी त्यांचा गैरफायदा घेतो,” बाबा कळवळून सांगतात. “म्हणूनच मी कोणतीही सरकारी मदत घेत नाही. त्यामुळे नियमानुसार या मुलांना बाहेर काढणं मला बंधनकारक नाही.”

आणि म्हणूनच मुलांची संख्या १२३ झाल्यावर बाबांनी त्यांचेच नीट लालनपालन करायचे ठरवले, आणखी मुलांना स्वीकारलं नाही. या मुलांना त्यांनी शिकवलं, आपल्या पायावर उभं करण्यासाठी प्रशिक्षण दिलं. 

बाबांना अनेक ठिकाणी आपले अनुभव सांगण्यासाठी बोलावले जाते. अशा कार्यक्रमांत मिळणारे मानधन, देणगी आणि समाजातील अन्य दानशूर व्यक्तींच्या मदतीने त्यांचे हे व्रत चालू राहिले आहे. 

आपल्या आसऱ्याला आलेल्या या सर्वांना बाबांनी आपले नाव दिले. १९ मुलींची लग्नं लावून दिली, अगदी अंध विद्यार्थ्यांच्या देखील शिक्षणाची सोय केली, त्यातील एक अंध विद्यार्थिनी ‘माला शंकरबाबा पापळकर’ तर MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.

“जी मुलं मतीमंद आहेत, अशांना मी वृक्षवल्लींची निगा राखायला शिकवलं. त्यांच्या मेहनतीनेच आज या बालसदनाच्या अवतीभवती ही वृक्षराजी उभी राहिली आहे.”

बालसदनातील मुलं – तरुण तरुणीच बाकीच्यांची काळजी घेतात. पोलियोग्रस्त रूपा सर्वांना जगातल्या घडामोडींचे updates देते. मूक बधिर ममता आणि पद्मा बाल सदनातील सगळ्यांच्या खानपानाची व्यवस्था बघतात. बेला सगळ्यांच्या दर महिन्याच्या आरोग्य तपासण्या, औषधं, दवाखान्याच्या वाऱ्या सांभाळते. प्रत्येक जण आपापला खारीचा वाटा उचलत असतो.

यंदाच्या वर्षीचा मानाचा “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाल्यावर शंकरबाबांची पहिली प्रतिक्रिया होती की “मी पंतप्रधानांची भेट मागणार आहे, १९५७ चा तो कायदा रद्द करणे कसं आवश्यक आहे हे मी त्यांना पटवून देणार आहे.”  

अशा आनंदाच्या क्षणीसुद्धा स्वतःच्या गौरवापेक्षा देशातील अंध, अपंग, मतीमंद अनाथांचे भले कसे होईल हाच विचार प्रथम आला. 

म्हणूनच सुरुवातीला म्हटलं, महाराष्ट्रातला शंकरबाबा पालनकर्ता देवता आहे. 

शंकरबाबांच्या मानवसेवेला साष्टांग दंडवत.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments