श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ कुसुमाग्रज आणि ज्ञानपीठ पुरस्कार… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
१७ सप्टेंबर १९८८.. सकाळचे कार्यक्रम नुकतेच आटोपले होते. तात्यासाहेब आपल्या आरामखुर्चीत बसुन वर्तमान पत्र चाळत होते.बाईंच्या तसबिरी समोर लावलेल्या उदबत्तीचा खोलीत मंद दरवळ पसरला होता..मुखाने नेहमीप्रमाणे ‘श्रीराम..’असं सुरु होतं.
तोच जिल्हाधिकारी कार्यालयातुन एक कर्मचारी आला.. आणि साहेब येत आहेत.. आपण घरीच आहात ना..हे पहायला मला पाठवलं होतं.. तात्यांनी मान डोलावली..
थोड्या वेळात जिल्हाधिकारी सारंगी साहेब.. आणि कमिशनर अजय दुआ आले.
“अभिनंदन.. आपले नाव ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले आहे..”
आणि मग १८ सप्टेंबरच्या सर्वच वर्तमान पत्रात ही बातमी अग्रभागी छापली गेली.तात्यासाहेबांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
☆ ☆ ☆ ☆
ज्ञानपीठ कुणाला मिळतं?
ते ठरवण्यासाठी प्रत्येक भाषेतील तीन जणांची एक समिती असते.तिला L.A.C.म्हणतात.म्हणजे लॅंग्वेज ॲडव्हायजरी कमिटी.ही कमिटी आपापल्या भाषेतील एका लेखकाची शिफारस करते.. ज्ञानपीठ साठी.
मराठी साठी असलेल्या या कमिटीतील तिघे जण होते..बाळ गाडगीळ,म.द.हातकणंगलेकर, आणि प्रा.सरोजिनी वैद्य. या कमिटीने कुसुमाग्रजांच्या नावाची कधीच शिफारस केली नाही.आलटुन पालटुन त्याच त्या तीन नावांची शिफारस करत होती.ती तीन नांवें म्हणजे..पु.ल..विंदा..आणि गंगाधर गाडगीळ.
तर त्या वेळी केंद्रीय मंत्री पी.व्ही.नरसिंहराव हे ज्ञानपीठचे अध्यक्ष होते.महाराष्ट्र टाईम्स चे अशोक जैन त्यावेळी दिल्लीत होते.एका भेटीत ते नरसिंह राव यांना म्हणाले..
“जरा आमच्या मराठीकडे बघा एकदा. कितीतरी वर्षात ज्ञानपीठ मराठीकडे आलं नाही.या सन्मानाला योग्य असे कुसुमाग्रज आहेत आमच्या कडे.”
हे ऐकून नरसिंह राव चकीत झाले.त्यांनी विचारलं..
“अहो, पण कुसुमाग्रज तर केंव्हाच वारले ना?”
अशोक जैन तर थक्कच झाले.म्हणाले..
“नाही हो.. कुसुमाग्रज छानपैकी जिवंत आहेत नाशकात.”
त्यानंतर साधारण दोन महिन्यांनी लेखक रवींद्र पिंगे दिल्लीत गेले होते.तिथे त्यांना डॉ.प्रभाकर माचवे भेटले.पिंग्यांना ते म्हणाले..
“अनायासे नरसिंह राव ज्ञानपीठचे अध्यक्ष आहेत.ते मराठी उत्तम जाणतात.तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर तारांचा भडीमार करा.. आम्ही दिल्लीतली बाजु सांभाळतो.मी स्वतः नरसिंहरावांशी बोललोय.डॉ.निशिकांत मिरजकरांनी कुसुमाग्रजांची थोरवी वर्णन करणारा इंग्रजी लेख लिहीला आहे.आपली पण लॉबी झाली पाहिजे.आपण प्रयत्न केले पाहिजे.. प्रत्येक वेळी आपले कुसुमाग्रज उपेक्षित रहातात.”
त्यानंतर एकदा L.A.C.चे प्रमुख बाळ गाडगीळ यांची आणि नरसिंह राव यांची दिल्लीत एका भोजन प्रसंगी भेट झाली.गाडगीळांनी ज्ञानपीठाचा विषय काढला.नरसिंह राव म्हणाले..
“ज्ञानपीठ मराठी कडे यावं असं तुम्हाला खरंच वाटत ना !मग तुम्ही एक ठराव लिहून द्या.त्यात कवी कुसुमाग्रज यांच्या नावाची शिफारस करा”
बाळ गाडगीळ पेचात पडले.कारण त्यांच्या कमिटीने कुसुमाग्रज यांच्या नावाचा कधी विचारच केला नव्हता.ते नाव कधीही कुणी सुचवलं नव्हतं.तसं त्यांनी नरसिंह राव यांना सांगितलं.शांत पण घट्ट स्वरात नरसिंह राव म्हणाले..
“ज्ञानपीठ सन्मान मराठीलाच मिळावा असं तुम्हाला खरंच वाटलं ना?मग आत्ताच्या आत्ता मला लिहून द्या..
L.A.C. कुसुमाग्रज यांच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ कडे करीत आहे.”
बाळ गाडगीळ यांनी तत्परतेने तसं लिहुन दिलं.लागलीच नरसिंह राव यांनी पत्रकार परिषद बोलावली.अक्षरश: पाचच मिनिटांत नरसिंह रावांनी जाहीर केलं..
यंदाचा ज्ञानपीठ सन्मान कवी कुसुमाग्रज यांना जाहीर होत आहे.
आणि मग जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं दिपोत्सव सुरु झाला.तात्यासाहेबांना जितका आनंद झाला.. त्यापेक्षाही अधिक आनंद समस्त मराठी बांधवांना झाला.. आपल्या घरातच तो सन्मान आला हीच भावना प्रत्येकाची होती.
तात्यांचे एकामागून एक सत्कार समारंभ सुरु झाले. मुंबईत ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान समारंभ पण झाला.बाकी होता तो नाशिककरांकडुन होणारा सत्कार.तात्यांनी सुरुवातीला तर नकारच दिला.अखेर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रस्थापनेची घोषणा करण्यासाठी म्हणून एक समारंभ आयोजित केला गेला.या देखण्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते..प्रा.वसंत कानेटकर.
या घरच्या सत्काराला उत्तर देताना तात्यासाहेब म्हणाले..
“ज्ञानपीठाच्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्रातुन हजारो रसिकांच्या प्रेमाची बरसात माझ्यावर झाली,ती मला खरोखरच महत्वाची वाटते.ज्ञानपीठालाही कवेत घेणारा प्रेमपीठाचा हा जो पुरस्कार मला मिळाला,यात माझ्या जीवनाची सार्थक झालं असं मला खरोखर वाटतं आणि आजचा हा समारंभ म्हणजे या सत्कारपर्वाचा कलशाध्याय आहे.”
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈