श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
इंद्रधनुष्य
☆ असा बॉस होणे नाही… माहिती संकलक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
असा बॉस होणे नाही…
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इस्रोमध्ये कार्यरत असतानाची एक गोष्ट सांगितली जाते. इंडिजिनस गायडेड मिसाईल प्रोजेक्टवर तेव्हा जोरात काम चालू होतं. शास्त्रज्ञांची एक मोठी टीम या प्रोजेक्टवर काम करत होती. एके दिवशी त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणारे एक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की, “सर मला आज संध्याकाळी थोडं लवकर घरी जायचं आहे, चालेल का?”
कलाम सर हसत म्हणाले, “शुअर, एनी प्रॉब्लेम?”
“नाही सर, म्हणजे काय आहे की गावात सर्कस येऊन महिना झाला. मुलं रोज सर्कस पहायला जाऊ या म्हणतात. पण मला ऑफिसमधून घरी जायलाच उशीर होतोय, त्यामुळे ते जमलंच नाही. आता, उद्या सर्कस दुसऱ्या गावी जाणार आहे. आणि, पुन्हा वर्षभर तरी गावात सर्कस येणार नाही. तेव्हा आज लवकर घरी जाऊन मुलांना सर्कस दाखवून आणावी म्हणतोय.”
“अरे मग जा ना तुम्ही, जरुर जा. मी तर तुम्हाला आत्ताच घरी जाण्याची परवानगी देतोय. अल्वेज पुट युअर फॅमिली फर्स्ट.”
“नाही सर, मी हातातलं काम आटोपून दुपारी 4 वाजता जाईन.” एवढं बोलून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि कामाला लागले.
साडेचार वाजता कलाम साहेबांनी सहज त्या ज्यु. सायंटिस्टच्या केबिनमध्ये पाहिलं तर ते खाली मान घालून त्यांच्या कामात व्यग्र होते. कलाम साहेब लागलीच ऑफिसच्या बाहेर आले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. ते तडक त्या सायंटिस्टच्या घरी गेले. मुलांना घेतलं. स्वतः सोबत बसून मुलांना सर्कस दाखवली आणि येताना छान हॉटेलमध्ये नेऊन मुलांना जे हवं ते खाऊ दिलं आणि नऊ वाजता मुलांना पुन्हा गाडीतून घरी सोडलं.
इकडे साडे सात वाजता ज्यु. सायंटिस्टला आठवलं की आपल्याला साडे चारला जायचं होतं. घड्याळात पाहिलं तर साडे सात वाजून गेले होते. कामाच्या व्यापात आपण याही वर्षी मुलांना सर्कस दाखवू शकलो नाही याचं त्यांना प्रचंड वाईट वाटायला लागलं. हिरमुसल्या चेहऱ्याने त्या दिवशीचं काम आटोपून ते घरी पोहोचले तर घर एकदम शांत. पत्नी निवांतपणे टीव्ही पहात बसलेली. त्यांनी घाबरतच तिला विचारलं, “मुलं कुठे गेलीत?”
“अहो, असं काय करता? तुम्हाला वेळ लागणार होता म्हणून तुम्हीच नाही का तुमच्या बॉसना पाठवून दिलं आपल्या घरी? ते येऊन मुलांना घेऊन, केव्हाच गेले सर्कस पहायला. आणि काय हो, एवढ्या मोठ्या माणसाला आपली घरगुती कामं तुम्ही कशी काय सांगू शकता?”
ज्यु. सायंटिस्ट काय समजायचे ते समजले. कलाम साहेबांना मनोमन धन्यवाद देत सोफ्यावर बसले. इतक्यात मुलांचा दंगा त्यांच्या कानावर आला. मागोमाग हसत, बागडत मुलं आणि कलाम साहेब घरात आले. कलाम साहेबांना पाहून ते खजिल होऊन उभे राहिले. त्यांच्या खांद्यावर मायेने हात ठेवत खाली बसण्याची खूण करत कलाम म्हणाले, “अहो, साडे चार वाजून गेले तरी तुमचं काम चालूच होतं. तुमची एकाग्रता पाहून माझ्या लक्षात आलं की तुम्ही सर्कसचा विषय पूर्णपणे विसरुन गेला आहात. मुलांची सर्कस बुडू नये म्हणून मी त्यांना घेऊन सर्कसला जाऊन आलो.”
कलाम साहेबांचे आभार मानावेत की त्यांना आपण कामाला लावलं याबद्दल सॉरी म्हणावं हे त्या सायंटिस्टना कळेना. पण स्वतःला पट्कन सावरत, हात जोडत ते म्हणाले, “थॅंक्यु व्हेरी मच सर!”
“नो, नो. ऑन द कॉन्ट्ररी आय शुड से थॅंक्यु टू यू.” असं म्हणत कलाम साहेबांनी त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि ते पुढे म्हणाले, “कित्येक वर्षांनी आज मीही तुमच्या मुलांसोबत सर्कसचा आनंद लुटला. खूप मजा आली आम्हाला. कितीतरी दिवसांनी मीही आज मुलांसोबत बागडलो.”
मुलांच्या चेहऱ्यावरुन तर आनंद ओसंडून वहात होता. कलाम सरांच्या हातातील आपले हात त्या सायंटिस्टने हळूच सोडवून घेतले आणि आपले डोळे रुमालाने पुसले. बॉस आणि ज्युनिअर मधील प्रेम पाहून बाजूला उभ्या असलेल्या मातेचे मात्र ओलावलेले डोळे आपल्या साडीच्या पदराने पुसणे कितीतरी वेळ चालूच होते.
(ही कथा डॉ. कलाम यांच्यासोबत इस्रोमध्ये काम केलेल्या एका शास्त्रज्ञाच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेली आहे.)
माहिती संकलक : श्री प्रभाकर जमखंडीकर
संचालक, स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट, सोलापूर
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈