सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 1 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

“मॅडम …मी ना … इंस्टावर माझ्या डान्स चे रील टाकत असते, ते तुम्ही लाईक करा हां …” वय वर्ष सहा असलेली आदिती मला सांगत होती.

“मी बाळाला तो चार महिन्यांचा असल्यापासून स्क्रीनवर सुंदर सुंदर कार्टून दाखवते, तो ते बघत असतो शांतपणे.”

“जेवतांना त्याला टीव्ही लावून द्यावाच लागतो मॅडम, त्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरत नाही, आणि लावला की तो एक ऐवजी तीन पोळ्या पण खातो !”

हे संवाद ऐकल्यासारखे वाटतात ना ? आपल्याला आपल्या घरी, शेजारी, नातेवाईकांकडे ही अशी मुले नक्कीच सापडतील. ही तर फक्त सुरुवात असते, पुढचे डायलॉग मी सांगते तुम्हाला!

“मॅडम, दिवसातील निम्मा वेळ हा स्क्रीन समोर असतो, आता भिंगाचा चष्मा लागायचा बाकी आहे फक्त !” 

“टीव्ही बंद केला की चिडचिड आणि हातातील वस्तू फेकून मारतो, टीव्ही फोडेल म्हणतो ! मग चालू करूनच द्यावा लागतो.”

“COVID च्या काळात त्याला स्मार्ट फोन घेऊन दिला होता, रात्री चॅटिंग करत असतो, कसले कसले व्हिडिओ बघत असतो, सकाळी त्यामुळे लवकर जाग येत नाही, शाळा बुडते, यंदा दहावीला आहे, फोन पण काढून घेता येत नाहीये, काय करू मलाच समजत नाहीये !”

“मॅडम ह्याला online games ची चटक लागली आहे, कॉलेज मध्ये आहे, सारखे पैसे मागत असतो‌ एकदा दुसऱ्याच्या गाडीतील पेट्रोल चोरत असातांना पकडला गेला होता, ते शेजारी चांगले म्हणून पोलिसात नाही गेले पण उद्या दरोडे टाकायला लागला तर मी काय करू?”

अशा अनेक संवादांना मी सामोरी जात आहे सध्या.

मुद्दा एकच !       

माहितीचा (चांगली – वाईट / खरी – खोटी /उपयोगी – निरुपयोगी ) अमर्याद स्त्रोत्र मोबाइलच्या माध्यमातून, आपल्या हातात अणुबॉम्ब प्रमाणे आहे .त्याचा विस्फोट होतोय आणि ह्या माहितीच्या स्फोटामधून आपल्याला हवी ती आणि तेवढीच माहिती कशी मिळवावी हे आपल्याला शिकवले गेलेले नाहीये !

मागच्या पिढीच्या पालकांचे काम तसे सोपे होते. आताच्या इतकी स्पर्धा तेव्हा नव्हती, एकेका घरात किमान चार पाच मुले असायची. आजी, आजोबा आणि इतर मुलांबरोबर ती आपोआप मोठी होत गेली‌. फार तर दूरदर्शन होते, तो ही सवय लागण्या इतपत लावला जात नव्हता. एकत्र कुटुंब असायचे, शेजारी पण मुलांवर लक्ष्य ठेवून असत. एकंदर काळच वेगळा होता. आपली जडणघडण अशा वातावरणात झाली.

आताची मुले जन्मापासून इंटरनेट बाळे झालेली आहेत‌. आई वडील हौशी, आपल्या मुलाने सर्व आघाड्यांवर पुढेच असले पाहिजे ह्या हट्टापायी त्याला खूप लवकर स्क्रीन exposure देतात. जन्मानंतर देण्यात येणारी BCG लस देताना मोबाईल वर नर्सरी rhymes लावणारी फोन addict आई बघतली आहे मी. बाळाला स्क्रीन ची सवय आपण लावून देतो आणि मग ती सोडवायला मानसोपचारतज्ज्ञ आपल्याला हवे असतात. किती विरोधाभास आहे हा !

त्यात अजून भर म्हणजे रिॲलिटी शोज !

लहान मुलांचे रिॲलिटी शो आले आणि आपली मुले त्याचा भाग व्हावी अशी अनेकांची इच्छा व्हायला लागली. त्यात जरा बरे गाणारे किंवा नाचणारे असतील तर लगेच विविध क्लासेस लावून त्यांना बॉलिवूड नाच, हीप होप, लावणी, contemprary नाच, ब्रेक डान्स वगैरेंमध्ये पारंगत करून शो मध्ये टाकले जाते. अवघ्या सहा ते चौदा पंधरा वर्षांच्या मुलामुलींसाठी जी गाणी आणि नाच निवडला जातो तो कधी कधी त्या वयाला अजिबात शोभणारा नसतो. पण मुलांना मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा पाहून पालक त्यांना प्रोत्साहन देतात. 

आठ वर्षाची मुलगी जेव्हा, “तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल..” किंवा, “बाई गं.. कस्स करमत न्हाई….” गाण्यावर बैठकीची लावणी पेश करते, ते हावभाव अगदी बेमालूम करते, त्यावर शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या जातात, शो चे परीक्षक कौतुक करतात आणि पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात तेव्हा मला हसावे की रडावे हेच समजत नाही.

हे सर्व बघणारा कमी वयाचा प्रेक्षकवर्ग, लैंगिक भावना कमी वयातच जागृत झाल्यावर काय करणार ? हे नक्की काय होतंय ते ही समजत नसते. मग मदतीला इंटरनेट असतेच. नको ते पोर्न बघायला एका बोटाच्या क्लिकचा अवकाश ! न कळत्या वयात नको ते दिसते. लहान वयात लैंगिक गुन्हेगारी मग वाढीस लागते. मुलींमध्ये फार लवकर हार्मोन्स वर परिणाम होऊन पाळी लवकर सुरू होण्याचे हे ही एक कारण असू शकते, अर्थात इतर अनेक कारणे आहेतच! 

त्याच बरोबर OTT नावाच्या प्लॅटफॉर्म वर सेन्सॉरशिप नसल्यामुळे सॉफ्ट पोर्न नावाचा जो प्रकार बोकाळला आहे, आणि त्याचा easy access हा भयावह आहे. इथे पालकांचे लक्ष नसेल तर आपली मुले नक्की काय बघतील आणि त्याचे काय परिणाम होतील त्याची कल्पनाच न केलेली बरी ! 

आपण आता मुलांना सोशल मीडिया, OTT, online games, ह्या आणि इतर अनेक गोष्टींपासून लांब ठेवूच शकणार नाही, हे आधी नीट समजून घ्यायला हवे. आपल्या हातात आता त्यांना इंटरनेट साक्षर करणे एवढेच आहे. ह्या सर्व अमर्याद माहितीतून आपण आपल्याला हवी ती माहिती कशी घ्यावी, स्क्रीन time किती असावा आणि तो कसा असावा ते मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. ह्यावर आपण काय करू शकतो ते आता आपण बघूयात.

IAP म्हणजे भारतातील बालरोगतज्ञांच्या संघटनेने काही guidelines दिलेले आहेत ज्यामध्ये ‘स्क्रीन time’ म्हणजेच तुमच्या मुलांचा दूरदर्शन, संगणक, मोबाईल, किंवा अजून अनेक स्क्रीन असलेली उपकरणे यावर जाणारा वेळ, तो किती असावा, व तो कोणत्या प्रकारे वापरला जावा ह्यावर मार्गदर्शन केलेले आहे.

      – क्रमशः भाग पहिला 

लेखिका :  डॉ. कल्पना सांगळे

पुणे.

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments